27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषत्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्

त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्

गणेश हा समूहमानसाचा देव आहे. ते लोकदैवत आहे. गणेशपूजन मुख्यत: पार्थिव रूपातच केले जाते. लिंगपूजाही पार्थिवच असते. पार्वतीचे हरितालिका व्रतपूजनही पार्थिवप्रधानच आहे. शिव व गणेश एकाच कुळपरंपरेतले देव असल्याने त्यांची पार्थिवपूजा ग्रा ठरते. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्त्वप्रधान ! पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे जड तत्त्व आहे. तो मूलाधार आहे. म्हणूनच अथर्वशीर्षात ‘त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्’ असे म्हटले आहे. गणेशमंत्रात गं हे बीज आहे, ग हे अक्षर गुरुत्व, गरीमा, घनता स्पष्ट करते. गणेशातील पार्थिवतत्त्व मानवी देहाशी लय साधते.

एकमत ऑनलाईन

मराठी वाङ्मयात गणेशोपासकांनी स्वतंत्र काव्यनिर्मितीचा आविष्कार केलेला दिसतो. त्यातून गणेशवंदनाची थोर परंपरा जशी लक्षात येते, तसेच गणेशोपासनेची रूढ असलेली पद्धतही अधोरेखित होते. गणेशोपासकांनी गणांचा नायक, अधिपती, बुद्धिमान, सर्वांचा प्रमुख अशा विशेषणांनी गणपतीला गौरवले आहे. त्याला ‘इंद्र’देखील म्हटले आहे. प्रा. कृ. मो. शेंबणेकर यांनी ‘गणेश रहस्यदर्शन’ या शीर्षकाचे दोन लेख १९६४ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यात ऋग्वेदात उल्लेखलेले ‘ब्रह्मणस्पति’ व ‘बृहस्पति’ या देवता ॐकाराचे उत्क्रांत रूप असून तोच गणेश असल्याचे मत प्रतिपादिले आहे. गणेशाला बुद्धी, कला, विद्या यांची देवता मानण्यामागील सूत्र हेच असावे.

गणेश ही देवता वैदिक आहे म्हणणारे त्याचा ॐकाराशी संबंध जोडतात. त्यातील अ, उ, म शी ज्ञानेश्वरांनीही संबंध जोडून ‘अकार चरणयुगला उकार उदरविशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे’ असे स्पष्ट म्हटले आहे. परंतु गणेश अथर्वशीर्षात गणेशविद्या व गणेश बीजमंत्र उल्लेखलेला आहे. हे अथर्वशीर्ष उपनिषदांतर्गत असून त्यांचा मंत्रद्रष्टा ऋषी गृत्समद आहे, मात्र तो अवैदिक आहे. अथर्वशीर्षातील गणेश वर्णनात त्याला ‘व्रातपती’ म्हणून नमन केले आहे. ‘नमो व्रातपतयेनमो गणपतये नमो प्रमथपतये’ असे वंदन केलेले आढळते.

गणेश ही आर्यपूर्व तांत्रिक देवता असून त्याचे उत्क्रांत रूप श्रौतवाङ्मयात आपण स्वीकारले. इतिहासाचार्य श्री. वि. का. राजवाडे यांनी भाषाशास्रीय पुराव्यांआधारे वक्रतुंड आणि एकदंत असा उल्लेख असलेली गणेशोपासना अंदाजे २२०० ते २५०० वर्षांइतकी प्राचीन ठरू शकते, असे म्हटले आहे. आनंदगिरीच्या शंकर दिग्विजय ग्रंथात गाणपत्याचे सहा प्रकार नोंदवले आहेत. हे प्रकार त्याचे रूप-स्वरूप व कार्यशैलीच्या भिन्नतेमुळे पडले आहेत. त्यातील महागणपती प्रमुख असून तो सर्वशक्तिमान आहे. तो दहा हातांचा पाशांकुश व कमलधारी आहे. दुसरा हेरंब रक्तवर्णी आठ-दहा हातांचा सिंह व बैलावर आरूढ असलेला नागबंध बांधलेला आहे. तिसरा उच्छिष्ट गणेश अन्नविपुलतेचे प्रतीक असून सुव्यवस्थापक आहे. चौथा संतान गणेश पुत्रप्राप्तीच्या हेतूने पुजला जातो. पाचवा हरिद्रागणेश विवाहेच्छुकांसाठी उपयुक्त असून वैभवसंपन्नतेचे प्रतीक आहे. सहा स्वर्ण गणेश. ऐश्वर्याचे प्रतीक होय. याशिवाय नवनीत, उर्ध्व, पिंगल, लक्ष्मी अशी पर्यायी नावे (मराठी विश्वकोषात खंड ४) नोंदवलेली आढळतात.

