24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषअवघड प्रसंगातील अपरिपक्व मन समजून घेताना...

अवघड प्रसंगातील अपरिपक्व मन समजून घेताना…

एकमत ऑनलाईन

हेमा आणि सौरभ यांना सात वर्षांची मुलगी आहे भूमी. एके दिवशी भूमीची आई हेमा माझ्याशी बोलत होती. ‘गेले १२ दिवस झाले, भूमी माझ्याशी आणि तिच्या बाबांशी नीट बोलत नाही, जेवत नाही आणि गप्प गप्प असते. आम्हाला ती घरात राहूनसुध्दा टाळतेय. आम्ही काय करावं सांग ना प्लीज..?’ मी तिला आश्वस्त करत म्हटलं, ओके थोडं मला जरा सविस्तर सांगशील का? तुला नक्की काय म्हणायचं आहे. ‘तू आधी काय घडलं ते व्यवस्थित सांगशील.. मग आपण काही मार्ग निघतो का ते पाहूयात.’ ती सांगू लागली. ‘तुला माहीत आहे सौरभ डे आणि नाईट अशी वेळा बदलून कामाची शिफ्ट करतो. एकेदिवशी आम्ही दोघे बेडरूममध्ये होतो. दाराची कडी नीट लावलेली नव्हती. भूमी आली ती थेट बेडरूममध्येच आणि तिने आम्हा दोघांना जवळ-जवळ निर्वस्त्र अवस्थेत पाहिलं. तेव्हापासून ती आमच्याशी चकार शब्दही बोलली नाही आणि नजरेला नजरही मिळवत नाही. आम्हाला खूप गील्ट वाटत आहे. नेमकं कसं भूमीला यातून बाहेर काढू मी…?’

खरं तर नवरा-बायकोमधील शारीरिक संबंध ही एक नैसर्गिक बाब मानली जाते, मात्र तो घडत असताना अचानक मूल उठून समोर आलं तर त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे त्या प्रसंगात सापडलेल्या पालकांना कळत नाही. अशावेळी योग्य पद्धतीने मुलांना प्रतिसाद दिला गेला नाही तर त्यातून विचित्र गुंते निर्माण होऊ शकतात. मूल आणि पालक यांच्यातील नात्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. अशा वेळी नेमका प्रतिसाद कसा दिला पाहिजे?. सामान्यपणे मुलं आज जी काही माध्यमं आहेत त्यावरती अनेकदा पालक समोर असताना कामक्रीडा आणि त्यासंदर्भातील दिसणारी भावूक दृश्ये पाहत असतात. कधी त्या कंडोमच्या जाहिराती असतात तर कधी परफ्यूम-डिओ इत्यादीच्या. कथा, कादंब-या किंवा चित्रपटांमधूनही मुलं एकमेकांना जोडीदाराने केलेले हळुवार सौम्य स्पर्श पाहून उत्तेजित होत असतात. त्यांच्या मनात त्याविषयी कमालीची उत्सुकता सुध्दा असते पण आपल्या समाजात लहान मुलांनी अशा सिक्रेट टॉपिकवरती बोलणं किंवा काही विचारणं ही, आपल्या धारणेविरुध्दची गोष्ट असते. पहिल्यांदा आपल्या मुलांच्या मनात आत्ता या वेळी काय द्वंद्व चालू असेल ते पाहून त्याचे नीट निरीक्षण करता आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या चेह-यावरील हावभाव वाचून घ्यायला हवेत.

वरील अनुभवात भूमीने आजपर्यंत कधीही न पाहिलेला प्रसंग पाहिला. त्यामुळे ती गोंधळून जाणं साहजिकच होतं. अशा प्रसंगातून मूल सहजासहजी बाहेर निघत नाही. कोणाशी बोलतही नाही. अशा एखाद्या अवघड प्रसंगात आई आणि बाबाला मुलांनी पाहिलं तर पहिल्यांदा काय करायचं तर ते म्हणजे, आई- वडिलांनी पहिल्यांदा आपल्या हातून फार मोठी चूक झाली आणि कोणत्या तोंडाने मुलाच्या समोर जायचं याचं ओझं किंवा ज्याला आपण अवघड वाटू देता कामा नये. एकतर अशा प्रसंगात अवघडून जायला होतं व ते अगदी साहजिकच आहे. तरीही पहिल्यांदा स्वत:ला सांगा आपल्याला या प्रसंगाला धीराने सामोरं जायचं आहे. शांतपणे झालेला गुंता सोडवायचा आहे. तिने जे पाहिलं ते पती-पत्नीमध्ये कितीही नैसर्गिक असलं तरी त्याबद्दल सांगताना तिला कुठल्या भाषेत, कसं आणि कुणी सांगायचं? आपण जे सांगू त्याचा काही विचित्र परिणाम तर तिच्या बालमनावरती होणार नाही ना? रोज खेळीमेळीने वागणारे आपले बाबा आणि आई असं का बरं वागले? अशा प्रश्नांनी कोणताही पालक विचलित होणारच.

