27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeविशेषवेदकालीन स्त्रिया

वेदकालीन स्त्रिया

एकमत ऑनलाईन

स्त्री मुक्त असावी, स्वतंत्र असावी, रूढींचा, परंपरांचा त्रास न व्हावा ही आजच्या प्रगत समाजाची विचारसरणी ! परंतु आजची स्त्री समाजरचनेच्या काही असंतुलित धारणांच्या कारणाने बंधनग्रस्त आहे. तशी ती जाणवते. वेदकालीन स्त्रियांना जातीचे, समाजाचे बंधन नव्हते. वेदकाळात स्त्रीला प्रतिभा होती. समाजात, राजकारणात, धर्मकारणात या सर्वात समान प्रतिष्ठा होती. एक आधुनिक विचार त्याकाळी होता, तो म्हणजे शरीराने, मनाने पूर्ण पक्व झाल्याशिवाय स्त्रीचा विवाह होत नसे. ताराबाई मोडक म्हणतात ते खरंच आहे. त्या म्हणतात, मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य! आणि हेच स्वातंत्र्य वेदकालीन स्त्रियांच्या यशाचं गमक होतं.

स्त्रीकिंवा नारीसंबंधी कामभावनेचा तीळमात्र गंध नसलेल्या मातृपूजेचा, देवीपूजेचा मुग्धमधुर असा भाव ठेवून निष्काम पूजेची सुरुवात जगामध्ये प्रथम आपल्या देशात म्हणजे भारतात झाली. कुलदेवीच्या रूपाने स्त्री घरोघरी पूजली जाऊ लागली. सन्मान पावू लागली. त्या भावनेचा आदर, सन्मानाचे फळ भारताला मिळाले. सीता, द्रौपदी, अहिल्या, मंदोदरी अशा अनेक स्त्रीप्रभृतींनी शालीन अशा मातृभावभूमीत उज्ज्वल देवी प्रतिमांनी सर्वप्रथम भारतात पदार्पण करून या आपल्या देशाला पावन केले. आजही स्त्रीरत्नांची भर आपल्या देशात पडत आहे. वैदिक आणि औपनिषदिक युगातील नारीउपासना ही धीट, स्थिर आणि शांत भावाची होती. स्त्रीला सर्व विषयांत समान अधिकार प्रदान केलेला होता. स्वत:च्या बुद्धिकौशल्याने आणि परमात्म्याच्या साक्षात्काराने तिला ऋषीत्व प्राप्त करून घेता येत होतं. कल्पक आदी संहितांमध्ये उपनिषदांमध्ये ठिकठिकाणी नारीऋषींचा उल्लेख आढळतो. गार्गी, मैत्रेयी स्त्रीऋषी धर्मचर्चेत सहभागी झाल्याचे उल्लेख आहेत. अश्वमेध यज्ञात राजाच्या बरोबरीने राणी सहभागी झाल्याचेही दाखले आहेत. धर्मकारण, राजकारण याचप्रमाणे व्यावहारिक जगात देखील पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा समान अधिकार होता. वैदिक काळातील स्त्री ही स्वतंत्र आणि मुक्त होती. पुरुष प्रकृतीच्या समसमान संयोगाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वैदिक काळातील समाजजीवन होय.

स्त्री मुक्त असावी, स्वतंत्र असावी, रूढींचा, परंपरांचा त्रास न व्हावा ही आजच्या प्रगत समाजाची विचारसरणी! परंतु आजची स्त्री समाजरचनेच्या काही असंतुलित धारणांच्या कारणाने बंधनग्रस्त आहे. तशी ती जाणवते. वेदकालीन स्त्रियांना जातीचे, समाजाचे बंधन नव्हते. वेदकाळात स्त्रीला प्रतिभा होती. समाजात, राजकारणात, धर्मकारणात या सर्वात समान प्रतिष्ठा होती. काही बाबतीत ती पुरुषांपेक्षा अधिकत्वाने श्रेष्ठ, विद्वान होती. ती सर्व परिस्थितीमध्ये पतीला सावरणारी होती. विवेक, सत्याची कास धरणारी, मनाने सुदृढ आणि उदार होती. मुलांवर उत्तम संस्कार करणारी, घराला घरपण देणारी, जपणारी अशी होती. वैदिक काळात मुलांच्या बरोबरीने मुलींना देखील गुरुकुलात शिक्षण दिले जात असे. अथर्ववेदानुसार मुलींचाही उपनयन संस्कार होत होता. आजही काही ठिकाणी मुलींचा उपनयन संस्कार केला जातो. आपल्या संस्कृतीत मुलांची मुंज झाली नाही तर विवाह केला जात नाही.

