27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषया छत्रीखाली दडलंय काय?

या छत्रीखाली दडलंय काय?

एकमत ऑनलाईन

भारतीय हिंदी चित्रपटगीतांत छत्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्याचे दिसून येते. प्रेमगीतांबरोबरच अन्य दृश्यातही छत्री वेगवेगळ्या कारणांसाठी दाखविली गेली आहे. कधी रोमान्स गीतात तर कधी मारधाडीतही छत्री दिसते. खलनायकाचे पात्र जिवंत करण्यासाठीही छत्री उपयुक्त ठरली आहे. कर्जवसुलीसाठी एका गरिबाच्या गळ्यावर छत्रीचे टोक ठेवणारा सावकार आपण हिंदी चित्रपटात पाहिला असेल. चित्रपटातील शिक्षक देखील छत्री बाळगताना दिसतात.

एरवी अडगळीत पडलेल्या छत्रीला पावसाळ्यात अचानक भाव येतो. श्रीमंत असो किंवा गरीब असो, सर्वांसाठी छत्री सारखीच काम करते. छत्री आयुष्य समृद्ध असल्याचे प्रतीक मानले गेले आहे. कुटुंबाला सुरक्षा कवच म्हणून प्रतीकात्मकरीत्या छत्रीच्या चिन्हाचा वापर होतो. श्रीमंतांची छत्री महाग असते. एकेकाळी छत्री बाळगणे ही सामाजिक प्रतिष्ठा असायची. तत्कालीन काळात छत्री केवळ सधन व्यक्तीकडेच असायची. छत्रीला सामाजिक महत्त्व आले, तेव्हा तिचा चित्रपटात शिरकाव झाला. छत्रीने चित्रपटात कथानकानुसार स्थान मिळविले. ‘शो मॅन’ राज कपूर यांनी आपल्या अनेक चित्रपटांतून ‘छत्री’ला वलय मिळवून दिले आहे. अनेक चित्रपटांत छत्रीला शस्त्र म्हणून वापरले गेले आहे. गुंडांचा नायनाट करण्यासाठी छत्री नायकाच्या मदतीला धावून आली. जुन्या चित्रपटातील खलनायक के. एन. सिंह यांची खलनायकीची अनोखी शैली होती. हा खलनायक नेहमीच सुटाबुटात आणि टोपीत दाखविला गेला आहे. तोंडात पाईप ओढत के. एन. सिंह यांची पडद्यावर जेव्हा एंट्री व्हायची तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा यायचा. काही चित्रपटांत त्यांच्या हातात छत्री दिली आणि त्यांंच्यातील खलनायक आणखी उठावदार केला. सांगायचे तात्पर्य एवढेच की, छत्री केवळ ऊन, पावसापासून बचावाचे साधन नाही तर अनेक प्रसंगांचे प्रतीक म्हणूनही त्याचा वापर केला गेला आहे. असे असले तरी छत्रीला सोबत घेऊन कथानक पुढे नेण्याचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे झालेले नाहीत.

हिंदी चित्रपट गाण्यांत छत्रीचा वापर हा नेहमीच झाला आणि आजही पाहावयास मिळतो. छत्रीचा वापर करणा-या चित्रपटांचा उल्लेख केल्यास दोनच चित्रपट डोळ्यासमोर येतात. पहिला मनोज कुमार दिग्दर्शित ‘पूरब और पश्चिम’. यात देशभक्त कृष्ण धवन याची माहिती काही फुटीर लोक ब्रिटिशांना देतात. हे ब्रिटिश मुसळधार पावसात कृष्ण धवनवर गोळ्या झाडतात. प्राण मात्र छत्रीच्या आड लपून सर्वकाही पहात असतो. या दृश्यात मनोज कुमार यांनी छत्रीचा वापर लीलया पद्धतीने केला आहे. यानंतर सनी देओलच्या ‘अर्जुन’ चित्रपटाचा उल्लेख करता येईल. मुंबईतील उपनगर स्थानकाबाहेरचे पावसाळ्याचे एक दृश्य असते. यात लोकांच्या हातात छत्री दाखविली आहे. याच छत्रीचा आधार घेत एकाची हत्या केली जाते. या दृश्यासाठी लोकांना बोलावले होते. हे दृश्य पावसात करायचे होते आणि तलवारीचा देखील वापर करायचा होता. प्रत्येक व्यक्तीच्या हातात दोन दोन छत्र्या होत्या. कधी तलवारीने छत्री फाटते तर कधी चेह-यावर छत्रीचे टोक घुसते. हे खूप अवघड दृश्य होते. परंतु ते पूर्ण झाले. हिंदी चित्रपटातील एक संस्मरणीय दृश्य म्हणून ते सिद्ध झाले. या दृश्यात शेकडो छत्र्या दाखविल्या आणि दिग्दर्शक राहुल रवेल आणि सिनेमेटोग्राफर बाबा आझमी यांनी हे दृश्य ‘यादगार’ केले.

