अत्यंत तत्त्वनिष्ठ विवेकवादी भूमिकेतून लेखन करणा-या आणि लोकशिक्षक म्हणून अपवादभूत असलेल्या नंदा खरे यांचे नुकतेच निधन झाले. प्रगतीशील विचारांचा विवेकनिष्ठ कार्यकर्ता, प्रतिभावंत लेखक आणि लोकशिक्षक असे नंदा खरे यांच्या व्यक्तित्वाची पैलू होते. जॉन स्टाईनबेक हा अमेरिकन लेखक खरेंचा आदर्श होता. ज्ञाताच्या कुंपणावरून’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. दोन दशकात वैचारिक, कादंबरी आणि विविध प्रकारचे ललित लेखन व अनुवाद अशी त्यांची दीड डझन पुस्तके प्रसिद्ध झाली. यातून त्यांनी स्वत:ची एक वाट आणि स्वत:चा एक वाचकवर्ग तयार केला होता.
‘अंताजीची बखर’ ही कादंबरी ही प्रथमदर्शनी ‘ऐतिहासिक’ भासते. पण ती न-ऐतिहासिक आहे. मराठीत एकेकाळी ‘स्वामी’ सारखी ऐतिहासिक कादंबरीचे मानदंड निर्माण झाले होते. त्यानंतर त्या साचात खूप-विक्या (बेस्ट सेलर) कादंब-यांनी आपला इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांचे गौरवीकरण असे एक समीकरण वाचकांच्या मनात पक्के केले होते. नंदा खरे यांच्या अंताजीने वाचकांच्या मेंदूला पहिला धक्का दिला. अठराशे सत्तावनच्या काळात अंताजी हा एक सामान्य शिपाई नायक असलेली ही अफलातून कादंबरी आहे. त्यानंतर २०१०मध्ये ‘बखर अंतकाळाची’ ही कादंबरी आली. खरे रूढ आणि प्रस्थापित इतिहासाकडे तिरकस नजरेने पाहतात आणि तथाकथित सर्वमान्य इतिहासाची वस्तुनिष्ठ भूमिकेतून रचना करतात. मराठी वाचकांना हे नवीन होते. इतरांना फक्त भूगोल असतो, मराठी माणसाला ‘इतिहास’ असतो; अशी एक दर्पोक्त मराठी मनात असते. पण तो इतिहास आहे कसा? राजेरजवाड्यांची सत्ता, सनावळ्या, त्यांच्या लढाया, त्यांचीच बाहेरची प्रकरणं म्हणजेच इतिहास का? या काळात सामान्य लोक काय करत होते, कसे जगत होते? ते एका शिपुर्ड्याच्या तोंडून कथन करणा-या या कादंब-या आहेत. सामान्यांची भूक-पीडा, आणि वासनाविकारांनाही इतिहास असतो आणि त्यातूनच खरा गतकाळाचा परिचय होतो. अशी जाणीव देणा-या या कादंब-या आहेत.
