22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषविनाकारण श्रेयवाद

विनाकारण श्रेयवाद

अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारपद्धती एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करीत नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे या पद्धतींमध्ये तुलना करणे आणि एखाद्या पद्धतीला छोटी किंवा मोठी सिद्ध करण्याचा प्रयत्नही टाळला पाहिजे. आज या संकटाच्या काळात प्रत्येक चिकित्सापद्धतीमधील प्रामाणिक आणि मेहनती डॉक्टरांना सन्मान दिला पाहिजे. वादग्रस्त वक्तव्ये करून विनाकारण वाद निर्माण करण्याची ही वेळ नाही.

एकमत ऑनलाईन

कोरोनाकाळात कठोर मेहनत घेत असलेल्या डॉक्टरांचा बाबा रामदेव पूर्णपणे आदर राखतात आणि आधुनिक चिकित्सापद्धतीने उपचार करणा-यांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही अढी नाही, असे पतंजली योगपीठने म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) घेतलेल्या आक्षेपानंतर हा पवित्रा घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडीओत बाबा रामदेव यांनी असे म्हटले होते की, ‘अ‍ॅलोपॅथी हे एक मूर्खपणाचे शास्त्र आहे आणि कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी मंजूर केलेली रेमडेसिवीर, फेवीफ्लू आणि अन्य औषधे कोविडवर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथी औषधे घेतल्यानंतर लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे.’ बाबा रामदेव यांच्या या विधानानंतर आयएमएने त्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास तसेच वक्तव्य मागे घेण्यास सांगितले. या मुद्यावरून पतंजली योगपीठाकडून काही पावले मागे घेतली गेली आणि त्यानंतर बाबा रामदेव यांनी औषधनिर्मिती कंपन्यांसह आयएमएला २५ प्रश्न विचारले. हे प्रश्न अनेक आजारांवरील उपचारांसंदर्भात आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून अनेक आजारांवरील आधुनिक औषधांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

बाबा रामदेवांबाबत सर्वांत मोठी अडचण अशी की, ते प्रत्येक विषयावर आपले ज्ञान पाजळू लागतात. यापूर्वीही अनेकदा त्यांनी अशी अनेक अतार्किक वक्तव्ये केली आहेत. विषय काळ्या पैशांचा असो वा एखादा राजकीय मुद्दा असो, ते प्रत्येक विषयावर असे काही भाष्य करतात जणू एखादा तज्ज्ञच बोलत आहे. ते योगगुरू आहेत, म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या केंद्रस्थानी योग असायला हवा. परंतु योगाविषयी बोलता-बोलता हळूहळू त्यांनी प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन सुरू केले. एकदा ‘आप की अदालत’ या रजत शर्मा यांच्या कार्यक्रमात त्यांनी असे विचारले होते की, तुम्ही ७५ ते ८० रुपये लिटर दराने पेट्रोल देणा-या पक्षाला मत द्याल की ३५ ते ४० रुपये लिटर दराने पेट्रोल देणा-या पक्षाला मत द्याल? आज कोणता पक्ष किती दराने पेट्रोल देत आहे, हे संपूर्ण देश पाहतो आहे. कधी-कधी त्यांच्या हालचाली पाहून अशी शंका येते, की ते आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच असे करीत असावेत.

वस्तुत: प्रत्येक चिकित्सापद्धतीचे आपापले गुण आणि मर्यादा असतात. त्यामुळे दोन चिकित्सापद्धतींना एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे केले जाऊ शकत नाही. परंतु काही व्यापारी आणि आरोग्यासंबंधी पेशात काम करणारे काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नेहमी दोन चिकित्सापद्धतींची तुलना करतात आणि एकला उत्तम आणि दुसरीला दुय्यम सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतात, हे दुर्दैवी आहे. एखाद्या गोष्टीशी जेव्हा आपला स्वार्थ जोडला जातो, तेव्हा आपण योग्य आणि तर्कसंगत विश्लेषण करीत नाही.

अ‍ॅलोपॅथी चिकित्सापद्धतीला काही डॉक्टरांनी आपल्या चुकीच्या कामामुळे बदनाम केले आहे, हे खरे आहे. परंतु त्या आधारावर ही चिकित्सापद्धती किंवा सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे कसे म्हणता येईल? संकटाच्या या घडीला अ‍ॅलोपॅथी डॉक्टर खांद्याला खांदा लावून घड्याळाकडे न पाहता तासन्तास काम करीत आहेत. आपल्याला काही वेळासाठी मास्क घातला तरी गुदमरल्यासारखे होते; परंतु डॉक्टर संपूर्ण दिवसभर मास्क आणि पीपीई किट घालून काम करीत आहेत. त्यामुळे संकटाच्या या घडीला अ‍ॅलोपॅथी चिकित्सापद्धती आणि डॉक्टरांवर प्रश्न उपस्थित करणे हा त्यांचा केलेला अनादरच ठरतो. या काळात अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीच्या संरचनेत काही नव्या प्रकारचे शिकले-सवरलेले दलाल निर्माण झाले आहेत हेही खरे. काही डॉक्टरांनी उपचारांच्या क्षेत्राला दलालीचा अड्डा बनविले आहे. आपण अशी एक संरचना उभी केली आहे, ज्यात गरीब माणसाला जागाच नाही. कोरोनाकाळात काही डॉक्टरांनी आणि या क्षेत्राशी निगडीत काही व्यापा-यांनी या आपत्तीचे रूपांतर संधीत केले, हे दु:खद आहे. परंतु या आधारावर संपूर्ण चिकित्सा यंत्रणेला आरोपीच्या पिंज-यात उभे करता येणार नाही.

