22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeविशेषसर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी

सर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी

एकमत ऑनलाईन

आपल्या संतमंडळींनी भागवत धर्माचा झेंडा उभारला! भेदाभेद अमंगळ! ही भागवत धर्माची परंपरा. निव्वळ हरिनामाने हजारो दु:खं दूर होतात, संकटं नष्ट होतात ही तीव्र भावना आहे वारीमागची. सावळा विठ्ठल किंवा विठोबा हे दैवत. त्याच्या पायाशी कोणताच भेद नाही. स्त्री-पुरुष हा भेद नाही, लहान-मोठा, गरीब- श्रीमंत हा भेद नाही. सर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी ही विलक्षण अशी आध्यात्मिक पदयात्रा आहे. वारीला प्राचीन अथवा आधुनिकतेत आपण बांधू शकत नाही. कारण ती नित्यनवीन आहे. मुळातच वारीमागची संकल्पना सर्वव्यापी आणि कालातीत आहे. म्हणूनच ती आजही प्रिय आहे. ती एक संवादिनी आहे. विठ्ठलाशी संवाद साधताना ती आपापसांत बोलकी असते.

मागच्या महिन्यात वारी सुरू झाली. मागील दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे वारी निघाली नाही किंबहुना तो उत्साह नव्हता. आज वातावरण काही प्रमाणात संकटमुक्त झाले आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाला वारकरी मंडळी मोठ्या उत्साहाने निघाली आहेत. जनमानसातला उत्साह, वारीची लगबग मनाला पुन्हा एकदा जिवंत करीत आहे. मध्यंतरी, शेगाववरून पंढरपूरला निघालेल्या वारीचे व्हीडीओ मोबाईलवर प्रसारित होत होते. मनाला अतिशय उत्साह आणि आनंद वाटत होता. वारक-यांना पाहून, त्यांचे पावलीनृत्य पाहून मन जुन्या आठवणीत रमून गेले. किती वर्षांचा इतिहास आहे वारीला! जवळपास पाचशे-सहाशे वर्षे झाली असावीत. वर्षे मोजू नयेत, कारण ‘पुण्याची गणना कोण करी, हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा!’ असे प्रत्यक्ष हरिपाठात म्हटले जाते. म्हणून वारी कधी सुरू झाली, कोणी सुरू केली हा प्रश्न विचारूच नये. त्याची जाणीव करून घ्यावी!

आपल्या संतमंडळींनी भागवत धर्माचा झेंडा उभारला! भेदाभेद अमंगळ! ही भागवत धर्माची परंपरा. निव्वळ हरिनामाने हजारो दु:खं दूर होतात, संकटं नष्ट होतात ही वारीमागची तीव्र भावना आहे. सावळा विठ्ठल किंवा विठोबा हे दैवत. त्याच्या पायाशी कोणताच भेद नाही. स्त्री-पुरुष हा भेद नाही, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत हा भेद नाही. सर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी ही विलक्षण अशी आध्यात्मिक पदयात्रा आहे. वारीला सामाजिक, धार्मिक परंपरा आहे. वारीचा उद्देश फक्त देवदर्शन हाच नाही; तर सर्व समाजातील, सर्व स्तरांतील स्त्री-पुरुषांना एकत्र आणणे ही त्यामागची भावना आहे. वारी ही आनंदयात्रा आहे. वारीची सुरुवात झाली तो काळ फारसा अनुकूल नव्हता. परकीय आक्रमणे होती. समाजात अस्थिरता होती. राज्य सुरक्षित नव्हते. दारिद्र्य प्रचंड होते! आपापसांत अविश्वासाचे वातावरण होते. या सर्वांचा विचार त्या त्या काळातल्या संतांनी केला. या अशा परिस्थितीत देवाच्या नावाने सुरू केलेले कार्यच त्यांना तारेल, एकत्र आणेल, म्हणूनच ‘भेदाभेद अमंगळ’ या ब्रीदवाक्याने वारीची योजना केली गेली असावी. या वारीने समाजाला एकत्र आणले, एकत्र बांधून ठेवले! पंढरपूरच्या विठोबाला साकडं घालीत वारीला रूपं दिली! अशी वारी सुरू झाली.

