20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषग्रामोत्थान करणारी धवलक्रांती

ग्रामोत्थान करणारी धवलक्रांती

एकमत ऑनलाईन

दूध हे परिपूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते. जवळपास सर्व प्रकारची जीवनसत्वे, कर्बोदके, कॅल्शियम, प्रथिने आणि अन्य पोषण तत्त्वे दुधातून मिळतात. म्हणून दुधाला पूर्ण आहार किंवा उत्तम पोषण देणारा आहार म्हटले जाते. अन्न म्हणून दुधाचे महत्त्व वाढत्या वयाच्या व्यक्तीसाठी अनन्यसाधारण आहे. जन्माला आल्यानंतर साधारण १५ वर्षांपर्यंत व्यक्तीचे जे पोषण दुधामुळे होते ते इतर कोणत्याही पदार्थाने होत नाही. भारतामध्ये दुधाच्या दृष्टीने म्हैस, गाय आणि शेळी हे प्रमुख स्रोत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये संकरित गायींमुळे दुधाच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज जगातील सर्वांत जास्त पशुधन भारतात आहे.

त्याचबरोबरीने जगातील सर्वाधिक दुग्धोत्पादनही भारतातच होते. असे असले तरी तुलनात्मकदृष्ट्या भारतातील गायी, म्हशींची दूधउत्पादकता किंवा मिल्क प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, अमेरिका, युरोप न्यूझिलंड आदी जगभरातील दुभती जनावरे दूधहंगामाच्या काळात जितके दूध देतात त्यापेक्षा भारतातील गायी, म्हशींकडून मिळणारे दूध हे लक्षणीय म्हणावे इतके कमी आहे. पाश्चिमात्त्य जगात अन्न म्हणून दूध घेण्यापेक्षा दुधाचा वापर चीज, बटर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसाठी अधिक होतो.

भारतामध्ये श्रीकृष्णाच्या काळापासून शेतीच्या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धउत्पादन व्यवसाय केला जात आहे. हा व्यवसाय अतिशय प्रेमाने, अगत्याने केला गेला. एक काळ असा होता की, या राजांचे राजेपण मोजण्याचे एक माप त्यांच्याकडील गायींची संख्या किती आहे हे होते. थोडक्यात, पशुधन हे राजाच्या मोठेपणाचे, सामर्थ्याचे एक लक्षण होते. दुग्धव्यवसायामुळे देशातील शेतक-याच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागला हे वास्तव आहे. आज देशातील शेतजमिनींचे क्षेत्रफळ मोठे असले तरी शेतक-याकडील सरासरी दरडोई शेतजमीन ही एकर-दोन एकर इतकीच आहे. सुमारे ७० टक्के शेतकरी हे अडीच एकरपेक्षा कमी जमीनधारणा असणारे आहेत. अशा शेतकरी कुटुंबाला शेतीच्या उत्पन्नाला पूरक उत्पन्न म्हणून दुधाचा धंदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शेतीतील प्रत्यक्ष कामाचा कालावधी वगळता उर्वरित वेळेत दुधाचा धंदा हा रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे हा रोजगार वर्षभर सुरू राहतो. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती या दुहेरी अंगाने दुग्धव्यवसाय फलदायी आहे.

ग्लोबल टेंडरमधून लसींसाठी राज्यांत स्पर्धा लावताय का?

दूध व्यवसायाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे गायी, म्हशी, शेळी- बकरी या दुभत्या जनावरांसाठी शेतीमध्ये तयार झालेला पालापाचोळा, हिरवे पीक, गवत या सर्वांचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. अलीकडच्या काळात बाजारातून तयार पशुखाद्य विकत घेऊन या जनावरांना दिले जाते. पण उसाचे, जोंधळ्याचे, बाजरीचे चिपाड हेच प्रामुख्याने या पशुंचे आहारघटक असतात. व्यावसायिकदृष्ट्या दुग्धोत्पादन करणारा शेतकरी असेल तर तो हरभरा डाळीसारखे प्रथिनसमृद्ध धान्य भरडा करून या पशुंना खायला घालतो.

दुग्धोत्पादन व्यवसायाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातून सर्वाधिक विकेंद्रित रोजगारव्यवस्था निर्माण होते. घराघरांमध्ये यामुळे रोजगार निर्माण होतात. त्यातही या रोजगारामध्ये महिलांचे प्राधान्य असते. पूर्वीच्या काळापासून दुभती जनावरे असणा-या घरांमध्ये दूध, दही, तूप यांची विक्री करून मिळणारा पैसा हा घरातील स्त्रीच्या हाती जातो. अलीकडील काळात तर दुधाच्या उत्पन्नातून मिळणा-या पैशावर पहिला हक्क घरातील स्त्रीचा असेल हे धोरण म्हणून मान्य करण्यात आले आहे. कारण या व्यवसायाची सर्व काळजी ती महिलाच घेत असते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुग्धोत्पादनासाठीच्या जनावरांचे मलमूत्र, केरकचरा यातून शेणखत तयार होते. तसेच खत म्हणून त्याचा वापर होण्यापूर्वी त्या व्यवस्थेवर गोबरगॅस प्लांट बसवता येतो. याचा वापर गॅस म्हणून होतो. काही ठिकाणी या गोबरगॅसच्या साहाय्याने प्रकाशदिवेही लावण्यात आलेले आहेत. तसेच असे प्रकल्प मोठ्या संख्येने निर्माण झाल्यामुळे गावागावांतील केरकचरा कमी होऊ लागला आहे. थोडक्यात, दुधाच्या व्यवसायाचा अप्रत्यक्ष परिणाम ग्रामस्वच्छतेवरही होत आहे. तसेच शेतामध्ये शेणखताचा वापर केल्यामुळे पीकउत्पादन अधिक येते आणि येणारे पीक हे तुलनेने अधिक चवदार व पोषक असते.