त्याकाळात मुलींना देखील हा नियम लागू होता. मुलगी व्हावी म्हणून गरोदरपणी विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण केले जात असे. स्त्रियांना लष्करी शिक्षणही दिले जात असे. कणखर मनासोबत शरीरही बळकट होण्यासाठी युद्धशास्त्राचे संपूर्ण ज्ञान स्त्रियांना लाभावे असा समाजाचा प्रयत्न होता. वृत्तांशी इंद्र लढला तेव्हा सरस्वतीने त्याला साहाय्य केल्याचे उल्लेख आढळून येतात. इंद्राणीला तर सैन्याची देवता म्हणून गौरविले आहे. एक आधुनिक विचार त्याकाळी होता, तो म्हणजे शरीराने, मनाने पूर्ण पक्व झाल्याशिवाय स्त्रीचा विवाह होत नसे. बालविवाहाची प्रथा वैदिक काळात आढळून येत नाही. स्त्रियांना आपला पती स्वत: निवडण्याचा अधिकार होता. मनासारखा वर न मिळाल्यास आजन्म कुमारिका राहण्याचेही स्वातंत्र्य मुलींना होते. हे स्वातंत्र्य समाजाने त्यांना देऊन त्यांचा आदर केला होता. त्या मोकळ्या मनाने विविध आकर्षक पोशाखात सभासमारंभाला जात असत. पंडितांच्या सभा गाजवत असत. वेदकालीन विवाह स्वयंवर पद्धतीने होत असे.

मुलींच्या वडिलांना वरसंशोधनार्थ पायपीट करावी लागत नसे. मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले, वधुपित्याला खूप त्रास सहन करावा लागला, सास-यांनी केवळ पैशासाठी मुलीला जाळले असे विविध प्रकार वेदकाळात नव्हते. हेच त्या जीवनशैलीचे अनमोल श्रेष्ठत्व होते. अशा वेदकाळातील काही स्त्रीतत्वे आजही अजरामर आहेत, स्मरणीय आणि वंदनीय आहेत याची जाणीव सर्वांना आहे. त्या स्त्रियांची नावे आजच्या आधुनिक तरुणी आपल्या मुलींची ठेवतात. त्या नावामागच्या इतिहासकथा जाणून घेतात, तेव्हा वाटतं गार्गी, मैत्रेयी आजही जिवंत आहेत. आपल्या अवतीभोवती त्यांचे अस्तित्व जाणवते. हेच त्याकाळातील सुखद वैशिष्ट्य आहे. वेदकालीन काळात तरुण स्त्री, पुरुष एकत्र भेटत. अतिशय सुंदर आकर्षक पोशाखात आपल्या जन्मजात सौंदर्याचा, कलांचा आविष्कार घडवत असत. या मेळाव्यातूनच आपापले जीवनसाथी निवडत असत. आजच्या काळात होणारा वधू-वर सूचक मेळावा ही संकल्पना फार प्राचीन आहे. त्यामागचा उद्देश हा अतिशय मोलाचा होता.

आजही आपण स्वतंत्र आहोत. आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते म्हणून समाजात वावरतो. भाषणं, संमेलने, गाजवितो. पण कुठेतरी मनात भय आहे. समाजाचं. स्वत: स्त्री असल्याचं. तो काळ निर्भय होता. समसमान विचारांचा होता. स्त्री-पुरुष आपल्यात परस्परांविषयी आदर ठेवून होते. सगळ्यात महत्त्वाचं असं की अहंकार नव्हता. आजही वेदकाळ पुन्हा आपण आणू शकतो. यासाठी प्रयत्न करू शकतो. असे म्हणता येईल की वेदकाळ मागच्या दारात आपल्या हाकेची प्रतीक्षा करतोय. जरा हाक मारून बघा! ‘पुनश्च हरि ओम’ हा निसर्गाचा नियम आहे. तो केवळ निसर्गाला नाही तर निसर्गाचा भाग असलेल्या आपल्याला देखील लागू होतो. आजही स्त्रीची, आपली शरीररचना, मनरचना वेदकालीन स्त्रियांसारखीच आहे. आजही आपल्यात ती ताकद, तो स्वाभिमान आहे, पण जरा निद्रिस्त आहे. डोक्यावरील निद्रेचे सावट झटकून आत डोकावून बघाल तर आपल्यातही गार्गी, मैत्रेयी निश्चितच आढळेल. पिढी-दरपिढी जग बदलतंय. प्रत्येक बदल स्वत: सुखावह नसला तरी त्रासदायक देखील नाही! फक्त आपल्याला नक्की काय हवंय हे आपल्याला समजायला हवं ! केवळ स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना करू नयेत. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. तर मग स्त्रियांचा अट्टाहास का? त्यांना कोणतं असं स्वातंत्र्य हवं असतं. त्यासाठी आठ मार्चची धडपड असते. अहो निसर्गात असणारी हवा स्त्रीलिंगीच आहे ना! ती कोणाच्या अधिकाराने विहरते? तिची ती स्वतंत्र आहे. अशाच हवेच्या लहरीसारख्या वेदकालीन स्त्रिया स्वतंत्र होत्या. ताराबाई मोडक म्हणतात ते खरंच आहे.

– गौरी सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या