25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषउमद्या मना... तुझे नाव वसंतराव नाईक

उमद्या मना… तुझे नाव वसंतराव नाईक

एकमत ऑनलाईन

आज (१ जुलै) वसंतराव नाईक यांची १०९ वी जयंती. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ अशी जवळजवळ सव्वा अकरा वर्षे ते महाराष्ट्राचे सलग मुख्यमंत्री होते. देशात सर्वाधिक काळ म्हणजे सलग २३ वर्षे ज्योती बसू पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मोहनलाल सुखाडिया सलग १७ वर्षे राजस्थानचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी सलग १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर वसंतराव नाईक यांचाच क्रमांक लागतो.

महाराष्ट्राच्या विकासाची बांधणी याच १०-११ वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली. कसलेही राजकीय बंड नाही. २०२ आणि २२२ अशा काँग्रेस आमदारांचा त्यांच्यामागे मजबूत पाठिंबा… पंडित नेहरू, इंदिरा गांधी या पंतप्रधानांचा पाठिंबा… आणि विकासाची पूर्ण दृष्टी. यातून या ११ वर्षांत महाराष्ट्र वैभवाच्या शिखरावर होते. चौफेर कामे सुरू होती. १९७२ च्या भीषण दुष्काळावर कशी मात करायची? हे नाईकसाहेबांनीच दाखवून दिले. त्यांच्याच काळात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. बहुसंख्य मोठी धरणे ही त्यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात उभी राहिली. मोठी विद्युत निर्मिती केंद्रेही त्यांच्याच काळात उभी राहिली. ज्वारी खरेदी योजना, एकाधिकार कापूस योजना, रोजगार हमी योजना, चार कृषि विद्यापीठांची निर्मिती, हायब्रीड ज्वारीचा प्रचार या सर्व विकासाच्या भूमिका नाईकसाहेबांनी प्रभावीपणे पार पाडल्या. केवळ सरकार चालवणे हेच त्यांचे वैशिष्ट्य नव्हते.

सामान्य माणसांच्या जीवनाशी, त्याच्या सुख-दु:खाशी नाईकसाहेब कमालीचे समरस झालेले होते. त्यांच्यातील ‘माणूस’ फार मोठा होता. त्यांच्याबरोबर १९७२ च्या दुष्काळात भूम-परंड्याला गेलो होतो. एका शेतक-याच्या घरी ते घोंगडीवर बसले होते. कोणीतरी पाण्याचा गडवा आणून ठेवला. दुसरा ओरडला, ‘अरे, ते पाणी देऊ नको…. ते गढूळ पाणी आहे… कोका-कोला आण…’ नाईकसाहेब म्हणाले… ‘तुमच्या गावात कोका-कोला पोहोचला पण पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचले नाही…. हा माझा पराभव आहे. पुढच्या वर्षी नळपाणी योजनेचे उद्घाटन याच दिवशी करू….’ आणि ग्रामीण नळपाणी योजना त्यांनी पुढच्याच वर्षी सुरू केली. पुढच्या गावात आम्ही गेलो तेव्हा त्या माणसाच्या घरात बसायला खुर्चीही नव्हती. ज्वारीच्या पोत्यावर मुख्यमंत्री सहज बसले. जराही जाणवू दिले नाही. उलट म्हणाले की, ‘कसं छान वाटतंय… गहुलीला (त्यांचे गाव) गेलोय असं वाटतंय…’ हा माणूस शेतीतला होता. मातीतला होता. शेतक-याचा होता. म्हणूनच मंत्रालयाची दारं याच मुख्यमंत्र्यांनी शेतक-यासाठी सताड उघडी ठेवली. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.