आज गावातील एखाद्या शेतमजुराला किंवा गरीब कुटुंबाला स्वत:ची जमीन नसली तरी एखादी गाय-म्हैस पाळणे शक्य असते. बचत गट किंवा मायक्रो फायनान्स ग्रुप यांच्या माध्यमातून कर्ज घेऊन ही जनावरे घेता येतात. साधारणत: यासाठी केलेली गुंतवणूक वर्षा-दोन वर्षांत फेडता येते. या अतिरिक्त उत्पन्नातून या कुटुंबांतील विवाहकार्ये, शिक्षण, औषधपाणी, दवाखाना यांसारखे खर्च सहजगत्या पूर्ण केले जाऊ शकतात.

गेल्या काही वर्षांमध्ये दुधाच्या क्षेत्रात सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये सहकारी दूधसंस्था किंवा दूध संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. कोल्हापुरातील गोकुळ, वारणेतील वारणा दूध संघ, जळगावमधील जळगाव दूध संघ असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी दूध संघ आज अस्तित्वात आहेत. या संघांमुळे दुधाला कायमची बाजारपेठ निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काळी उत्पादित दुधाची गवळ्यांमार्फत शहरात विक्री केली जात होती. आता गावागावांत डेअरी, सोसायटी तयार झाल्या आहेत.

त्यामुळे गावातील दूधउत्पादन घेणारे लोक त्या-त्या दूधसंघांमध्ये, डेअरीमध्ये जाऊन घरातील ताजे दूध जमा करतात आणि साधारणत: आठवड्याला-महिन्याला त्याचे पेमेंट घेत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय सहकारी क्षेत्राने वाढवला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील, दक्षिण महाराष्ट्रातील अनेक मोठे दूध संघ पुण्या-मुंबईसारख्या महानगरांना दूध पुरवठा करत आहेत. याखेरीज चितळेंसारख्या खासगी दूधसंस्थांनीही आपल्या भागातील शेतक-यांना दुभती जनावरे घेण्यासाठी भांडवल पुरवून, त्यांची काळजी घेण्यासाठी औषधपाणी कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले, आपल्या स्वत:च्या पशुशाळा निर्माण केल्या, वितरणाचे जाळे उभे केले आणि त्याचा संबंध प्रत्यक्ष व्यापाराशी जोडून दुधापासून बनवलेल्या पदार्थांनी पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणच्या बाजारपेठांपर्यंत धडक दिली.

आज राज्यातील सहकारी दुग्धोत्पादन व्यवसाय एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आता इथून पुढील काळात मोठ्या सहकारी दूधसंस्थांनी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणे आवश्यक आहे. कारण आपल्या दुधाचा उत्पादनखर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण ते किफायतशीर दरात विकू शकतो. तसेच दुधावर प्रक्रिया केलेले बटर, खवा, चीज यांच्या विक्रीला चालना देऊ शकतो. यासाठी ‘नेस्ले’सारख्या कंपनीप्रमाणे आपल्याकडील दूधसंस्थांनी प्रचंड मोठे प्लांट उभे केले तर जगाच्या बाजारपेठेत डेअरी प्रॉडक्टस् सहजगत्या विकता येतील. यामध्ये आधुनिक उत्पादनतंत्राचा वापर केल्यास दुधाचा पुरवठा करण्यासाठी घराघरांत या दुभत्या जनावरांची संख्या वाढेल आणि त्यातून रोजगार वाढेल.

गुजरातसारख्या राज्यातील ग्रामीण जीवनाचा कायापालट अमूलने म्हणजेच आनंद मिल्क युनियन लिमिटेडने घडवून आणला. मुख्य म्हणजे हे परिवर्तन सहकारी तत्त्वावर झाले. जगातील उत्तम सहकारी दूधसंस्था म्हणून अमूलचा नावलौकिक आहे. अमूलमुळे गुजरातमधील ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढले, रोजगार वाढला. इतकेच नव्हे तर या संस्थेने आता शैक्षणिक संस्थाही सुरू केली आहे. या संस्थेला अमूलमार्फत वित्तपुरवठा केला जातो. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्या-त्या प्रदेशाचे सहकारी दूध संघ तयार झाले आणि या सर्व दूध संघांनी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय बाजारात उतरण्यासाठी संयुक्त प्रक्रिया उद्योग सुरू केला तर या राज्यातल्या दूधव्यवसायाला एक नवी दिशा आणि नवी ताकद मिळेल. एक नवी श्वेतक्रांती यातून आकाराला येऊ शकते.

प्रा. डॉ. जे. एफ. पाटील
ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या