‘श्री ४२०’ चे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे कानावर पडताच राज कपूर-नर्गिस आणि छत्री हे दृश्य डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही. हे दृश्य हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर ठरले. या दृश्याची अनेकांनी पुढे नक्कल केली. परंतु आर. के. स्टुडिओत साकारलेल्या या रोमँटिक दृश्याची सर कोणालाही आली नाही. चहाच्या केटलीतून बाहेर पडणारी वाफ, मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस, रेनकोट घालून जाणारी मुले हे दृश्य या रोमान्स गीताचा परमोच्च बिंदू होता. या गीताबरोबर एक रंजक कहाणी देखील जोडली गेलेली आहे. संगीतकार शंकर-जयकिशन यांना गीतातील एका ओळीबाबत आक्षेप होता. ‘राते दसो दिशाआें से, कहेगी अपनी कहानियाँ’ ही ओळ त्यांना पटली नाही. कारण दिशा तर चारच असतात. राज कपूर यांनी देखील लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या मताला दुजोरा दिला. परंतु गीतकार शैलेंद्र यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी दहा दिशांचे स्पष्टीकरण दिले. वर, खाली तसेच ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा दहा दिशा सांगितल्या. शेवटी गीत पूर्ण झाले आणि ते हिंदी चित्रपटातील ‘माईलस्टोन’ ठरले. राज कपूर यांच्या ‘छलिया’तील ‘डम डम डिगा डिगा, मौसम भिगा भिगा’ या गीताचाही उल्लेख करता येईल. राज कपूर यांनी ‘श्री ४२०’ मध्ये छत्रीचा वापर हा रोमँटिक दृश्यासाठी केला तर ‘बूट पॉलिश’मध्ये समाजातील दोन वर्गांतील फरक दाखविण्यासाठी छत्रीचे दृश्य उभा केले.

या चित्रपटातील एका दृश्यात रेशनच्या दुकानावर रांग लागलेली असते. गरीब आणि समृद्ध वर्गाचे लोक उभे असतात. अचानक पाऊस येतो आणि पळापळ सुरू होते. यात दोन वर्गांतील फरक लगेचच दिसून येतो. छत्री असणारे लोक रांगेत उभे राहतात आणि गरीब लोग पावसापासून बचाव करण्यासाठी इतरत्र आश्रयाला जातात. रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाच्या दृश्यातही नायक छत्रीच्या मदतीने शत्रूशी सामना करतो आणि मारताना दिसतो. अर्थात रजनीकांत यांच्या चित्रपटात काहीही दाखविले जाऊ शकते. परंतु यात छत्रीचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर केलेला दाखविला आहे आणि ते चांगले दिसते. राज कपूर यांच्या अगोदर गुरुदत्त यांनी ‘बाजी’ चित्रपटात गीतादत्त यांंच्यावर ‘देख के अकेली मोहे’ गीत साकारले आहे. यात गीताबाली क्लब डान्सर म्हणून दाखविले आहे. ती रेनकोट हातात घेऊन पावसात नाचताना दिसते. हे गाणे पावसात नाही तर क्लबमध्ये होते. यात पावसाळी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. ‘मिस्टर अँड मिसेस-५५’ मध्ये ‘ठंडी हवा, काली घटा’ या गीतात मधुबाला आणि त्यांच्या मैत्रिणीच्या हातात छत्री दाखविली आहे.

अशोक कुमार आणि नलिनी जयवंत यांचा चित्रपट ‘समाधी’ मध्ये ‘गोरे गोरे ओ बांके छोरे…’ या गाण्यातही छत्रीचा वापर झाला आहे. अलीकडच्या काळात ‘चालबाज’ चित्रपटात श्रीदेवी रेनकोट घालून नृत्य करताना दाखविली आहे. या गीतात छत्रीचा वापर केला गेला आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियटस्’मध्ये ‘जुबी जुबी…’ मध्ये देखील छत्री दाखविली गेली आहे. १९८२ मध्ये ‘नमक हलाल’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर साकारलेले ‘आज रपट जाए तो…’ या गीतात वा-यामुळे छत्री उडून जाताना दाखविली आहे. संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या गीताने त्या काळात धमाल उडवून दिली. ‘कोई मिल गया…’ या चित्रपटात प्रीती झिंटा आणि ऋतिक रोशन हे छत्री घेऊन ‘इधर चला मै उधर चला…’ या गीतात पावसाळ्यात मस्ती करताना दिसतात. ‘नाजायज’मध्ये ‘अभी जिंदा हूँ तो जी लेने दे भरी बरसात मे पी लेने दे…’ आणि ‘दरियादिल’मध्ये ‘बरसे रे सावन, कांपे मेरा मन…’ या गीताने पाऊस आणि छत्रीची आठवण होते. २००६ मध्ये विशाल भारद्वाज यांनी मुलांसाठी रस्किन बाँडची कहाणी ‘द ब्लू अम्ब्रेला’वर आधारित चित्रपट ‘द ब्लू अम्ब्रेला’ साकारला होता. अजय देवगण यांचा चित्रपट ‘मैदान’च्या पोस्टरमध्ये अजय देवगण हा फॉर्मल लूकमध्ये हातात छत्री आणि बॅग घेऊन फुटबॉलला किक मारताना दिसतो. म्हणजेच छत्रीचा जमाना अजूनही गेलेला नाही

– सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या