हायब्रीडचा प्रचार केला. आज जुन्या लोकांना आठवत असेल रेशनवर कशा रांगा लागायच्या… अर्धा किलो तांदूळ, गव्हासाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागायचे. नाईकसाहेबांनी त्या कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला अन्नधान्य आघाडीवर स्वयंपूर्ण करण्यासाठी केवढे कष्ट घेतले. दुसरीकडे नवी मुंबईची निर्मिती, नवीन औरंगाबादची निर्मिती हे सगळे त्यांचेच निर्णय. एवढी वर्षे सत्तेवर असताना मनाने हा माणूस निगर्वी होता. विरोधकांच्या खांद्यावर हात टाकून मैत्री जपणारा होता. मृणालताई गोरे त्यांच्या प्रखर विरोधक. त्या एक दिवस एका कार्यक्रमाला यवतमाळला गेल्या. त्याची बातमी प्रसिद्ध झाली. नंतर विधानभवनात नाईकसाहेबांची आणि ताईंची भेट झाली. नाईकसाहेब म्हणाले की, ‘ताई, तुम्ही माझ्या गावाला जाऊन आलात पण भावाच्या घरी जायला विसरलात. विधानसभेत विरोध करा पण गावात गेल्यावर भावाचे घर कसे विसरता….’ हे शब्द उच्चारायला मन मोठं लागतं. मृणालताई म्हणाल्या, ‘नाही…. मी जायला हवं होतं.’ आणि मग मृणालताईंनी आठ दिवसांनंतर त्यांची मुलगी अंजूच्या लग्नाचे आमंत्रण नाईकसाहेबांना दिले. लग्न होते वसईला. त्या दिवशी मुंबई पाण्याखाली होती. पण नाईकसाहेबांनी शब्द दिला होता. त्या प्रचंड पावसातही नाईकसाहेब अंजूच्या लग्नाला वत्सलाताईंसह पोहोचले. नाईकसाहेबांच्या मनाच्या दिलदारीचे असे अनेक किस्से आहेत.

१९७२ साली शिवराज पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी वसंतराव नाईक लातूरला हेलिकॉप्टरने आले. जिथे हेलिकॉप्टर उतरणार होते, त्या दयानंद कॉलेजच्या मैदानावर धूर केलेला होता. पण, त्या अगोदर लातूर-बार्शी मीटरगेज रेल्वे लातूरजवळ उभी होती. तिथे मोकळे मैदान होते. कोळशाच्या गाडीचा धूर निघत होता. ‘इथेच उतरण्याची व्यवस्था आहे,’ असे पायलटला वाटले. त्याने हेलिकॉप्टर उतरवले. तिथे कोणीच नव्हते. शिवराज पाटील, विलासराव देशमुख हे दयानंद कॉलेजच्या मैदानावर थांबले होते. हेलिकॉप्टर उतरले तिथे एक शाळा होती. हेलिकॉप्टर उतरताच शाळेतील मुलं धावत आली. शाळेचे मुख्याध्यापक पुढे आले. त्यांनी सांगितले की, ‘दयानंद कॉलेज मैदानावर हेलिकॉप्टर उतरवायचे आहे…’ नाईकसाहेब शांत होते. नाईकसाहेबांनी विचारले, ‘तुमच्याजवळ काही वाहन आहे का?’ ते म्हणाले, ‘स्कूटर आहे….’ आज कोणाला खरे वाटणार नाही… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या मुख्याध्यापकाच्या पाठीमागे स्कूटरवर बसून सभास्थानी पोहोचला. सगळी गर्दी दयानंद कॉलेजच्या मैदानावर होती. काही क्षणांत बातमी कळली की, मुख्यमंत्रीसाहेब व्यासपीठावर आलेसुद्धा…. मग सगळेच खजील झाले… पण नाईकसाहेब म्हणाले, ‘खूप दिवसांनी स्कूटरवर बसण्याचा आनंद घेतला.’ हा उमद्या मनाचा माणूस होता. ज्या दिवशी त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला आज राजीनामा द्यायचा आहे… त्यावेळी ते पुण्यात होते. जाहीरसभेत त्यांनी सांगून टाकले, ‘‘पक्षश्रेष्ठींनी मला राजीनामा द्यायला सांगितला आहे. महाराष्ट्राने मला खूप दिले आहे. मी समाधानी आहे. उद्याच आनंदाने मी राजीनामा देईन.’’