वारीत सहभागी होतात ते वारकरी! संप्रदाय सुरू झाले. दैवत होतं विठोबा! सावळ्या विठ्ठलाने कोणताही भेदाभेद न करता सर्वांना आश्वासक करीत आपल्या जवळ घेतले! सुरुवातीला पायी वारी जरी होती तरी वाट दुर्गम होती, दुष्काळ होता,
दारिद्र्य होतं. सामाजिक, राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. पण जनमानसात, समाजात जशी वारी रुजत गेली, .श्रद्धा-भक्ती वाढत गेली, तसतशी ती सुकर झाली. लोकांच्या हृदयाचा ठाव घेत वाढती झाली. मनामनांतील संवेदनशीलता अधिकाधिक हळवी करीत प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या विठोबाशी नम्र, लीन होत गेला. अशी ही वारीची कल्पना मला पटली ती मी तुमच्यासमोर उलगडली. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे तुकाराम महाराजांनी रचले ते वारीला पाहूनच असावे असे वाटते! मी प्रत्यक्ष वारी कधी अनुभवली नाही पण लोकांचे अनुभव आपण सर्वच ऐकून असतो. वारक-यांना पाहून कोणाही मनाला विलक्षण आनंद होतो. टाळ-चिपळ्यांच्या गजराने आणि विठुरायाच्या नामघोषाने भारावून जायला होतं. यंदाच्या वर्षी वारीतील उत्साह हा निश्चितच द्विगुणित झालेला असणार आहे. वारीला प्राचीन अथवा आधुनिकतेत आपण बांधू शकत नाही. कारण ती नित्यनवीन आहे. मुळातच वारीमागची संकल्पना सर्वव्यापी आणि कालातीत आहे. म्हणूनच ती आजही प्रिय आहे. ती एक संवादिनी आहे. विठ्ठलाशी संवाद साधताना ती आपापसांत बोलकी असते. स्त्री-पुरुष हा भेद नाही. विठ्ठलाच्या भक्तमंडळीत अनेक प्रसिद्ध स्त्रीभक्त आहेत. म्हणूनच की काय, समसमान हा संयोग या शब्दाला वारीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिना-दीड महिन्याच्या या पदयात्रेत सर्वजण सामावून जातात.

आबाल-वृद्धसुद्धा आनंदाने सहभागी होतात. टिळकांनी ज्याप्रमाणे श्रीगणेशोत्सव सार्वजनिक केला आणि त्याकाळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीला आटोक्यात आणून लोकांना एकमेकांशी बांधून ठेवलं! तसं काहीसं या वारीमागील प्रयोजन असावं असं वाटून जातं. पांढरे धोतर, अंगात बंडी, डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, कपाळावर टिळा आणि गळ्यात तुळशीमाला घालून हातात वीणा घेतलेला वारकरी आत्ममग्न होऊन नामस्मरणात दंग होऊन वारीत पावलीनृत्य करताना पाहतो तेव्हा मनाला होणारा आनंद अवर्णनीय आहे. वारक-यांचे नृत्य एका तालात असते. स्त्रियाही तशाच. कधी निरखून पाहिल्यास त्यांचे चेहरे, त्यावरील भावही एकसारखेच असतात. कारण सकारात्मक ऊर्जेचा तो एक मोठा स्रोत असतो. अखंड जनसमुदायक, अपार गर्दी तरीही एक सुरक्षिततेची भावना तिथे असतेच असते. काही वारकरी भगिनींशी बोलल्यावर, त्या म्हणाल्या की वारीत आपले अस्तित्व विसरायला होतं. नको त्या गोष्टींचा मोठेपणा गळून पडतो. पांढरपेशे असल्याची जाणीव बोथट होते आणि शेवटच्या दिवशी वारकरी (गावाकडच्या) भगिनींना गळाभेट देऊन निरोप देताना आपण एकच आहोत ही भावना दृढ होते.

आणखी बोलकी प्रतिक्रिया होती एका अद्ययावत तरुणीची. ती म्हणते, वारीच्या संपूर्ण प्रवासकाळात मोबाईलची आठवण एकदाही आली नाही. वारीत सहभागी होताना मी घरच्यांना सांगितले होते. आता भेट वारीनंतरच. मध्ये फोनच करायचा नाही. या अनुभवावरून एक लक्षात आलं की, खरंच हे होऊ शकतं. आज मोबाईलमुळे संवाद संपत आलाय. घराघरांत
दुरावा निर्माण झालाय. प्रेम आहे पण संवाद नाहीये. असे संवाद नसल्याचे प्रदूषण कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणापेक्षा जास्त हानीकारक आहे. आज आपण सतत ‘पर्यावरण वाचवा समाज वाचवा’ असा नारा देत असतो. पण समाज कुटुंबामुळेच टिकेल आणि कुटुंब संवादामुळे टिकेल. असे हे एकमेकांशी जोडलेपण आहे. तेच महत्त्वाचे आहे आणि वारी समाजाला, कुटुबांला जोडणारी आहे. याच एका कारणाने वारीचे प्रयोजन करण्यात आले असावे. आपले कोणतेही सण-समारंभ नेहमी कुटुबांला, समाजाला आपसी संबंधाला समोर ठेवूनच आखले गेलेले आहेत. आज नव्याने विचार करू जाता यामागील भूमिका स्पष्ट होताना दिसते. महाराष्ट्राचे लाडके दैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल! हे जणू सर्वांचे आराध्य आहे. संतांनी त्याला मायबापाची विशेषणे लावली आहेत आणि ते खरंच ‘विठू माझा लेकुरवाळा’ याला योग्य आहेत. यावर्षीच्याच उत्साहाने दरवर्षी वारी घडू दे, अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना.

-४ अरुणा सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या