30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeविशेष‘ऑक्सिजन’वरील व्यवस्थेचे बळी

‘ऑक्सिजन’वरील व्यवस्थेचे बळी

एकमत ऑनलाईन

नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ हून अधिक कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण त्याचबरोबर लाजीरवाणी देखील आहे. याप्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले असून पीडितांच्या नातेवाईकांना भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे. परंतु नाशिकची घटना ही पहिलीच नाही. कोविड महामारीच्या काळात शासकीय बेपर्वाईचा, अक्षम्य हलगर्जीचा आणि बेजबाबदार यंत्रणेचा असा अनुभव यापूर्वीही आला आहे.
देशात गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. जबलपूरच्या दोन रुग्णालयांत पाच नागरिकांचा, मुंबईच्या नालासोपारा येथील सात जणांचा, शहाडोल येथे १२ जणांचा, कनोज येथे चार जणांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला आहे. नाशिकच्या घटनेच्या दिवशीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ऑक्सिजन न मिळाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोविड वॉर्डात आग लागणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले आहेत. या घटनांवरून रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येतो. विशेष म्हणजे या घटनांनंतरही आरोग्य विभागांकडून कोणत्याही प्रकारची सुधारणा होताना दिसून येत नाही. आजच्या काळात रुग्णालयांवर प्रचंड दबाव आहे. डॉक्टर, सहायक कर्मचारी आणि व्यवस्थापनातील लोक अहोरात्र कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत, हे मान्यच. परंतु त्याच वेळी यंत्रणेतील उणिवांमुळे लोकांचे हकनाक बळी जात आहेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे. गतवर्षी देशातील अनेक राज्यांत कोविड रुग्णालयाला आग लागल्याच्या घटना घडल्या आणि अनेकांचे बळी देखील गेले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने गोंधळात ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला. वस्तुत: त्यावेळी दवाखान्यात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण ऑक्सिजनवर होते. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने रुग्णांचा श्वास कोंडला. गळती थांबवण्यासाठी सुमारे दोन तास पुरवठा थांबवण्यात आल्याने यादरम्यान २२ हून अधिक जणांचे प्राण गेले. या घटनेच्या वेळी रुग्णालयात १७० हून अधिक रुग्ण होते आणि त्यापैकी अनेक जण जीवरक्षक प्रणालीवर होते. ऑक्सिजनचा पुरवठा थांबला आणि यातील काही रुग्ण अक्षरश: तडफडून गेले. याला दुर्घटना म्हटले जात असले आणि तांत्रिक बिघाडामुळे ती घडल्याचे समर्थन केले जात असले तरी ती पूर्णत: मानवनिर्मित चूक आहे हे सत्य नाकारता येणार नाही.

मंगळावर प्राणवायूचे अस्तित्व

या ऑक्सिजन प्लँटच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडे होती, ऑक्सिजन टाकीचे पुनर्भरण करताना पाईप फाटला असल्यास त्याची जबाबदारी कोणाची, सदर ठेकेदाराबाबत करार करताना महापालिका प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीसंदर्भात कोणत्या अटी घातल्या होत्या, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायला हवीत. या रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीची तोटी खराब झाली होती. ती बदलण्यास तब्बल दोन तास लागले आणि दरम्यानच्या काळात सगळा प्राणवायू बाहेर वाहून गेला. परिणामी, कृत्रिम श्वसनाचा आधार घेऊन मृत्यूशी झुंज देणारे रुग्ण मरण पावले. आपल्याकडे दुर्घटना घडल्यानंतर समोर येणारी माहिती आणि सत्य माहिती यामध्ये बरेचदा तफावत असते. त्यामुळे ऑक्सिजनची गळती नेमकी कशामुळे झाली याचाही गांभीर्याने तपास करायला हवा. साठा आणि पुरवठासाखळी यात कोणत्या त्रुटी राहिल्या का?, ऑक्सिजन यंत्रणेवर लक्ष ठेवणा-या मंडळींकडून हलगर्जीपणा झाला का? या गोष्टींचाही तपास होणे गरजेचे आहे. नाशिकच्या रुग्णालयातील ऑक्सिजनच्या यंत्रणेची देखभाल करण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारी चौकशीनंतर कंपनीवर कोणती कारवाई केली जाते हे पाहावे लागेल.