बाबा रामदेव यांनी फार्मा कंपन्या आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना २५ प्रश्न विचारले आहेत. त्यांनी रक्तदाब, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, अर्थ्रायटिस, हिपेटायटिस, डोकेदुखी, मायग्रेनसह अनेक आजारांचा उल्लेख करून असे विचारले आहे की, अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीत या आजारांवर कायमस्वरूपी उपचार आहे का? हा प्रश्न रामदेव बाबांनाही विचारला जाऊ शकतो, की आयुर्वेद आणि योगामध्ये या आजारांसाठी कोणता कायमस्वरूपी उपचार आहे? योग आणि आयुर्वेदातील अनेक बाबी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवितात हे नि:संशय; परंतु पतंजली योगपीठाशी संबंधित बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण असा दावा करतात की, योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही आयुष्यभर निरोगी राहणार आहोत. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनीही अ‍ॅलोपॅथीच्या सेवा घेतल्या आहेत. त्यामुळेच कोणत्याही एखाद्या उपचारपद्धतीवर प्रमाणापेक्षा अधिक विश्वास आणि त्याचा अहंकार बाळगणे तर्कसंगत ठरत नाही. नियमितपणे योग करणारे आणि आयुर्वेदाला जवळ करणारे अनेकजण आजारी पडल्याची उदाहरणे दिसतात.

आज अ‍ॅलोपॅथी चिकित्सापद्धती आणि या पद्धतीच्या व्यापारीकरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु आयुर्वेदिक उपचारपद्धती व्यापारीकरणाच्या जंजाळापासून दूर आहे, असा दावा करता येऊ शकतो का? आज आयुर्वेदाचा वापरही काही व्यक्तींकडून स्वार्थासाठी केला जात आहे, हेच कटू सत्य आहे. आजच्या काळात आयुर्वेदाकडे प्रत्येक समस्येचे निराकरण आहे, असा भ्रम काही मठाधीशांकडून पसरविण्यात येत आहे. योग आणि आयुर्वेदावर केंद्रित असणारी अत्यंत महागडी निरोगाधाम केंद्रेही पॅकेजच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असतात. आज बाजारात आयुर्वेदाच्या नावाने हजारो उत्पादने विकली जात आहेत. या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये मोठमोठे दावे केले जात आहेत. परंतु जेव्हा ही उत्पादने वापरली जातात, तेव्हा अनेकांना आपण फसवले गेलो आहोत, असा अनुभव येतो. ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवीसुद्धा नाही आणि कोणताच अनुभव नाही, असे लोकही आयुर्वेदाबाबत वेगवेगळे दावे करताना आपल्याला दिसतात.

आयुर्वेद हे आपले परंपरागत ज्ञान आहे आणि त्यातील बरीच औषधे आपल्या घरगुती मसाले आणि जडी-बुटींच्या साह्यानेच तयार केली जातात हे खरे आहे. परंतु जोपर्यंत शरीरक्रियांच्या विज्ञानाची सविस्तर माहिती नसेल, तोपर्यंत आयुर्वेदाविषयी आपल्याला अधिकारवाणीने कसे बोलता येईल? ज्या मंडळींना शरीरक्रिया विज्ञानाची मूलभूत माहितीसुद्धा नाही, असे लोक आयुर्वेदाविषयी समाजाला ज्ञान देऊ लागले आहेत, हे दु:खद आहे.

अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारपद्धती एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करीत नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे या पद्धतींमध्ये तुलना करणे आणि एखाद्या पद्धतीला छोटी किंवा मोठी सिद्ध करण्याचा प्रयत्नही टाळला पाहिजे. कारण ते तर्कसंगत ठरत नाही. प्रत्येक उपचारपद्धतीचे गुणदोष आहेत आणि प्रत्येक उपचारपद्धतीत चांगले-वाईट लोकही आहेत. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही उपचारपद्धतीविषयी बोलघेवडेपणा करणे योग्य ठरत नाही. आज या संकटाच्या काळात प्रत्येक चिकित्सापद्धतीमधील प्रामाणिक आणि मेहनती डॉक्टरांना सन्मान दिला पाहिजे. वादग्रस्त वक्तव्ये करून विनाकारण वाद निर्माण करण्याची ही वेळ नाही.

प्रा. विजया पंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या