34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home विशेष विवेकानंदांचा अमेरिकेतील प्रभाव

विवेकानंदांचा अमेरिकेतील प्रभाव

एकमत ऑनलाईन

स्वामी विवेकानंदांची जयंती नुकतीच साजरी झाली. ‘अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ या वाक्याने धर्म संसदेतील भाषणाला सुरुवात करणारे स्वामी विवेकानंद १२० वर्षांनंतरही हिंदू धर्माचे पाश्चात्य देशांमधील सर्वांत मोठे दूत आहेत. विश्व धर्म संसदेविषयी बरेच लिहिले गेले आहे. अशा प्रकारचे ते पहिलेच संमेलन होते. या संमेलनात आयोजकांनी जगातील मोठ्या दहा धर्मांच्या प्रतिनिधींना एकत्र आणले होते. धर्मात अंतर्भूत असलेल्या विविधता आणि एकतेवर विचारमंथन झाले होते. भारतातील सर्वाधिक लोक या धर्म संसदेतील भाषणामुळे विवेकानंदांना ओळखतात. या भाषणाचे महत्त्व अमेरिकेत मात्र अनेक पटींनी अधिक आहे. तेथील बौद्धिक इतिहासात या भाषणाला स्वीकारार्हता किती आहे, हा मुद्दा वेगळा. धार्मिक बहुलतावादाची संकल्पनाच सैद्धांतिक स्वरूपात अमेरिकेच्या नागरी संस्कृतीचा आधार मानली जाते. या सिद्धांताची नांदी प्रथमत: याच संमेलनात झाली होती. त्याचबरोबर विविध धर्मांच्या तौलनिक अभ्यासाची सुरुवात याच संसदेनंतर लगेच झाली, असे मानले जाते.

विवेकानंदांनी जेव्हा अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवले, तेव्हा हिंदू धर्म, वेदान्त अथवा सामान्यत: ज्याला भारतीय धर्म म्हटले जाते, त्याबद्दल अमेरिकेत फारच थोड्या लोकांना माहिती होती. ख्रिश्चन डिसिपल अँड द थिओलॉजिकल रिव् ू(१८१३-१८२३) आणि नॉर्थ अमेरिका रिव् ू (१८१५) या नियतकालिकांनी हिंदू रीतिरिवाज, विशेषत: हिंदू धर्मातील मूर्तिपूजा परंपरेविषयी थोडेबहुत लिखाण प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली होती. परंतु अशा लेखांचा दृष्टिकोण प्राच्यवादी (ओरिएन्टलिस्ट) असे. हिंदुत्वाविषयी जो समज आणि आकलन तेथील लोकांना होते, ते प्रामुख्याने चार्लस् ग्रान्ट यांच्या बहुचर्चित ‘अ पोएम ऑन द रिस्टोरेशन ऑफ लर्निंग द ईस्ट’वर आधारित होते तर दुसरीकडे राजा राममोहन राय यांच्या कार्यामुळे लोकांना माहीत होते. रॉल्फ वाल्डो इमर्सन आणि हेनरी डेव्हिड थोरो यांनी हिंदूंच्या पवित्र ग्रंथांमध्ये थोडीफार रुची प्रदर्शित केली होती. स्वत:ला योगी मानणारा थोरो हा अमेरिकेतील पहिला व्यक्त होता. परंतु त्यांनी कधीही अमेरिकेच्या बाहेर पाऊल ठेवले नव्हते. त्यांनी कधीच कोणत्या भारतीयाला किंवा हिंदू योग्याला पाहिले नव्हते. परंतु इमर्सन आणि थोरो यांनी भारतीय तत्त्वज्ञानाविषयी रुची प्रदर्शित केल्यानंतर अमेरिक लोकांमध्ये वेद, उपनिषदे किंवा गीतेविषयी रुची निर्माण झाल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. अर्थात, काही अमेरिक उच्चशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात त्यावेळी संस्कृतचा समावेश झाला होता, हेही खरे आहे. एल्ब्रिज सॅलिसबरी यांना १८४१ मध्ये येल विद्यापीठात संस्कृत आणि अरबी भाषांचे प्राध्यापक म्हणून नियुक्त मिळाली होती. १८८० च्या दशकाच्या अखेरपर्यंत अमेरिकेतील किमान डझनभर विद्यापीठांमध्ये संस्कृत शिकविले जात होते.

