देवाने माणूस निर्माण केला आणि माणसाने या चराचर सृष्टीच्या निर्माणाचे गूढ शोधण्याच्या प्रयत्नात देव निर्माण केला. त्या निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण साकार रूप बहाल केले. महाराष्ट्राचे दैवत असलेला पंढरपूरचा विठ्ठल गेली अठ्ठावीस युगे अवघ्या विश्वावर आपली कृपादृष्टी ठेवून उभा आहे. परमेश्वराच्या या सगुण रूपाने अनेकांना वेड लावले. त्या श्रीविठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्रीविठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. विठ्ठलाला ‘भक्ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता’, असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हणतात.
चारही वेद ज्या परमात्म्याचे वर्णन करून थकले, अठरा पुराणेही न थांबता श्रीहरिवर्णनाच्या मागे धावता धावता स्थिरावली, सहा शास्त्रेही विठ्ठलाचे वर्णन करीत लाजून शांत बसले अशा श्रीहरिपरमात्म्याचे सगुण रूप पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाने विराजमान झाले.
‘तें हें समचरण उभे विटेवरी।
पहा भीमातीरीं विठ्ठल रूप।।’
निर्गुण रूपाचे वैभव केवळ भक्तिभावाच्या बळाने भक्त भाविकांसाठी श्रीविठ्ठलरूपाने पंढरपूरला वास्तव्यास आले. ज्ञानीजनांची जाणीव, योगीजनांची ध्येयवस्तू, गुरुमंत्राचे गु असे श्रीविठ्ठल स्वरूप मराठी भाषिक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ज्ञानदेव-तुकाराम-नामदेव यासह अनेक संतांनी अनादी श्रीविठ्ठलाला आपले जीवन समर्पित केले. आषाढी-कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूर येथे जमतो. आठशे वर्षांपासून ही लोकविलक्षण अलौकिक परंपरा अबाधित व वर्धिष्णू आहे. कटेवर कर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या श्रीविठ्ठलाचे आकर्षण संतांना आहे. तितकेच प्रेम आणि आकर्षण भाविकांनाही असते. कारण संतांनी आपल्या अभंगवाणीतून त्या सुंदर ते ध्यान असलेल्या श्रीहरी विठ्ठलरूपाचे अवीट वर्णन करून ठेवले आहे.
‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा।
रविशशिकळा लोपलिया ।।’
सुंदरपणात जो मदनाचा बाप आहे, त्रैलोक्यात जो उदार आहे, दैत्यांचा नाश करणारा शूरवीर आहे, चतुरपणात जो ब्रह्मदेवाचा बाप आहे, सर्व तीर्थांपेक्षा जो पवित्र आहे आणि सकळ जिवांचा जो आधार आहे, असा श्रीविठ्ठल आमचा देव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥
पतितपावन मानसमोहन।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥
हा वारक-यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचे तत्त्वज्ञान रुजवणारा विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावाने जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे. वारकरी आणि विठ्ठलाचे वर्षानुवर्षांचे एकरूप झालेले नाते. वारी मराठी मुलुखाचा भावभक्ति सोहळा आहे. मराठी मातीचे सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार बनून अनेक वर्षांपासून भक्तांची मांदियाळी वारीच्या वाटेने चालते आहे. या वाटेने चालणा-या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. त्यांच्या आयुष्याचा ऊर्जास्रोत. तो त्याच्या विचारातच नाही तर जगण्यात सामावून एकरूप झालेला.
वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणी वारीला निघालेला नसतो. काळ्या मातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा साधाभोळा माणूस ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंत:करणाने विठ्ठल भेटीला नेणा-या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहोचलेला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली.
विठ्ठल हेच त्याचे खरे सुख. काळ बदलला तशी माणसांच्या जगण्याची प्रयोजनेही बदलली. भौतिक सुखांनी माणसांच्या जगात आपला अधिवास निर्माण केला. पण वारी अजूनही तशीच आहे. वारी सा-यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, तुमच्याकडील सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माऊलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट या वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दु:खं दिमतीला घेऊन आलेली असतात. कुणाचं शेतच पिकलं नाही, कुणाचा बैल ऐन पेरणीच्या हंगामात गेला, कुणाचं शेत कर्जापोटी गहाण टाकलेलं, तर कुणाच्या लेकीचं नांदणं पणाला लागलेलं. नाना त-हेची दु:खं सोबत घेऊन भक्त पांडुरंगाला भेटायला आलेला असतो.
संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्तीच्या पायावर भागवत धर्माची इमारत उभी राहिली. संत तुकारामांनी तिच्यावर कळस चढवला. भागवत संप्रदायाची ही सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. विठ्ठल सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो सा-यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायास-प्रयास करायची आवश्यकताच नाही, हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याच्या गळा माळ असो नसो.’ भक्ताची भगवंत भेटीसाठी असणारी पात्रतासुद्धा हीच. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे गणवेश म्हणून परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठांतून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा क्लास लावायची गरज नसते. हातात टाळ असला तर उत्तमच, नसला तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता माळी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदा-मुळा-भाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठलनामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता. भक्तांची कामे करण्यात कोणताही कमीपण विठ्ठलास कधी वाटला नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता.
-उध्दव फड
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत)