नवीन वर्ष सुरू होताच सोन्याच्या किमतीत अचानक वाढ सुरू झाली. सध्याच्या काळात चोवीस कॅरेटच्या सोन्याचा भाव ५७ हजार प्रति तोळा असा आहे. २४ जानेवारीला २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ५७,३६७ रुपये प्रति तोळा होता. यापूर्वी हा स्तर २० फेब्रुवारी २०२२ मध्ये गाठला होता. सध्या २३ कॅरेटच्या सोन्याचा भाव हा ५७,१३२ रुपये प्रति तोळा आहे. तर २२ कॅरेटच्या सोन्याचा भाव हा ५२,५४४ रुपये प्रति तोळा आहे. १८ कॅरेटच्या सोन्याचा भाव हा प्रति तोळा ४३०२२ रुपये आहे. सोन्याची किंमत वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. ते जाणून घेऊ.
नवीन वर्ष सुरू होताच म्हणजे जानेवारीत सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. गेल्या काही वर्षांत सोन्याचा भाव हा ५० हजारांच्या पुढे राहिला आहे. कोरोना काळात देखील सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती. पण शेअर बाजार वधारताच सोन्यात काही प्रमाणात घसरण पाहावयास मिळाली. मात्र जानेवारीत सोन्याच्या किमतीत सुमारे अडीच हजार रुपयांची वाढ दिसली. तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारीत लग्नाच्या तारखा असल्याने सोन्याच्या भावात आणखी उसळी येऊ शकते. लग्नसराईचा मोसम संपला की सोन्याच्या दरात पुन्हा घसरण होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या किमतीत बरीच तेजी पाहावयास मिळू शकते. अर्थात सोन्याच्या किमतीवर जागतिक घडामोडींचा परिणाम राहू शकतो. म्हणून सोन्याच्या किमतीबाबत अद्याप निश्चितपणे सांगता येणार नाही. जगभरात मंदीची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक देशांत तर आर्थिक उलथापालथ सुरू देखील झाली आहे. त्यामुळे केंद्रीय बँकांकडून सोन्याचा साठा वाढविला जात आहे. कारण सोने हे सर्वांत सुरक्षित मानले जाते. जवळपास सर्वच देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. ही वाढ करण्याचा उद्देश म्हणजे मंदीच्या काळात देशाला महागाईच्या स्थितीपासून रोखणे. केंद्रीय बँकांनी सोन्याचा संग्रह वाढविल्याने जागतिक पातळीवर सोन्याचा भाव अचानक वाढला. अशावेळी वर्षाच्या शेवटपर्यंत किमती आणखी वाढू शकतात, असे म्हटले जात आहे.
गुंतवणूकदारांकडून मागणीत वाढ
जागतिक पातळीवरच्या मंदीच्या शंकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार हे शेअर बाजारातील गुंतवणूक काढून सोन्यात टाकत आहेत. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते. म्हणूनच गुंतवणूकदार आता गोल्ड बाँड किंवा भौतिक रूपातील सोने खरेदी करत आहेत.
लग्नसराईमुळे मागणीत वाढ
देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत ही मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे घरगुती बाजारात देखील सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता आहे. भारतात वार्षिक ६११ टन सोन्याच्या दागिन्यांची मागणी असते तर चीनमध्ये दागिन्यांच्या रूपातून ६७३ टन सोन्याची मागणी नोंदविली गेली आहे. यानुसार भारत दागिन्यांच्या मागणीत आघाडीवर दुस-या स्थानावर आहे. सोने अन्य धातूंच्या तुलनेत महाग का? अन्य धातंूच्या तुलनेत सोने महाग असण्याचे प्रमुख कारण म्हणजे हा धातू आपल्याला शुद्ध रूपातून मिळत नाही. त्याच्यावर प्रक्रियेला बराच काळ लागतो. सोने शुद्ध करण्यासाठी खर्चिक प्रक्रिया करावी लागते. म्हणून अन्य धातूंच्या तुलनेत सोने महाग असते.
भारतीयांना दागिन्यांचा मोह
दागिने खरेदीत भारताचा चीननंतर नंबर लागतो. वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलच्या अहवालानुसार,ं भारतात दागिन्यांच्या रूपातून सोन्याला सर्वाधिक मागणी आहे. यातही ६० टक्के वाटा हा बांगडी आणि साखळीचा आहे. नेकलेसची मागणी ही जवळपास १५ ते २० टक्केआहे. त्याचबरोबर कर्णफुले आणि अंगठी याचा वाटा दहा ते वीस टक्के आहे. या यादीत नेकलेसचा वाटा हा पंधरा ते वीस टक्केअसला तरी वजनाच्या बाबतीत तो आघाडीवर आहे. बांगडी आणि साखळीचे वजन हे सरासरी एक ते दीड तोळा असते, त्याचवेळी नेकलेस हे तीन ते सहा तोळ्यापर्यंत असते.
-राधिका बिवलकर