पूजाद्रव्य : गणेशाला प्रिय असणा-या दुर्वा शीतलता व वंशवृद्धीचे प्रतीक असून, अमृतवल्ली म्हणून हरळीचे आयुर्वेदात महत्त्व आहे. ‘शमीशमयते पापं’ अशी ख्याती असलेल्या शमी व मांदारपुष्प गणेशाला प्रिय असून मांदारवृक्षातील खोडात प्राप्त होणारा मांदार गणेश विशेष पूजनीय आहे.

गणेशाची शुंडा : गणेशाच्या उजव्या-डाव्या सोंडेबाबत काही संकेत ठरलेले आहेत. उजवीकडे वळलेली शुंडा दक्षिण दिशेचा स्वामी यमराज यावर प्रभाव गाजवते. सूर्यनाडी प्रभावित करते. हा गणेश जागृत, कडक मानला जातो. डाव्या सोंडेचा मात्र सौम्य मानला आहे. पार्थिव गणेश (गणेश चतुर्थी वगैरे सार्वजनिक समारंभातला) डाव्या सोंडेचाच असतो. डॉ. नंदितमभू यांनी गाणपत्य संप्रदायावरील ग्रंथात याचा सविस्तर विचार केला आहे. संत ज्ञानदेवांची मात्र ‘शुंडादंड सरळू’ असे म्हणून वादाऐवजी संवादाची समन्वयाची भूमिका घेतली आहे, तर समर्थांनीही ‘सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना’ असा सरळ मार्ग स्वीकारला आहे.
गणेशाची तांत्रिक स्वरूपातील पूजा-उपासना सिंधू संस्कृतीपासून असलेली दिसते. राघवचैतन्य यांनी रचलेल्या एका स्तोत्रात तांत्रिक गणेशाचे रूप वर्णन केले आहे.

आश्लिष्टं प्रियता सरोजकर या रत्नस्फुरत् भूषया।
माणिक्य प्रतिभं महागणपति विश्वेशमाशास्महे॥

या उल्लेखात प्रियेला आलिंगन दिलेला माणिकासम लाल प्रभा असलेला गणेश तांत्रिक स्वरूपातला आहे. जायसीच्या पद्मावत काव्यात त्याचा तांत्रिकाशी संबंध असल्याचे म्हटले आहे. मात्र महाराष्ट्रात तांत्रिक गणेशोपासना अभावानेच आढळते, असे मत प्रसिद्ध संशोधक कै. रा. चिं. ढेरे यांनी नोंदवले आहे.
गणपतीचे मूळ तांत्रिक रूप पालटून ती उत्तरकालात उपास्य देवतेच्या रूपात समावेशक झाली. बौद्ध धर्मात तंत्रमार्गानेच तिचा प्रवेश झाला. गणेशाबरोबर त्याच्या शक्तीचेही पूजन स्वाभाविक ठरले. उच्छिष्ट गणपती, पुष्कर गणपती, गणेशयानी इत्यादी भेद जसे यात आढळतात तसेच लोकमानसात लोकरंभूमीवरील नृत्यशील गणेश, आद्यवंद्य गणेश, गणेशपट्टीवरील गणेश, चतुष्पथीचे गणेश याही रूपात जनसामान्यात तो एकरूप झाला. कुठे चार तर कोठे सहा हातांचा तो दिसतो; तर अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरावर स्त्री-रूपातील (गणेशयानी) दहा हातांचा आहे. योगिनी रूपात असून त्याच्या हाती अक्षमाळा आहे, ही बाब नोंदवण्यासारखी आहे.

