विलासरावांचे लातूर अथवा लातूरचे विलासराव अशी उभ्या महाराष्ट्राला ओळख होती. लातूरसाठी साहेबांनी केलेले कार्य हे निर्विवाद सत्य आहे. लातूरची आजची ओळख निर्माण करण्यात साहेबांचा मोलाचा वाटा आहे. तशी, लातूरची जुनी ओळख आहेच. निजामाच्या राजवटीत बिदर जिल्ह्यातील लातूर हे तालुक्याचे गाव होते. स्वातंत्र्यानंतर ‘जिल्हा परिषदा’ अस्तित्वात आल्यावर लातूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण बनले. आमच्या लहानपणी या लातूरचे जुने नाव रत्नापूर, लत्तापूर असल्याचे काही जुनी जाणती माणसं सांगत असत. व्यापारीपेठ म्हणून लातूरची स्वतंत्र ओळख होती. तशी ती आजही कायम आहे. ताम्रध्वज राजाचा ऐतिहासिक वारसा या नगरीला लाभलेला आहे.
भविष्यात लातूरच्या विकासाला वाव आहे. येथे व्यापार, उद्योग, व्यवसाय, कृषी, शिक्षण, आरोग्य व सहकार क्षेत्रात खूप काही करता येईल याची जाणीव जेव्हा पुणे येथे एलएल.बी.चे शिक्षण घेऊन परतलेल्या विलासरावांना होऊ लागली तेव्हा त्यांच्यातील कार्यकर्ता जागा होऊ लागला. १९७२ला पडलेल्या भीषण दुष्काळात लातूर दुष्काळ निवारण समितीच्या माध्यमातून विलासरावांनी विधायक व सामाजिक कार्याला सुरुवात केली. दुष्काळी भागातील त्यांच्या या उत्कृष्ट कार्याने त्यांना प्रचंड लोकसंपर्क मिळवून दिला. हीच त्यांच्या राजकारणाची व विकासकामाच्या दूरदृष्टीची सुरुवात ठरली.
याच काळात विधायकतेकडून विकासाकडे आणि समाजकारणातून राजकारणाकडे झेपावणा-या विलासरावांना लोकहिताची कामे कशी करून घ्यायची याचे कौशल्य चांगलेच अवगत झाले ते स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत असताना.
दुष्काळ निवारण समिती सचिव, बाभळगावचे सरपंच (१९४७), उस्मानाबाद जि. प. सदस्य, लातूर पं. स. उपसभापती, उस्मानाबाद जिल्हा युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अशा विविध पदांवर दमदारपणे काम करत असताना लातूरकरांनी विलासरावांच्या एका उमद्या, अभ्यासू व कल्पक तरुणाला (१९८०) आमदार होण्याची संधी दिली. ख-या अर्थाने लातूरच्या विकासाचा प्रवासही येथूनच सुरू होतो.
देखणे व रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या या तरुण आमदाराने विधानभवनातील कार्यपध्दती जाणून घेतली. संसदीय कामकाजात भाग घेऊन जनहिताचे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रश्नासंबंधी सातत्याने पाठपुरावा करणारा प्रभावी आमदार म्हणून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. याच कालावधीत नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असताना विलासरावांनी शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सहाकार्याने बॅ. ए. आर. अंतुले (तत्कालीन मुख्यमंत्री) यांच्याकडे लातूर जिल्हा निर्मितीबाबत जोरदार आग्रह धरला आणि १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबादचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा निर्माण झाला.
बालाघाट पठारावर वसलेला हा जिल्हा मांजरा नदीमुळे मांजरा खो-यातील कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. धनेगाव (बीड) येथील मांजरा धरणामुळे लातूर जिल्ह्यातील फक्त ५०-६० कि.मी. परिसर जलसिंचनाखाली येत असे. लातूरमध्ये शिक्षण, आरोग्य, व्यापारासाठी सुसज्ज बाजारपेठ, औद्योगिक क्षेत्राचा व कृषीसाठी जलसिंचनाचा मोठा अभाव असल्याचे ओळखून विलासरावांनी आमदार झाल्यानंतर प्रथम प्राधान्याने जिल्हानिर्मितीनंतर जिल्ह्याच्या व शहाराच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासाचा आराखडा अधिकारी, पदाधिकारी व कार्र्यकर्त्यांना सोबत घेऊन तयार केला. प्राधान्यक्रमाने एक-एक टप्पा पूर्ण करत विकासकामे हाती घ्यायला सुरुवात केली.
