22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषआधुनिकीकरणाने उद्ध्वस्त झालेल्या शिंप्याची करुण कहाणी ‘उसवण’

आधुनिकीकरणाने उद्ध्वस्त झालेल्या शिंप्याची करुण कहाणी ‘उसवण’

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर येथील युवा कादंबरीकार श्री. देवीदास सौदागर लिखित ‘उसवण’ ही पहिलीच कादंबरी असून तीमध्ये आधुनिकीकरणाच्या हव्यासातून लोकांच्या जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे गावातल्या विठू नावाच्या एका गरीब शिंप्याच्या आयुष्याची झालेली पडझड आणि कोसळण समग्रतेने व्यक्त झाली आहे. पत्नी गंगा आणि दोन मुले असे चौकोनी कुटुंब असलेला विठू गावातल्या लोकांचे कपडे शिवून आपल्या छोट्या कुटुंबाची गुजराण करीत असतो; परंतु हळूहळू गावातल्या लोकांचा तालुक्याकडे ओढा वाढतो. त्यातच त्याच्या गावातही रेडिमेड कपड्यांची दुकाने होतात. शिवणकाम नसल्याने त्याला दुकानाचे भाडे देणेही अवघड होऊन बसते. लोकांची जुनी-पानी कापडं शिवत बसण्याची वेळ विठूवर येते. ब-याचदा त्याला उधारीवरही कपडे शिवून द्यावे लागतात आणि गावातली काही बडी मंडळी पारंपरिक बलुतेदारीच्या मानसिकतेतून त्याची मानहानी करून कमी पैसेही देतात.

यातच गावात घोंघावणा-या गटा-तटाच्या राजकारणाचाही तो बळी ठरतो. यातच गावातल्या लक्ष्मीआईच्या यात्रेवेळेस गावातल्या काही टारगट पोरांसोबत वर्गणीसाठी त्याचे भांडण होते. पुन्हा विविध रंगांचे (पक्षांचे) झेंडे शिवून देतेवेळेस त्याच्या दुकानातच दोन गटांची हाणामारी होते आणि त्याला या प्रकरणात पोलिस स्टेशनच्याही वा-या कराव्या लागतात. शेवटी मागे लागलेल्या सा-या शुक्लकाष्ठाला कंटाळून तो जड अंत:करणाने दुकानच बंद करतो. असे एकरेषीय कथानक असलेली ही कहाणी पारंपरिक रीतीने शिंपी व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या जगण्याची झालेली परवड मराठवाडी बोली भाषेत आणि ओघवत्या शैलीत लेखकाने मांडल्यामुळे भावस्पर्शी झाली आहे. यासोबतच गावातल्या राजकारणाचे हिडीस रूप, पारंपरिक सरंजामी मानसिकतेतून घडणारे गावातल्या धनिकांचे बेमुर्वत वर्तन, चंगळवादी मानसिकतेमधून उसवत जाणा-या नातेसंबंधाची वीण आदींचेही नेमके चित्र इथे दृगोच्चर झाले आहे. या सर्व बाबींमुळे ज्येष्ठ लेखक डॉ. आनंद यादव यांच्या ‘गोतावळा’ कादंबरीची आठवण करून देणा-या ‘उसवण’ मधील कथानायक विठूच्या आयुष्याची झालेली ‘उसवण’वाचक मनाला अस्वस्थ करून जाते, हे नक्की ! हेच या कादंबरीचे यश आहे.

उसवण – (कादंबरी)
लेखक – देवीदास सौदागर
प्रकाशक – देशमुख आणि कंपनी
प्रा. लि.
पुणे. (९३७०८ ४९०५६ )
पृष्ठे – ११६
मूल्य – रु. १६०/-
मुखपृष्ठ – कौस्तुभ घाणेकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या