२४ तासांत आढळले ४२,७७६ कोरोना रुग्ण

तेव्हा आम्ही दोघे जे काही करत होतो ते नवरा आणि बायको यांच्यामध्ये सामान्यपणे होणारी व योग्य गोष्ट आहे. लग्नानंतर पती आणि पत्नी एकमेकांबरोबर प्रेम व्यक्त करण्यासाठी असे एकत्र येतात. ती एक प्रचलित पद्धत आहे. हे अगदी शांतपणे सांगणं, व्यक्त करणं आवश्यक आहे. ते करताना मुलांना जवळ घ्या, विश्वासात घ्या आणि मूल कम्फर्टेबल आहे असं निश्चित झाल्यानंतरच तुम्ही म्हणू शकता की, ‘त्या प्रसंगात आम्ही एकांतात होतो व तू अचानक आत येशील असं आम्हाला अपेक्षित नव्हतं.’ हे बोलल्यानंतर तुम्हाला दोघांनाही आवश्यक वाटत असेल तेव्हा हवं तर पॉज घ्या. सर्व सांगून झाल्यावरती आई आणि बाबा या दोघांनी आपल्या मुलाला जवळ घेणं आवश्यक आहे. मुलांना आश्वासकपणे संवाद साधल्यास मुलांच्या मनात सदरच्या प्रसंगाबद्दलची घृणा किंवा त्याचे विचित्र ओरखडे उमटणार नाहीत. प्रत्यक्षात मात्र अनेकदा पालक मुलांना रागावतात, मारहाण करतात किंवा त्यांच्यावरती प्रचंड वचक बसवतात. अशाप्रकारच्या पालकांच्या आक्रमक वर्तनामधून भविष्यात मुलांचं वर्तन विस्फोटक होऊ शकतं.

ते होऊ नये यासाठी कधी समुपदेशनाची मुलाला गरज पडली तर तज्ज्ञांद्वारा समुपदेशन नक्की करावं. याव्यतिरिक्त पती-पत्नी यांनी आपले कामजीवन व्यक्त करण्यापूर्वी रूमचा दरवाजा आतून नक्की बंद आहे याची खात्री करणे जास्त सोयीचे आहे. काही मुलं मुळातच खूप सुज्ञ असतात. बेडरूममध्ये येताना दरवाजा नॉक करून येतात. तशी मुलांना सवय नसेल तर ती लावावी. असे काही प्रसंग घडलेच तर प्रसंगाची लाज वाटून घेता कामा नये. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण अगदी निर्लज्ज असावं. मुलांनी पाहिलं असेल तर लैंगिक इच्छांची पूर्ती करताना आम्ही काहीच केलं नाही असे नाटक करण्याची गरज नाही. तसे जर पालकांनी केले तर त्या वर्तनाबद्दल मुलांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण होते असं काय सिक्रेट आहे जे आपल्याला पाहता आलं नाही किंवा सांगितलं गेलं नाही याचा शोध मुलं सतत घेतात. विवाह आणि कौटुंबिक सल्ला देणारे तज्ज्ञ यांच्या मते, आपल्या पालकांना मुलांनी लैंगिक संबंधांच्या वेळी पाहिल्यास त्यांना धक्का बसेलच असे नाही पण काही वेळा त्यांना धक्का बसू शकतो. किंवा तुम्ही भांडत आहात असेही त्यांना वाटू शकते.

अशा वेळी आपल्या मुलांना त्यांच्या आकलनाच्या पातळीनुसार ‘आम्हाला थोडा वेळ खाजगीत हवा होता म्हणून आम्ही या रूममध्ये होतो. तू इकडे येशील अशी कल्पना असती तर आम्ही नंतर भेटलो असतो.’ असे समजावून सांगताना मुलांच्या भावनांप्रति अतिशय सजग राहत त्यांना समानुभूती देत हा विषय हळुवारपणे सांगितला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा भारतीय समाजात लैंगिक संबंधाच्या संदर्भात कमालीचं रहस्य जोपासलं जातं. ज्यामुळे मुलांना सत्य परिस्थितीचं आकलन वेळेवरती न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. खरं म्हणजे अशा प्रसंगाला सामोरे जाताना पालक आणि मुलांचं मोकळ्या वातावरणामध्ये चर्चा आणि प्रशिक्षण होणं अत्यंत आवश्यक आहे. ते नेमकं कसं करावं याचे अनेकविध मार्ग असू शकतात ते पालकांनी आपल्या कम्फर्ट झोननुसार ठरवावं.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या