कृषिअर्थव्यवस्था ही जलसिंचनावर अवलंबून असते. पशुसंवर्धन कृषिअर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सिंचनाचे महत्त्व ओळखून साहेबांनी कोल्हापूर बंधा-याच्या धर्तीवर लातूरमध्ये नवीन उच्च तंत्रज्ञान वापरून बॅरेजेसची निर्मिती केली. मांजरा नदीवर एकूण सात बॅरेजेस उभारण्यात आली त्यामुळे जिल्ह्यात जलक्रांती झाली. खुलगापूर, धनेगाव, भुसनी, डोंगरगाव, कारसा, पोहरेगाव, बोरगाव, अंजनपूर, वांजरखेडा, या मांजरा परिसरात प्रचंड प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला. लातूरने या बॅरेजेसने लातूर पॅटर्न निर्माण केला. बॅरेजेस, पाझर तलाव, शेततळे, विंधनविहिरी याद्वारे साहेबांनी जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला व टँकरवरील खर्च कमी झाला.
जलसिंचनामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लोकसहभागातून गाळ काढण्याचा उपक्रम शासनाकडून अनुदान न घेता यशस्वी केला आणि शिवरस्ते व गाववहिवाटीतील रस्ते अतिक्रमणातून मोकळे केले. स्मशानभूमी, सार्वजनिक सभागृह, नदीकिनारी गावालगत धोबीघाट, सांडपाणी, व घनकचरा व्यवस्थापन, सुसज्ज वाचनालय, स्वच्छ- सुंदर शाळा, व्यायामशाळा, शौचालय, गांडूळ खतनिर्मिती, सौरऊर्जेवरील पथदिवे, स्वच्छ-सुंदर गाव अशी अनेक लोकाभिमुख व लोकांना उपयुक्त कामे लातूर जिल्ह्यात साहेबांनी केली.
लातूरच्या विकासात भर टाकणा-या उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीची दीडशे एकर जागेत उभारणी केली. गूळ मार्केट, कडबा बाजार, जनावरांचा बाजार, अद्ययावत स्वतंत्र मार्केटची उभारणी केली. शेतक-यांच्या लेकरांसाठी सुविधायुक्त दीडशे विद्यार्थ्यांचे वसतिगृह उभारले. यार्डालगत शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी केली. शेतमाल तारण योजना सुरू केली.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील त्रुटी दूर करून सुधारणा केल्या. विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत प्रशासनाच्या वतीने सेतु सुविधा केंद्र सुरू केले. रेल्वे सेवा, विमानसेवा, नवीन उद्योगधंद्यासाठी एम. आय. डी. सी.ची स्थापना केली. जिल्ह्याच्या विकासासाठी २९ विभागीय कार्यालये आणून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करवून घेऊन सक्षम प्रशासनामार्फत लातूरचा कायापालट केला. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण केले. चांगल्या अधिका-यांच्या पाठीशी उभे राहून विकासाला प्रोत्साहन दिले.
मांजरा साखर परिवाराअंतर्गत मांजरा, विकास, रेणा व जागृती असे चार साखर कारखाने सुरू करून त्या परिसरातील शेतक-यांना ऊसउत्पादनाची चालना दिली. त्यामुळेच आज जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. १९९३ ला भूकंपाच्या काळात मदतकार्याचे सूक्ष्म नियोजन साहेबांनी केले. प्रशासन, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने त्यांनी लोकांना मदतीचा हात दिला. अन्न, वस्त्र व निवा-याची व्यवस्था केली. भूकंपग्रस्त ५२ गावांपर्यंत वैद्यकीय सुविधा, उपचार व साहित्याची मदत पोहोचवली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ठिकाणी ‘मिनी मंंत्रालय’ संकल्पना राबवून अत्याधुनिक व सुसज्ज इमारतीतून प्रशासन गतिमान केले. गृहराज्यमंत्री असताना पोलिस मुख्यालयाची सुसज्ज इमारत व निवासासाठी पोलिस वसाहतीची उभारणी केली. परिवहन मंत्री असताना ‘गाव तिथे बस’ ही योजना राबविली. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांचे अर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सहकार क्षेत्राशी निगडीत सर्व योजनांना प्रोत्साहन दिले. पर्यटनमंत्री असताना साई येथे पर्यटन स्थळ उभारले. सिध्देश्वर मंदिराजवळ यात्री निवासाची उभारणी केली.
कृषिमंत्री असताना मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत लातूर येथे कृषि महाविद्यालय व उदगीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारले. जिल्ह्यात सर्व क्षेत्रांत काम करणा-या कर्मचारी, कामगार, शेतकरी, व्यावसायिकांना अर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सदैव तत्पर असणारी व ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा. दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सातत्याने प्रथम क्रमांकाने वाटचाल करत असते. त्याचे श्रेय साहेबांनी घालून दिलेल्या कार्यपध्दतीला जाते. माय-लेकराप्रमाणेच विलासरावांचे लातूरशी अतूट नाते होते हे मात्र नक्की…
ब्रिजलाल कदम,
लातूर, मोबा. ७५८८६ ११५५४