25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषकोविडकाळात अन्य आजारांचे काय?

कोविडकाळात अन्य आजारांचे काय?

जगात दरवर्षी एकंदर ५ कोटी ७० लाख मृत्यू होतात. कोविड-१९ च्या जागतिक साथीमुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून, त्याचा परिणाम म्हणून अन्य कारणांमुळे होणा-या मृत्यूंमध्ये ५ टक्के जरी वाढ झाली तरी त्याचा अर्थ २८ लाख अतिरिक्त मृत्यू असा होतो. कोविड-१९ मुळे होऊ शकणा-या अंदाजे मृत्यूंपेक्षा हा आकडा कितीतरी अधिक आहे.

एकमत ऑनलाईन

गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळात कोविड-१९ च्या जागतिक साथीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. परंतु कोविड-१९ चा प्रसार वेगाने होत आहे म्हणून अन्य आजारांकडे दुर्लक्ष करता येईल का? कोविड-१९ मुळे उपचार मिळू शकले नाहीत तर अन्य आजार थांबणार आहेत का? आज संपूर्ण जगातील आरोग्य यंत्रणेने कोविड-१९ मधून जास्तीत जास्त लोकांना वाचविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा उपस्थित होतो की, आरोग्य यंत्रणा अशा वातावरणात अन्य आजारांकडे पुरेसे लक्ष देऊ शकतील का? असे झाल्यास ज्या कोट्यवधी रुग्णांना अन्य गंभीर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासले आहे आणि त्यांना तातडीने उपचारांची गरज आहे, त्यांचे काय होणार? यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कोविड-१९ चा मुकाबला करताना विविध देशांनी अन्य आवश्यक आरोग्यसेवा पुरविणे सुरूच ठेवले पाहिजे, असे सूचित केले होते. ही सूचना दिसायला जेवढी साधी-सोपी वाटते तेवढी ती अमलात आणणे सोपे नाही. विशेषत: जेथे आरोग्यसुविधा पहिल्यापासूनच कमकुवत आहेत, अशा देशांत हे खूप अवघड आहे. भारतासारख्या देशात तर धोका अधिकच वाढतो.

डब्ल्यूएचओने या दस्तावेजात स्वत:च असे नमूद केले आहे की, कोविड-१९ च्या महामारीमुळे जागतिक स्तरावर अन्य आरोग्यसेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोविड-१९ साठी गरजेच्या आरोग्यसेवा आणि आरोग्य सेवकांची वाढती मागणी लक्षात घेता अन्य आरोग्य समस्यांच्या व्यवस्थेवर खूपच परिणाम झाला आहे. डब्ल्यूएचओने संसर्गजन्य रोगांबद्दल सांगितले आहे की, जेव्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येतो तेव्हा लसींद्वारा रोखता येणारे आणि अन्य ज्ञात स्थितीत वाढणारे आजार यांमुळे होणा-या मृत्यूंमध्येही मोठी वाढ होऊ शकते. पश्चिम आफ्रिकेतील तीन देशांमध्ये पसरलेल्या इबोलाच्या संसर्गाचे उदाहरण यासंदर्भात डब्ल्यूएचओने दिले आहे. २०१४-१५ मध्ये इबोलाच्या प्रकोपामुळे ज्यावेळी जवळजवळ संपूर्ण आरोग्य यंत्रणा या संसर्गजन्य आजाराभोवती केंद्रित झाली होती, तेव्हा, मलेरियापासून एड्सपर्यंत अन्य आजारांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण सरासरी मृत्यूंच्या संख्येपेक्षा कितीतरी वाढले होते.

या उदाहरणामुळे एक भीतीदायक शक्यता आपल्यासमोर उभी राहते आणि कोविड-१९ चा मुकाबला करण्याच्या काळात सावधगिरी बाळगण्याची सूचनाही या उदाहरणातून मिळते. जगभरात दरवर्षी ५ कोटी ७० लाख मृत्यू होतात. जर आरोग्य यंत्रणांवर पडणा-या कोविड-१९ च्या ताणामुळे अन्य आजारांच्या बाधेने होणा-या मृत्यूंचे प्रमाण ५ टक्के जरी वाढले तरी त्याचा अर्थ २८ लाख मृत्यू असा होतो. कोविड-१९ मुळे होऊ शकणा-या अंदाजे मृत्यूंपेक्षा हा आकडा कितीतरी अधिक आहे. जेव्हा आपण जागतिक पातळीवर होणा-या मृत्यूंच्या प्रमुख कारणांवर नजर टाकतो, तेव्हा ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोर येते. इस्केमिक हृदयविकार आणि स्ट्रोक यामुळे २०१६ मध्ये १ कोटी ५२ लाख मृत्यूंची नोंद झाली होती. सर्व प्रकारच्या कर्करोगांमुळे ९६ लोकांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका

फुफ्फुसांचा कर्करोग (ट्रेकिया आणि ब्राँकसच्या कर्करोगासह) १७ लाख मृत्यूंना कारणीभूत ठरला होता. श्वसनमार्गाच्या खालच्या हिश्शाला झालेल्या संसर्गामुळे ३० लाख लोकांना प्राण गमवावा लागला होता. मधुमेहामुळे १६ लाख मृत्यू झाले होते. ही सर्व आकडेवारी जगभरातील मृत्यूंची असून, ती केवळ २०१६ या एकाच वर्षातील आहे.हे सर्व असे आजार आहेत, ज्यात रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते, वेळेत योग्य उपचार आणि औषधपाणी मिळावे लागते आणि सर्व प्रकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या आजारांमध्ये किंवा अन्य कोणत्याही आजारांमध्ये तत्काळ किंवा आपत्कालीन उपचारांची आवश्यकता नाकारली गेली तर मृत्यू किंवा अपंगत्व येण्याची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गंभीर दुखापती झाल्यास आणि योग्य वेळी वैद्यकीय सुविधा न मिळाल्यास मृत्यू किंवा अपंगत्व येऊ शकते.

कोविड-१९ च्या संकटाचे गांभीर्य ओळखून वाटचाल करीत असताना मानसिक रुग्णांची देखभाल करण्याची गरजही वाढली आहे. अशा व्यक्तींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता संशोधक व्यक्ती करीत आहेत. आत्महत्यांचा आलेख वाढूही लागला आहे. याव्यतिरिक्त अन्य एका महत्त्वपूर्ण कारणासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने तयार ठेवावी लागते. ते कारण म्हणजे, माता आणि बालसंगोपन. मातृत्वाच्या काळात झालेल्या दुर्लक्षामुळे मातेच्या आणि बाळाच्याही जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. कोविड-१९ च्या आव्हानाचा मुकाबला करीत असताना आणि त्यासाठी धोरण तयार करीत असताना राज्यकर्त्यांना या सर्व अन्य कारणांकडे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार आहे. अन्य कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे केवळ उपचारांअभावी कुणाचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

डॉ. संजय गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या