थोडे आणखी विश्लेषण केल्यास अमेरिक लोकांना भारताविषयी वाटणा-या आकर्षणाचे आणखी पुरावे आपल्याला मिळू शकतील. परंतु पूर्णत्वाने विचार केल्यास, जेव्हा विवेकानंद अमेरिका आणि बा जगासमोर हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मूठभर लोकांसमवेत पोहोचले, तोपर्यंत अमेरिक लोकांना हिंदू धर्माविषयी केवळ जिज्ञासाच होती, अशा अंतिम निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. थोडक्यात, हिंदू धर्माच्या प्रतिनिधीला किंवा दूताला अमेरिक लोकांनी प्रत्यक्ष पाहण्याची तीच पहिली वेळ होती. कोलंबसाने अमेरिका शोधून काढल्याच्या घटनेला चारशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अनेक संसदा आयोजित केल्या होत्या आणि विश्व धर्म संसद ही त्यापैकी एक होती. विविध धर्मांची सर्वांत मोठी परिषद अशी मान्यता या संसदेला लाभली. आयोजकांनी दहा धर्मांना सर्वश्रेष्ठ धर्मांचा दर्जा दिला. जुडावाद, इसाई धर्म, तसेच इस्लाम आणि पारसी याव्यतिरिक्त दक्षिण आशिया आणि अतिपूर्वेकडील ताओवाद, कन्फ्यूशियसवाद, शिंतोवाद, हिंदुत्व, बौद्ध धर्म, जैन धर्म अशा धर्मांच्या प्रतिनिधींना या संसदेचे निमंत्रण देण्यात आले होते. हे संमेलन सर्व धर्मांना समान दर्जा देणारे असून, त्यामुळे इसाई धर्माची प्रतिष्ठ घटते आहे, या कारणावरून काही इसाई नेत्यांनी या संमेलनावर टीकाही केली होती. जैन धर्माचे एकमेव प्रतिनिधी म्हणून वीरचंद गांधी यांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. आज शिकागोच्या जैन मंदिरासमोर त्यांचा पुतळा दिसतो.

पोलिसांनी दरारा निर्माण करावा : भुजबळ

११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद मंचावर विराजमान झाले, तेव्हा एकप्रकारे हिंदुत्वाला जागतिक व्यासपीठ मिळाले. अन्य हिंदू प्रतिनिधींसमवेत विवेकानंद व्यासपीठावर होते. यामध्ये मुलतान (पंजाब) येथील सिद्धू राम, मुंबई येथील ब्राह्मो समाजाचे मंत्री रेव्हरंड बी. बी. नगरकर, प्रा. जी. एन. चक्रवर्ती, मुझफ्फरगढ येथील जिंदा राम, कोलकता येथील ब्राह्मो समाजाचे मंत्री रेव्हरंड पी. सी. मजूमदार हेही उपस्थित होते. ही नावे इतिहासात धूसर झाली आहेत. या मंडळींनी मांडलेले विचार कदाचित विवेकानंदांच्या विचारापुढे झाकोळले गेले असतील. परंतु जैन धर्माच्या वतीने बोलणारे वीरचंद गांधी यांनी एक आगळाच संदर्भ सादर केला होता. वीरचंद गांधी यांनी लिहिले आहे,

‘‘केवळ विवेकानंदच नव्हे तर सर्वच भारतीय प्रतिनिधींची भाषणे लोकांनी लक्षपूर्वक ऐकली. भारतातील एखाद्या वक्त्याचे भाषण संपल्यानंतर किमान एक तृतीयांश किंवा दोन तृतीयांश श्रोते हॉलमधून बाहेर जात होते.’’ विवेकानंद यांनी ‘माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या वाक्याने भाषणाची सुरुवात केली, तेव्हा हॉलमध्ये उपस्थित असलेले कमीत कमी सात हजार श्रोते उठून उभे राहिले. रेव्हरंड जॉन हेनरी बॅरोज यांनी संसदेच्या इतिहासात लिहिले आहे, ‘‘विवेकानंदांच्या सुरुवातीच्या शब्दांना कडाडून टाळ्या मिळाल्या. काही मिनिटे या टाळ्या सुरूच होत्या.’’ टाळ्यांचा आवाज थांबल्यावर विवेकानंदांनी जगातील संन्याशांच्या सर्वांत पुरातन संप्रदायाच्या वतीने, धर्मांच्या मातेच्या वतीने आणि विभिन्न श्रेणी तसेच संप्रदायांतील लाखो-लाखो हिंदूंच्या वतीने धन्यवाद दिले.

विवेकानंद म्हणाले,‘‘ज्या धर्माने संपूर्ण जगाला सहिष्णुता आणि वसुधैव कुटुम्बकम् हे तत्त्व शिकविले, त्या धर्माचा अनुयायी असल्याचा मला अभिमान आहे. आमचा वैश्विक समभावावर विश्वास आहे. एवढेच नव्हे तर सर्व धर्म सत्य आहेत, असे आम्ही मानतो. ज्या देशाने जगातील सर्व धर्म आणि देशांकडून पीडा सहन करणा-या शरणार्थींना आश्रय दिला, अशा देशाशी माझे नाते असल्याचा मला अभिमान आहे.’’ भारतीय आणि विशेषत: हिंदू धर्माच्या सर्वग्राही स्वरूपाला पुष्टी देण्यासाठी विवेकानंदांनी बालपणापासून वारंवार म्हटलेली एक ऋचाही श्रोत्यांना ऐकविली. ‘‘ज्याप्रमाणे विभिन्न स्रोतांपासून उगम पावलेल्या सर्व नद्या समुद्रात विलीन होऊन जातात, त्याप्रमाणे हे ईश्वरा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे विचार मानणारे अनेक रस्ते आहेत. ते सर्व तुझ्यापाशीच पोहोचतात.’’ भारताने त्यावेळी पारसी समाजाला आश्रय दिला होता.

पाश्चात्य देशांत अत्याचार सहन करणा-या यहुदींचे स्वागत केले होते. धर्म संसदेत उपस्थित असलेल्यांना याची माहिती नसेल; परंतु विवेकानंद वास्तवाच्या ठोस पायावर विचार मांडत होते. त्यांच्या त्या भाषणात हिंदू धर्माचे अन्य धर्मांच्या तुलनेत असलेले श्रेष्ठत्वही प्रतीत झाले आहे. पाश्चात्य देशांमध्ये त्यानंतर केलेल्या अनेक भाषणांमध्ये ते अधिक स्पष्ट झाले. सहिष्णुता आणि वैश्विक सद्भावना शिकविणारा धर्म अशी हिंदू धर्माची व्याख्या त्यांनी केली. २० सप्टेंबरला केलेल्या भाषणात त्यांनी इसाई धर्मीयांना चांगल्या हेतूने केलेली टीका स्वीकार करण्याचा सल्ला दिला. भारतीयांना धार्मिक आधार देण्यासाठी मोठ्या संख्येने पाश्चात्य भारतात आले आहेत; मात्र त्यांना अद्याप समजलेच नाही की, पूर्वेची समस्या धर्म ही नाहीच. भाकरी ही त्यांची खरी गरज आहे, असे त्यांनी सांगितले होते.

विवेकानंदांची शिकवण आणि त्यांचे भव्य व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, असा तर्क दिला जातो. ‘द शिकागो इंटर ओशन’ने दिलेल्या वृत्तांतानुसार, लोकप्रिय हिंदू संन्यासी दुपारच्या सत्रात भाषण करणार आहेत, असे आयोजकांनी सांगितल्यामुळे मोठी गर्दी कोलंबस हॉलमध्ये जमली होती. त्यात स्त्रिया मोठ्या संख्येने होत्या. ‘बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सक्रिप्ट’च्या वृत्तांतानुसार, सुमारे दोन तास लोक इतर धर्मांच्या प्रतिनिधींची भाषणे मोठ्या धैर्याने ऐकत राहिले; कारण त्यांना त्यानंतरचे स्वामी विवेकानंदांचे पंधरा मिनिटांचे भाषण ऐकायचे होते. साहित्यविश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हॅरियट मोनरो हे विवेकानंदांच्या आवाजामुळे खूपच प्रभावित झाले होते. भारतातील आपल्या कार्यासाठी काही पैसे जमा करणे हाही विवेकानंदांचा अमेरिकेला जाण्यामागील हेतू होता. परंतु पौर्वात्य देशांमधून आलेले, अद्भुत सौम्यता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेले, इंग्रजीवर जबरदस्त प्रभुत्व असलेले विद्वान म्हणून लोकांनाच त्यांच्यात मोठा फायदा दिसला.

धर्म संसद समाप्त होण्यापूर्वीच विवेकानंदांना अमेरिक लेक्चर सर्किटमध्ये भाषण देण्यासाठी करारबद्ध करण्यात आले. अमेरिकेत ते ‘सेलिब्रिटी’ बनले होते. बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या ठायी असलेल्या सेवाभावाविषयी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. धर्म संसदेनंतर लगेच त्यांना हार्वर्ड विद्यापीठात पौर्वात्य तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुखपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, असे सांगितले जाते. विवेकानंदांनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाची नोंद हार्वर्ड विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. अन्य कोणताही पुरावा यासंबंधाने मिळत नाही. परंतु अशा प्रकारच्या कहाण्या सांगितल्या जातात, त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव किती मोठा होता, हे स्पष्ट होते. अर्थात, जे लोक विवेकानंदांना आध्यात्मिकता आणि बौद्धिकतेचा समुच्चय मानतात, त्यांच्यासाठी अशा कथानकांची गरजच नाही. एक मात्र खरे की, विवेकानंदांच्या प्रशंसकांची आणि अनुयायांची संख्या अमेरिकेत मोठी होती. अमेरिकेच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या इतिहासात असे अनेक पुरावे मिळतात, जिथे विवेकानंदांचे नाव जोडले गेले आहे.

प्रा. विनय लाल
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या