23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेषभक्तांच्या मागोमाग जाणारा विठ्ठल

भक्तांच्या मागोमाग जाणारा विठ्ठल

एकमत ऑनलाईन

श्रीविठ्ठल भक्तजनप्रिय आहे. जेथे भक्त असतात तेथे श्रीविठ्ठल असतो. तो भक्तांच्या मागोमाग जाणारा देव आहे. परब्रह्म हे एक नाणे आहे. त्याची एक बाजू भक्तजन आहे तर दुसरी बाजू श्रीविठ्ठल आहे. विठ्ठलाच्या नामघोषात भक्त देहभान विसरतात आणि आनंदाने नाचू लागतात. जेथे जेथे भक्त असतात तेथे तेथे त्यांच्या संगती विठ्ठल राहतो. भक्तांची सोबत हे विठ्ठलाचे सुख आहे, तर देवाचे दर्शन हा भक्तांचा संतोष आहे. म्हणूनच वारकरी पंढरपूरची वारी करतात. ही वारी हरिदिनी म्हणजे एकादशीला असते.

गोष्ट आहे ज्येष्ठ आणि अष्टमी शके १७३४ (इ.स. १८३२), आरफळकर, तासकर आणि खानदेशचे निष्ठावंत वारकरी खंडूजीबुवा आणि शिरवळकर या वारक-यांची. ज्ञानदेव महाराजांच्या आदेशाप्रमाणे, दृष्टांताप्रमाणे आरफळकर आळंदीला ज्ञानदेव मंदिरात आले. चौघांनी माऊलीला साष्टांग नमस्कार घातला. आरफळकरांनी, पुंडलिक वरदे हरि विठ्ठलाचा नामघोष केला. ज्ञानदेव-तुकारामांचा नामघोष केला. माऊलींच्या पादुका शिरावर घेतल्या. प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल म्हणत चौघांनी पंढरीची वाट धरली. या क्षणापासून पालखीला प्रारंभ झाला. आरफळकर, शिरवळकर, तासकर, खंडोजी बुवा पंढरपूरला निघाले. विठ्ठल पंढरपुरी निघाले. दिंडी दिंडीतून गावोगावीचे, विदर्भाचे आणि कोकणचे, आंध्राचे आणि कर्नाटकाचे वारकरी पंढरपूरला, आषाढी एकादशीला नामसंकीर्तन करीत, नामघोष करीत जाऊ लागले.

एकादशीव्रतस्थ विठ्ठलभक्त विष्णुशयनोत्सवासाठी पंढरपूरला येऊ लागले. व्यक्तिश: दिंडी-दिंडी रूपाने, आपापल्या फडासह वारकरी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. वारक-यांचे, विठ्ठलभक्तांचे पंढरपूरला येणे ही एक अखंड क्रिया आहे. या प्रक्रियेला प्रारंभ आहे पण शेवट नाही अशी ही वारक-यांची दिशा आहे. वारक-यांच्या दिंडीला, वारीला प्रारंभ झाला तो द्वारकेहून. कृष्णदेव हे दिंडीरवनात आहेत. म्हणून रुक्मिणी दिंडीरवनात द्वारकेहून निघाली. तिच्या मागोमाग गोकुळामधून गोपवृंद आले. राधा आली. रुक्मिणी, राधा, गोपवृंद-गोपाल कृष्णदर्शनासाठी पंढरपूरला आले. येथे कृष्ण विठ्ठलरूपात आहे. ज्या स्थानी कृष्ण विठ्ठलरूपात आला ते स्थान दिंडीश शिवाचे होते. येथे शिव दिंडीश नावाने यति, योगी, जनात प्रसिद्ध होता. दिंडीश हा शब्द, हे नाव कर्नाटकातील शिलालेखातही आढळते. दिंडीश, दिंडीरवन आणि दिंडी ही तिन्ही नावे वारकरी संप्रदायात, विठ्ठलभक्त वर्गात प्रसिद्ध आहेत.

