26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषटिळक ते लोकमान्य

टिळक ते लोकमान्य

स्वातंत्र्य या संकल्पनेशी देशातील ९० टक्के लोकांना देणंघेणं नव्हतं, अशा काळात मूठभर लोक सोबत घेऊन टिळकांचा प्रवास सुरू झाला. अशा वेळी तुमचे होणारे हाल, गरिबी, तुमची सगळी दु:खं यावर स्वातंत्र्य हे एकच औषध आहे, हे टिळक सांगू लागले. स्वराज्य हा आपला हक्क आहे याची जाणीवच नव्हती ज्यांना, अशांचा लढा टिळकांनी उभारला आणि लोकांना आपल्या हक्कांसाठी भांडायला शिकवलं. ‘विद्वत्तेच्या अंकावरती देशभक्ती खेळते, टिळकमिष देशभक्ती खेळते, विघ्नांशी झुंजते, मांडते डावावरी डाव ते !’ या शाहीरवाणीत टिळकांच्या जीवनाचे सार आले आहे.

एकमत ऑनलाईन

रत्नागिरीत जन्मलेला, पुण्यात वाढलेला हा किरकोळ माणूस, मागेपुढे आजकाल असते तशी राजकीय पार्श्वभूमी नाही, देशासाठी काहीतरी करावं असं वाटणारा एक तरुण आपल्या समवयस्कांसोबत शाळा काढतो, स्वत:ची शाळा असूनही हेडमास्तर न होता शिक्षक बनतो. पुढे जाऊन वर्तमानपत्र सुरू करावं असं वाटतं, आपल्या मित्रांसोबत वर्तमानपत्र काढतो. तिथे स्वत:ची मतं प्रकर्षाने मांडतो, पटली नाहीत तर भांडतो, आणि वाद टोकाला गेलाच तर तिथून कसलीही अपेक्षा न करता वेगळा होतो. ‘केसरी’, ‘मराठा’ कर्जात असलेली पत्रं स्वत:च्या खांद्यावर घेऊन ती पुढे भारतभर गाजवतो.

स्वातंत्र्य या संकल्पनेशी देशातील ९० टक्के लोकांना देणंघेणं नव्हतं, अशा काळात मूठभर लोक सोबत घेऊन टिळकांचा प्रवास सुरू झाला. अशा वेळी तुमचे होणारे हाल, गरिबी, तुमची सगळी दु:खं यावर स्वातंत्र्य हे एकच औषध आहे, हे टिळक सांगू लागले. स्वराज्य हा आपला हक्क आहे याची जाणीवच नव्हती ज्यांना, अशांचा लढा टिळकांनी उभारला आणि लोकांना आपल्या हक्कांसाठी भांडायला शिकवलं. आमचे आहे ते आम्हाला द्या हे हक्काने मागण्याची सवय टिळकांनी भारतीय समाजाला लावली. सामान्य माणसाला नेमकं खरं काय या गोंधळातून बाहेर काढायचं. त्याला साध्या-सोप्या शब्दांत देशहिताचं जे आहे ते ठासून सांगायचं, असं ठसठशीत धोरण टिळकांनी ठरवलं. कामगार आणि शेतकरी वर्गात ‘केसरी’ लोकप्रिय झाला तो यामुळेच. शिवाय ‘केसरी’मुळे मराठी भाषेला नवं तेज चढलं हेही अनेकांचं मत. ‘केसरी’च्या उत्पन्नातून टिळकांनी ‘मराठा’ चालवला हे अर्थकारणही वेगळंच.

गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवांतून टिळकांनी धांगडधिंगा करणारी पोरं एकत्र आणली खरी, पण तरुणांच्या उत्साहाचा वापर प्लेगच्या काळात त्यांनी मोठ्या खुबीने करून घेतला. संकटाच्या काळात एकत्र येऊन शिस्तीने काम करण्याची सवय टिळकांनी लोकांना लावली. स्वत: हॉस्पिटल सुरू केले, त्याला जोडून भोजनालय उभारले, दोन वेळचं जेवण आणि न्याहारी तेथील रुग्णांना मोफत असे. आताशा कोविडच्या लसीमुळे बरेच जण अत्यवस्थ झाले, आजही देशात सावधगिरीने लसीकरण सुरू आहे, त्यावेळी तर प्लेगची लस टोचून मृत्यूचे प्रमाण भरपूर होते, म्हणूनच आधी प्रयोग करून मगच लोकांना लस टोचावी अशी भूमिका टिळकांनी घेतली. प्लाझ्मा डोनेशनची चर्चा हल्ली आपण करू लागलोय, प्लाझ्माच्या निर्मितीबद्दल टिळकांनी ‘केसरी’त लिहून ठेवले आहे, आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वी!

