28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषसंत गाडगेबाबांच्या कार्याचा वेध ‘सत्यशोधक गाडगेबाबा’

संत गाडगेबाबांच्या कार्याचा वेध ‘सत्यशोधक गाडगेबाबा’

एकमत ऑनलाईन

कीर्तन आणि प्रवचनातून समाजप्रबोधन करणा-या संतांची संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशी थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली असून त्या परंपरेतीलच संत गाडगेबाबा हे आधुनिक महाराष्ट्रातील एक अग्रणी संत होत. झिंगराजी नावाच्या एका देवभोळ्या गरीब परटाच्या घरात जन्मलेल्या डेबूचे अंत:करण भोवतीच्या गरीब, कष्टकरी बहुजन समाजाला निरक्षरता, अंधश्रध्दा, घातक रूढी, परंपरा, धार्मिक कर्मकांड व पशूहत्या आदींमुळे आलेली अवकळा बघून कळवळते आणि तो गृहत्याग करतो. तो या समाजाचे प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून करीत गावोगाव फिरतो. सोबतच गाव स्वच्छतेचा आदर्शही लोकांसमोर तो ठेवतो. व-हाडी बोलीतून स्वत:चे विज्ञाननिष्ठ विचार लोकांसमोर ठेवून रंजल्या-गांजल्यांची व प्राणिमात्रांची सेवा करण्याचाही संदेश देतो आणि अल्पावधीतच हा निरक्षर डेबू ‘कृतिशील संत गाडगेबाबा’ म्हणून देवभोळ्या जनसामान्यांच्या अंत:करणात कायमचा विराजमान होतो. अशा या गाडगेबाबांवर संत कबीर, संत तुकाराम आणि थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या विद्रोही विचारांचा पगडा असल्यामुळे गाडगेबाबांनी कधीच देव-देवतांचे अवास्तव स्तोम माजवले नाही. त्यांनी ना मठांची स्थापना केली ना शिष्य परंपरा निर्माण केली.

शिवाय त्यांनी कसल्या चमत्कारांचीही कधी दर्पोक्ती केली नाही.संत गाडगेबाबांच्या याच ‘सत्यशोधकीय’ आचार-विचारांची ओळख विदर्भाच्या यवतमाळ जिल् तील युवा लेखक श्री. संतोष अरसोड यांनी ‘सत्यशोधक गाडगेबाबा’ या पुस्तकात सार्थपणे करून दिली आहे. माणसा-माणसातील भेद हे मानवनिर्मित असल्याने ते अमंगळ असून माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागावे. तसेच गरीब, बहुजन समाजाने शिक्षणाची कास धरावी आणि नवस, कर्मकांड, घातक परंपरा इत्यादींचा त्याग करावा. पुरुषांबरोबर समान दर्जा स्त्रियांना देऊन त्यांचा सन्मान व्हावा. तसेच पशुहत्या करू नये आणि अंधश्रध्दांना कायमची मूठमाती द्यावी, अशी अडाणी, निरक्षर व पापभिरू बहुजन समाजाला उपयुक्त ठरेल, अशी मोलाची शिकवण संत गाडगेबाबांनी त्यांच्या कीर्तनातून अवघ्या महाराष्ट्राला दिली. ‘जत्रा मे फत्रा बिठाया । तीरथ बनाया पानी ! दुनिया भई दिवाणी ! सब पैसे की धुलधाणी!’ असे संत कबीरांचे दोहे किंवा संत तुकारामांचा ‘तीर्थी धोंडा पाणी ! देव रोकडा सज्जनी!’ असे अभंग सांगून गाडगेबाबांनी समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महत्कार्य तब्बल साठ वर्षे अथकपणे केले.

थोडक्यात लेखक संतोष अरसोड लिखित या पुस्तकात लेखकाने संत गाडगेबाबांचे जीवनचरित्र न लिहिता त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे समाजोपयोगी विविध पैलू त्यांच्या जीवनातील काही प्रसंग कथन करून उजागर केले आहेत. त्याद्वारे समाजोद्धारक गाडगेबाबा येथे साक्षात झालेले आहेत आणि म्हणूनच जरी हे पुस्तक आकाराने छोटे असले तरी ते आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संत गाडगेबाबांच्या कृतिशील आचार-विचारांचे समाजमनावर बीजारोपण करणारे आहे, हे नक्की !
लेखसंग्रह – सत्यशोधक गाडगेबाबा
लेखक – श्री. संतोष अरसोड
प्रकाशक – मीडिया वॉच पब्लिकेशन,
अमरावती, मो. :८८८८७ ४४७९६
पृष्ठे – ४६, मूल्य – रु. ५०/-

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या