श्री. रा. गो. भांडारकरांच्या मते, गणेशोपासनेचा प्रारंभ इ. स. च्या पाचव्या शतकात झाला. विनायक हे गणेशाचे नाव असून शुक्ल पक्षातील चतुर्थी ही ‘विनायक चतुर्थी’ मानली जाते. ती एकादशीप्रमाणे पूर्ण उपवासाची असते. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद शुक्ल चतुर्थी, माघ शुक्ल चतुर्थी व ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी या जन्माच्या मानल्या जातात. त्या दिवशी उपवास करतात. गणेश हा समूहमानसाचा देव आहे. ते लोकदैवत आहे. गणेशपूजन मुख्यत: पार्थिव रूपातच केले जाते. लिंगपूजाही पार्थिवच असते. पार्वतीचे हरितालिका व्रतपूजनही पार्थिवप्रधानच आहे. शिव व गणेश एकाच कुळपरंपरेतले देव असल्याने त्यांची पार्थिवपूजा ग्रा ठरते. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्त्वप्रधान ! पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे जड तत्त्व आहे. तो मूलाधार आहे. म्हणूनच अथर्वशीर्षात ‘त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्’ असे म्हटले आहे.

गणेशमंत्रात गं हे बीज आहे, ग हे अक्षर गुरुत्व, गरीमा, घनता स्पष्ट करते. गणेशातील पार्थिवतत्त्व मानवी देहाशी लय साधते. कारण देह पार्थिव असतो. पार्थिवतत्त्वाशी हत्तीचा संबंध आहे. वजनदारपणा, गुरुत्व व देहनिष्ठतेशी हत्तीचा संबंध आहे. हत्ती स्पर्शसुखाला भुलतो. ही देहलय लक्षात घ्यावी लागते. येथे तांत्रिक पूजेचा अर्थ लागतो. हत्तीची सोंड अत्यंत श्लक्ष्ण असते. तो संवेदनाग्रा असतो. पालकारण्यात ग्रंथातील संदर्भ मारुती चितमपल्ली यांनी देताना ‘य:श्लक्षण: सर्व भाषेषु विशुद्धोश्चत्तमोत्तम:’ असा उल्लेख केला आहे.गाणपत्यात गौतम ऋषींचे नाव घ्यावे लागते. माजलगाव (जि. बीड)जवळ गंगामसला नावाचे गाव असून ते गौतमक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हा सकाळी साळी पेरून संध्याकाळी त्याचा भात शिजवून खात असे. गाणपत्यांच्या नामावलीत जी नावे आहेत, ती अशी –

गणेशो गालवो गार्ग्यो गौतमश्च सुधाकर:
श्रीगणेशस्य प्रसादेन सर्व गृण्हन्तु गाणपा:

गणेशतत्त्व समग्र ब्रह्मांडात भरून उरले असून स्वानंद भुवनात श्रीगणेश शक्तीसह विराजमान आहे. कर्मसंन्यास भक्तांना अमान्य असून कर्म करीत राहून नैष्कर्म्य प्राप्त करणे, हीच उपासना आहे. चतुर्थीव्रत म्हणजे तुर्यावस्था, चतुर्थअवस्था प्राप्त करणे होय. हे जीवन गणेशप्रीत्यर्थ आहे, असे मानणे म्हणजे चतुर्थीविभक्ती. हीच खरी गणेशभक्ती होय, ही त्यांची निष्ठा होती.

डॉ. विद्यासागर पाटंगणकर,
संतवाङ्मयाचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या