देशात हुकूमशाही, जीएसटी भरू नका!

टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणण्याची सुरुवात कशी झाली याची आठवण सांगितलीय खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी! टिळकांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात झालेल्या भाषणात सावरकर म्हणाले, मला आठवतं लोकमान्य शब्द कसा पडला, मी त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजात शिकत होतो. पर्यायी त्यांनाही राजमान्य राजर्षी असं त्यावेळच्या काळाप्रमाणे म्हणत, आणि इंग्रजीमध्ये मिस्टर म्हणत. परंतु त्यांना ज्यावेळी शिक्षा झाली, आणि शिक्षा झाल्यानंतर ते सुटून आले त्यावेळी त्यांची राजमान्यता गेली, तेव्हा ‘काळ’कर्त्यांनी (शिवरामपंत परांजपे) निबंध लिहिला होता, ‘लोकमान्य की राजमान्य’ आणि त्यांनी असं सिद्ध केलं होतं की राजमान्य हा शब्द अपमानास्पदच आहे, तो आपण एकमेकांना लावूच नये. लोकांची मान्यता ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे टिळकांना राजमान्य म्हणण्यापेक्षा ‘लोकमान्य’च म्हणावं.

‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून टिळक प्रसिद्ध आहेतच पण त्यापलीकडचे विचारवंत म्हणून लोकमान्य समजून घ्यायला हवेत. शेती, कामगार चळवळ, व्यापार आणि अर्थकारण यांबद्दल टिळकांनी मूलभूत विचार केला. १८९६ चा दुष्काळ आणि फॅमिन कोडबद्दल शेतक-यांच्या बाजूने टिळकांनी प्रखर भूमिका घेतली. अडचणीच्या काळात टिळकांनी शेतक-यांच्या आणि व्यापा-यांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांना सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी प्रोत्साहित केले. शेती ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारली पाहिजे, शेतीवर आधारित उद्योगांना चालना मिळाली पाहिजे, जिथे जे पिकते त्या भागात त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करणे हाही टिळकांचा शेतीबद्दल महत्त्वाचा मुद्दा वाटत होता. टिळकांचे चरित्रकार तात्यासाहेब केळकर लिहितात, दुष्काळासंबंधी राजकीय चळवळ टिळकांनी इतक्या नेटाने केली, की सरकारच्या गुप्त कचेरीत ठेवलेला त्यांच्या अप्रियतेचा पेला तिजमुळे अगदी भरण्याच्या बेताला आला. महाराष्ट्र हा साखर उत्पादनाच्या बाबतीत देशात अग्रेसर राहू शकतो ही टिळकांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. २०१८ चा अहवाल सांगतो की महाराष्ट्र हा साखरेच्या उत्पादनात आज देशात दुस-या क्रमांकावर आहे.

आमचा देश कंगाल होण्याचं कारण टिळकांना ठाऊक होतं, टिळकांच्या मते, भारतातून इंग्लंडला दरवर्षी होणारा फायदा तब्बल चाळीस ते पन्नास कोटींच्या घरात आहे. सगळे कर्मचारी, त्यांचे पगार ते तिकडे पाठवतात ते आमच्या पैशातून. हिंदुस्थान सरकारला लागणारी लढाऊ विमाने, गलबते, तोफा वगैरे मोठमोठ्या सामानापासून ते टाचणीपर्यंत हरएक पदार्थ इंग्लंडकडून खरेदी केला जातो. भाज्या, फळे, दूध हे तिकडून आणता येत नाहीत नाहीतर तेही आणायला कमी केले नसते. याचे परिणाम शेतीसह सगळ्याच अर्थव्यवस्थेवर होतात. टिळक लिहितात, हिंदुस्थानच्या दारिद्र्याचे कारण सांप्रतची अर्थव्यवस्था आहे. ‘राजा कालस्य कारणम’ अशी संस्कृतात जी म्हण आहे ती अक्षरश: खरी होय.