हा दिंडीश शिव पांडुरंग नावानेही प्रसिद्ध आहे. पांडुरंग नावावरून ‘पंडरगे’ हे ग्रामनाम कन्नड भाषेत आणि शिलालेखांत प्रसिद्ध झाले. पंडरग विठ्ठल असा पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख शके ११५९ च्या शिलालेखांत येतो. हा लेख संस्कृत, कन्नड
भाषेत असून पंढरपूर मंदिरावर कोरण्यात आला. या लेखात कर्नाटकाचा राजा वीर सोमेश्वर पंढरपूरला वारीसाठी आला होता. याच लेखात पुंडलिकाचाही उल्लेख आहे. येथून आपणाला तीन-चार शिलालेख मिळतात. त्यांमधून नामदेव-ज्ञानदेव आणि पूर्वकालातील वारकरी, फड आणि वारकरी संप्रदायाची माहिती मिळते. स्कंद आणि देवी भागवत पुराणातून पंढरपूरचे पुंडलिकाचे उल्लेख आलेले आहेत. स्कंदपुराणात १२ अध्यायांचे पंढरी माहात्म्य आहे. तथापि ही तीनही बरीच प्राचीन आहेत. प्राचीन पुराणात ज्याची गणना होते असे मत्स्यपुराण आहे. या पुराणात पंढरपूरचा उल्लेख लोहदंड तीर्थक्षेत्र पुंडरिकपूर असा येतो. मत्स्यपुराणाचा काल इस. ५००-६०० आहे. या पुराणात येणारा पुंडरिकपूर हा पंढरपूरचा आणि भक्तराज पुंडलिकाचा उल्लेख हेच स्पष्ट करतो की, शके ४२२ मध्ये पुंडरिकाची पुराण परंपरा पसरलेली होती. याच पुराणात पांडुरंगपल्लीचा ताम्रपट आहे.

हा ताम्रपट आणि मत्स्यपुराणाच्या अभ्यासावरून पुंडलिक महाराजांचा कालखंड आणि त्यांची भक्तराज म्हणून कीर्ती शके ३५०-४०० मध्ये सर्वत्र पसरली होती आणि ज्ञानदेव-नामदेवांपूर्वी भक्तराज पुंडलिक १००० वर्षांपूर्वी होऊन गेले. तेव्हापासून विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी विटेवर उभा आहे. आषाढीला श्रीहरीच्या दर्शनार्थ आलेले वारकरी तासन्तास उभे राहून हळूहळू पुढे सरकतात. महाद्वारात आले की नामदेवांची पायरी लागते. तिला वंदन करून भगवद्भक्त नामदेवाला वंदन करून महाद्वारातून गरुड स्तंभाकडे चालू लागतात. याच गरुडस्तंभाचा आश्रय घेऊन तुकाराम महाराजांनी अभंगातून श्रीविठ्ठलाचे स्तुतिस्तोत्र गायिले आहे. गरुडपार म्हणजे गरुड खांब. याचा उल्लेख वारकरी संत वारंवार करतात. पूर्वी याच स्थळावरून कीर्तनास प्रारंभ होत असे. गरूड हा विठ्ठलाचा-विष्णूचा वाहक आहे. गरुड खांबाजवळून पुढे गेले की ज्याच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेले असतात ते परब्रह्म श्री विठ्ठलरूपाने साकार होऊन भक्तांना भेट देण्यासाठी उभे राहिलेले दिसून येते.

‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया। तुळसीहार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेचि ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभ मणि विराजित। तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख। पाहीन श्रीमुख आवडीने।’ या रूपातील श्रीहरीचे दर्शन होताच सर्व वारकरी एकमुखाने घोषणा करू लागतात. ‘श्री पुंडलिक वरदा हरि विठ्ठल। जय जय हरि विठ्ठल।’ असा घोष समस्त वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. एवढेच नव्हे तर वारकरी संप्रदायाचे पूर्ण रूप आहे. श्रीहरि हा विठ्ठल आहे व तो पुंडलिकाला वर देणारा आहे. श्रीहरि हा परमात्मा कृष्ण आहे. तो विष्णू आहे. श्रीकृष्ण ‘तच्च संमृत्य संमृत्य रुपम् अव्यद्भूतम हरे:’ असा श्रीकृष्णाचा उल्लेख गोपी करतात. हरि हे श्रीकृष्णाचेच नाव आहे व ही दोन्ही नावे विष्णूचीच आहेत.

भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठल रूपाने भीमातीरावर पंढरपुरी प्रकट झाले त्यावेळी श्रीविठ्ठलाची शोभा दिव्य होती. समवेत रुक्मिणी देवी व राधा होत्या. प्रगट झालेले भगवंत विटेवर उभे होते. दोन्ही हात कंबरेवर ठेवले होते. समचरण होते व दृष्टी नासाग्रावर होती. भगवान विठ्ठल हे श्रीकांत होते. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर होते. वर्ण मेघाप्रमाणे नील होता. जेथे जेथे भक्त असतात तेथे तेथे त्यांच्या संगती विठ्ठल राहतो. भक्तांची सोबत हे विठ्ठलाचे सुख आहे, तर देवाचे दर्शन हा भक्तांचा संतोष आहे. म्हणूनच वारकरी पंढरपूरची वारी करतात. ही वारी हरिदिनी म्हणजे एकादशीला असते.

– प्रा. म. रा. जोशी,
संत वाङ्मय संशोधक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या