जॉन स्टाईनबेक हा अमेरिकन लेखक खरेंचा
आदर्श होता. तो भांडवलवादाचा कठोर टीकाकार होता. या भांडवलशाहीला स्वातंत्र्य आणि समतेचा आग्रह धरणारी लोकशाही ही अडसर वाटते. आणि लोकशाहीत जगणा-या कोणत्याही विवेकनिष्ठ नागरिकाची निष्ठा स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांवर असते. लेखकाची तर ती जबाबदारी असते. लेखकाला त्याची भूमिका हवी. तत्त्वज्ञान हवे, हाच त्यांच्या खरेंच्या एकूणच लेखनाचा आग्रह होता. म्हणूनच राजकीय हुकुमशाही, आर्थिक भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची नासाडी हे त्यांच्या सर्वच लेखनाचे मुख्य सूत्र होते. भांडवलवाद आणि विषमतेच्या विरोधात कृती आणखी वेगळी होती. कृती हा नंदा खरे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा विशेषच होता. ‘कहाणी मानवप्राण्याची’, ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘संप्रति’, नांगरल्याविन भुई’ ही पुस्तके म्हणजे त्यांची लोकशिक्षकाची कृती होय. निवृत्तीनंतर ते विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराकरिता ‘शिक्षणाच्या’ कृतीकडे वळले. आपल्या भोवतालच्या तरुणांना कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक शिक्षण देणे ही सुद्धा त्यांची एक कृती होती. शाळेतल्या मुलांना ते विज्ञान शिकवत. भाषिक कौशल्यासोबतच पृथ्वी, खगोलशास्त्र आणि पर्यावरण काय असते ते सांगत. थोडक्यात प्रगतीशील विचारांचा विवेकनिष्ठ कार्यकर्ता, प्रतिभावंत लेखक आणि लोकशिक्षक असे नंदा खरे यांच्या व्यक्तित्वाची पैलू होते. लेखकाची कोणतीही कृती ही राजकीयच असते, कारण त्याचे लेखन काही एकाएक आकाशातून पडत नाही, असे खरेंना वाटे. तेव्हा त्यांची ही ‘कृती’ केवळ पुस्तक कृती नसते. ते प्रत्यक्ष कृतीत सहभागी होतात. वर्तमान अघोषित आणिबाणीच्या विरोधात जे जे कोणी रस्त्यावर उतरतात आणि निषेध करतात, त्यांच्या बाजूने नंदा खरे उभे राहात. २०१४ नंतर अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या मुद्यावरून डॉ. गणेश देवी यांनी उभारलेल्या ‘दक्षिणायन’ चळवळीचे ते एक शिलेदार होते.
शोषण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नैतिक भूमिका घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे लेखक मराठीत दुर्मिळ आहेत. त्यांच्या ‘उद्या’ (२०१५) कादंबरीला २०२०चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांच्या नैतिक भूमिकेतूनच नाकारला. ‘उद्या’ या कादंबरीत ते मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध घेतात. अति विकसित झालेले संपर्क तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवभांडवलशाहीमुळे उद्याचे मानवी जीवन कसे यांत्रिक किंवा पशुवत असू शकेल याचे एक यिस्टोपीअन चित्र ते या कादंबरीत उभे करतात. ते भविष्याचे दुस्वप्न वाटते. पण त्याच वेळी आदिवासींच्या आदिम व सामूहिक शहाणपणातून ‘चारगाव’ सारखे सह-जीवन कुठेतरी आकारास येत असते, असाही आशावाद ‘उद्या’ कादंबरीत दिसतो. ही कादंबरी म्हणजे मानवाच्या मूल्यात्मक उत्क्रांतीचा पटच आहे. प्राण्याहून वेगळे होण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसाने घेतला, त्या व्यवस्थेच्या, त्या तंत्रज्ञानाच्या सापळ्यात तो स्वत:च अडकला का? हे काही प्रश्न आहेत. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली यांच्या दीर्घ प्रवासात लोकशाहीसारख्या व्यवस्थेत ‘स्वातंत्र्याचा’ शोध लागल्याचा मनुष्याचा आनंद क्षणिक ठरतो की काय, असे ‘उद्या’चे चित्र पाहताना वाटते. गेल्या वर्षभरापासून खरेंना बरे नव्हते. सहा महिन्यापूर्वी तब्येतीच्या देखभालीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुण्यात आणले होते. अखेर २२ जुलै रोजी या अत्यंत तत्त्वनिष्ठ विवेकवादी भूमिकेतून लेखन करणा-या या लेखकाचे निधन झाले. मराठीतील एक सर्वार्थाने वेगळा लेखक आणि लोकशिक्षक म्हणून अपवादभूत असलेल्या नंदा खरेना श्रद्धांजली.
(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
-डॉ. प्रमोद मुनघाटे
ज्येष्ठ समीक्षक, नागपूर