शेती आणि त्यावर उभारलेले उद्योग कामगारांच्या बळावर टिकतील हे टिळक जाणून होते. त्यातून कामगारांच्या प्रश्नांना टिळकांनी हात घातला. पण कामगारांचे हित जपणे म्हणजे त्यांना मुजोर होऊ देणे अशी कामगार चळवळ टिळकांना अभिप्रेत नव्हती. टिळक नेहमी सांगत की पाश्चात्त्य देशांप्रमाणे मला कामगार व भांडवलदार यांच्यात तेढ निर्माण करायची नाही. व्यापारी किंवा मालक आणि कामगार यांच्यात संघर्ष निर्माण न करता परस्परपूरक समन्वय घडवून आणणारी कामगार नीती टिळकांनी भारतीयांना सांगितलेली आहे. सोशल वेलफेअरसाठी टिळक कामगारांना एकत्र आणू पाहत होते. मद्यपान निषेध चळवळ ही कामगारांमधील व्यसनाधीनता दूर व्हावी, यासाठीचा मोठा प्रयत्न होता.

या सगळ्याच्या तळाशी अर्थकारण दडलेले आहे, अर्थव्यवस्था समृद्ध असलेले देश महासत्ता म्हणून उदयाला येतात, संपत्ती मिळवणे याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी उद्यमशीलता वाढवली पाहिजे, म्हणून टिळकांनी स्वत: जॉईंट स्टोक कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला हे सांगणे आवश्यक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा हा टिळकांचा सल्ला महत्त्वाचा. आपल्या वकिलीच्या क्लासची जाहिरात टिळक ‘केसरी’तून करत असत, क्लास काही दिवस बंद असेल तर त्याबद्दलचे तपशीलही ते जाहिरातीतून देत. व्यवसायासाठी जाहिरात महत्त्वाची हे त्या काळात लोकमान्य ओळखून होते.

टिळकांइतकी लोकप्रियता यापूर्वी कुणालाच मिळाली नव्हती, शिवाजी महाराजांच्या नंतर टिळकच! गणेशोत्सव किंवा शिवजयंतीच्या काळात टिळक महाराज की जय या घोषणा देत. बायाबापड्या आपल्या तान्हुल्या पोरांच्या कपाळी टिळकांची पायधूळ लावत. लोकमान्य तुरुंगातून सुटावेत म्हणून कुणी उपवास धरले, कुणी चहा पिण्याचा सोडला, कुणी चपला घालणं बंद केलं. टिळक सुटून आल्यावर या व्रताचं पारणं फेडण्यासाठी सत्यनारायणही घातले. त्यांच्या साठाव्या वाढदिवशी लोकांनी त्यांना एक लाखाची थैली अर्पण केली. लाखाची किंमत आज आपल्याला फारशी वाटणार नाही पण ते एक लाख अशा काळातले होते सोन्याचा भाव होता १८ रुपये तोळा! आता यावरून तुम्ही त्यांच्या लोकप्रियतेची मोजमापं काढा !

ब्रिटिशांशी लढण्यासाठी टिळकांना एक सर्वंकष अशी राष्ट्रीय संस्था हवी होती. अर्ज-विनंत्या न करता आम्हाला आमच्या हक्काचे स्वराज्य द्या असे धमकावून सांगणारी संस्था. त्यासाठी कधी ते भांडले, कधी नरमाईची भूमिका त्यांना घ्यावी लागली, पण त्यांनी राष्ट्रीय सभेतून बाहेर पडण्याला सदैव नकारच दिला. टिळकांनी मवाळ असलेली राष्ट्रीय सभा तापवत तापवत तिला जहालांच्या ताब्यात दिली, सुरुवातीची कित्येक वर्षे गेले तेव्हा राष्ट्रीय सभेवर जहालांचे पूर्ण वर्चस्व होते. टिळकांचे चरित्र हे एवढे अफाट आणि एवढे कर्तृत्वसंपन्न आहे की त्या मानवतेच्या मानदंडाचे वर्णन किती करावे ? दुबळ्या शब्दांचे बुडबुडे किती उधळावे ?

पार्थ बावस्कर
व्याख्याते, इतिहास अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या