यानिमित्ताने एका मुद्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. आपल्याकडे बॅक अप सिस्टीम किंवा क्रायसिस मॅनेजमेंट या नियोजनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत जराही गांभीर्य दिसत नाही. मध्यंतरी, मुंबईमध्ये झालेला ब्लॅकआऊट असेल, शेअर बाजाराचा सर्व्हर बंद पडणे असेल किंवा ऑक्सिजन गळतीसारख्या घटना असतील; यामध्ये कोणत्याही क्षणी तांत्रिक बिघाड होऊ शकतो हे गृहित धरून पर्यायी व्यवस्था तयार का ठेवली जात नाही? आज माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्या असोत किंवा संगणकक्षेत्रातील अन्य कंपन्या असोत; त्यांच्याकडे बॅक अप सर्व्हरपासून इनव्हर्टर, लीजलाईन, जनरेटर अशा अनेक गोष्टी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तयार असतात. मग लोकांच्या जिवाशी, प्राणाशी निगडित असलेल्या क्षेत्रात नियोजन करताना असा विचार का केला जात नाही? कोरोनाच्या लाटेत घडणा-या दुर्घटनांनी आपल्याला ज्या अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, त्यामध्ये हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आहे.

वास्तविक कोरोनाची दुसरी लाट ही भारतीयांच्या संयमाचीच नाही तर क्षमतेची देखील परीक्षा पाहत आहे. सरकारकडून आखल्या जाणा-या उपाययोजना, तत्परता आणि नागरिकांची शिस्त ही कोविडवर मात करण्यासाठी महत्त्वाची आहे. पण या लाटेपुढे सर्वजण हतबल स्थितीत आहेत. दुसरीकडे तैवान, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी कोविडचा समर्थपणे मुकाबला करत आदर्श प्रस्थापित केला आहे. इस्रायल आणि यूएई शंभर टक्के लसीकरण होण्याच्या मार्गावर आहेत. एवढेच नाही तर इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने मास्कचे बंधन मागे घेतले आहे. डेन्मार्ककडून युरोपिय प्रवाशांना देशात येण्याची परवानगी देण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. तेथील लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उलट तेथील व्यवस्थापनाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्याकडे जेव्हा चार-पाच महिन्यांपूर्वी कोरोना संक्रमणाचे आकडे कमी होत होते तेव्हाच अनेक तज्ज्ञांनी दुसरी लाट येणार याची साधार भीती वर्तवली होती. मग रुग्णसंख्या घटत असतानाच्या आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत असतानाच्या काळात सुधारणांसाठीची पावले का टाकण्यात आली नाहीत? दिल्लीसारख्या राज्यात अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. अनेक टीकाकारांनीही त्याची प्रशंसा केली. अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात का दिसून आले नाहीत?

दुस-या लाटेत सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे तो ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा. रुग्णवाढीचा वेग प्रचंड असल्याने ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे.एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात भारतातून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट होऊन ९३०१ मेट्रिक टनवर पोचली. त्यापूर्वीच्या वर्षात २०१९-२०२० या काळात भारताने ४५१४ मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची निर्यात केली. २०२० च्या जानेवारीत ३५२ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात करण्यात आली तर जानेवारी २०२१ मध्ये ऑक्सिजनची निर्यात ७३४ मेट्रिक टनपर्यंत वाढली होती. टंचाईच्या काळातही निर्यात सुरू राहिली. या स्थितीवर सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले की, एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत ९८८४ मेट्रिक टन औद्योगिक ऑक्सिजनची निर्यात करण्यात आली. भारताने २०२०-२१ या काळात केवळ १२ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनची निर्यात केली, असे सरकारचे म्हणणे आहे. सध्या ऑक्सिजनच्या अभावामुळे देशात जी आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे त्यामुळे ऑक्सिजन निर्यातीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पण याबाबत आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आरोग्य यंत्रणेतील सुधारणांबाबत सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. पुढील काही आठवडे ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आणि सुरळित पुरवठ्याबाबत अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

डॉ. जयदेवी पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या