19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeविशेषसहनशील

सहनशील

एकमत ऑनलाईन

‘‘राजास जी महाली। सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली। या झोपडीत माझ्या॥’’ हे संत तुकडोजी महाराजांचे शब्द सर्वांना ठाऊक आहेतच. गरिबाच्या झोपडीत मिळणारी सुखं पाहून प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्रसुद्धा लाजतो आणि गरिबाच्या झोपडीत सदा शांतीचा वास असतो, असे तुकडोजी महाराज या रचनेच्या अखेरीस म्हणतात. यातून सुख आणि समाधान या दोहोंमधला फरक स्पष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं मानलं जातं. परंतु केवळ आजच्याप्रमाणं त्याही काळी चर्चा फक्त गरीब आणि श्रीमंत यांचीच व्हायची, असंही या रचनेतून स्पष्ट होतं.

श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये एक मध्यमवर्गही असतो याचा विसर आधुनिक काळात तर सर्वांनाच पडलाय. लोकशाहीत ‘अतोनात सहनशक्ती असलेला दुर्मिळ प्राणी’ अशीच मध्यमवर्गीयाची व्याख्या जणूकाही मान्य केली गेलीय. हा वर्ग आपापल्या राजकीय नेत्यासाठी आणि पक्षासाठी प्रसंगी बाह्या सरसावून भांडायलाही मागे-पुढे पाहत नाही. निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावरच्या रांगेची लांबी कधीच पाहत नाही. त्याला दिसत असतं आपलं पवित्र वगैरे कर्तव्य. एकदा निवडणुका झाल्या, की त्यानं कसलीही अपेक्षा करायची नसते. अर्थात, निवडणुकीपूर्वी तरी मध्यमवर्गीयाला विचारतो कोण?

कोरोनाच्या काळात याच वर्गाने सर्वाधिक खस्ता खाल्ल्यात. गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना बरंच काही भोगावं लागलं हे मान्य आहेच; परंतु कुणी ना कुणी पुढे येऊन किमान अन्नपाकिटं, शिध्याची किट असं काही ना काही गरिबांसाठी देत होतं. त्याचा सर्वच गरिबांना लाभ झाला असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल; पण किमान काहींना तरी मदत नक्कीच मिळाली. शिवाय, मोफत रेशन आणि अन्य योजनांचेही लाभ या वर्गाला मिळाले. मध्यमवर्गातल्या अनेकांच्या नोक-या गेल्या. अनेकांच्या पगारात कपात झाली. नोकरी जाण्याच्या भीतीनं मिळेल तेवढ्या वेतनावर मध्यमवर्ग काम करत राहिला आणि दुसरीकडे त्याच्या खिशाला परवडेल, असं काहीही मिळेनासं झालं.

कामाचं ठिकाण लांब असेल तर दुचाकीत पेट्रोल भरायला पैसे नाहीत, अशी अनेकांची गत झाली. पेट्रोलनं शंभरी कधीच ओलांडलीय. आता दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधून डिझेलनेही शंभरी गाठलीय. एकदा वाहतूकखर्च वाढला की, सगळ्याच वस्तूंची महागाई होते. मग मध्यमवर्गीयांच्या हातात उरतंच काय? फक्त मोबाईल आणि स्वस्त डेटा. किंबहुना ‘झळ’ जाणवू नये यासाठीच डेटा तेवढा स्वस्त ठेवलाय. त्याचा वापर करून राजकीय नेत्यांविषयी, पक्षांविषयी शाब्दिक फटाके फोडण्यातच यंदाची दिवाळीही जाणार, हे स्पष्ट झालंय. अर्थात, डेटा स्वस्त असला, तरी ऑनलाईन क्लासच्या निमित्तानं पोरांच्याही हातात मोबाईल आलेत आणि आईवडिलांच्या खात्यातले पैसे परस्पर उधळायला ऑनलाईन गेम आणि ‘हुशारी’ उपलब्ध झालीय. त्यामुळं उरलीसुरली कसरही भरून निघेल!

सत्यजित दुर्वेकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या