दुस-या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. होणारे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. यांना ‘वर्षा’ निवासस्थानी भोजनाचे आमंत्रण दिले. मावळत्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना जेवायला बोलावले. दुस-या दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शंकरराव चव्हाण वर्षा बंगल्यावर आले. वसंतराव नाईक यांनी शाल पांघरून त्यांचा सत्कार केला. त्यांना हार घातला… कडकडून मिठी मारली. नाईकसाहेबांच्या चेह-यावरचा आनंद असा होता की, ‘जणू तेच उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत…’ महाराष्ट्राच्या इतिहासात पायउतार होणा-या मुख्यमंत्र्याने उद्याच्या मुख्यमंत्र्याला घरी जेवायला बोलावून त्याचा सत्कार केल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. त्या दिवशीचा तो फोटो आजही माझ्या संग्रहात जपून ठेवला आहे. महाराष्ट्र कसा घडला…. हे नवीन पिढीला माहिती नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे गटार झाले असले तरी त्यावेळचा महाराष्ट्र… त्यावेळचे नेते, यांची मनं फार मोठी होती.

किती आठवणी सांगायच्या…. १९७२ च्या दुष्काळाच्यावेळी नाईकसाहेबांना झोप लागत नव्हती. १९७२ च्या जुलैची १८ किंवा १९ तारीख असेल… नाईकसाहेबांची पत्रकार परिषद चालू होती. दुष्काळासाठी काय काय योजना केल्या आहेत याची माहिती ते देत होते. काही वेळातच आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले आणि पाच-दहा मिनिटांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाईकसाहेब खुर्चीतून उठले. त्यांनी त्यांच्या चेंबरची खिडकी सताड उघडली. पावसाची झड आतमध्ये येत होती. त्यांनी पाऊस अंगावर हातांनी ओढून घेतला. एखाद्या लहान मुलासारखे ते आम्हाला सांगू लागले… ‘पाऊस आला…. पाऊस आला….’ त्यांनी खिशात हात घातला. त्यांचा शिपाई महंमद याला हाक मारली. जोरात म्हणाले, ‘अरे, महंमद जोराचा पाऊस आला… पटकन पेढे घेऊन ये….’ त्यांनी १०० रुपये काढून दिले. महंमद पेढे घेऊन आला. त्यांनी आम्हा पत्रकारांना पेढे वाटले नाहीत तर चक्क भरवले.

आजच्या राजकारणात ही अशी माणसं मिळतील का? जांबुवंतराव धोटे हे त्यांचे विरोधक. त्यांना कोणत्यातरी शिक्षेमुळे तुरुंगात ठेवले होते. त्यांची आई आजारी झाल्याचे कळल्यावर नाईकसाहेबांनी स्वत:हून १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला. येरवडा तुरुंगात गाडी पाठवली. तिथून त्यांना मुंबईला आणले. मुंबई विमानतळावर विमानाचे तिकिट तयार ठेवून मुख्यमंत्र्यांचे सचिव शामकांत मोहिनी स्वत: उभे होते. काय झाले… धोटेसाहेबांना कळेना. मग त्यांना सांगण्यात आले, ‘तुमची आई आजारी आहे म्हणून नाईकसाहेबांनी पॅरोल मंजूर करून तुम्हाला नागपूरला पाठवत आहोत….’ जांबुवंतराव नागपूरला गेले…. मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते…. आईला भेटले… नाईकसाहेबांच्या दु:खद निधनानंतर जांबुवंतरावांची प्रतिक्रिया घ्यायला गेलो होतो…. त्यांनीच ही आठवण सांगितली… यशवंतरावांचा… नाईकसाहेबांचा… वसंतदादांचा… हाच का तो महाराष्ट्र?

-मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या