32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषरोबोचा कायदेशीर दर्जा कोणता..?

रोबोचा कायदेशीर दर्जा कोणता..?

एकमत ऑनलाईन

विविध उपकरणांची क्षमता मानवी क्षमतांप्रमाणे वाढविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या अल्गोरिदमचा समूह म्हणजे आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय -कृत्रिम बुद्धिमत्ता) होय. हे तंत्रज्ञान आता दैनंदिन जीवनातील घडामोडींमध्ये दिसू लागले असून, सिरी आणि अलेक्सा यांसारखे सेल फोन असिस्टंट असोत किंवा फेशियल रेकग्निशन अ‍ॅप्लिकेशन असोत, सर्वत्र या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अर्जेंटिनाच्या सरकारने नॅशनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ सोशल सिक्युरिटी (एएनएसईएस) आणि फेडरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ पब्लिक रेव्हिन्यू (एएफआयपी) यांसारख्या प्रणालींमध्ये फेशियल रेकग्निशन अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला आहे. संगणक विज्ञानातील तज्ज्ञ लेखक स्टुअर्ट रसेल आणि पीटर नॉर्विग यांनी आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगितले आहेत. १. माणसासारखा विचार करू शकणारी प्रणाली (आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क), २. माणसासारखे काम करणारी प्रणाली (उदाहरणार्थ, यंत्रमानव) आणि ३. शिकू शकणारी आणि नवीन ज्ञानाची निर्मिती करू शकणारी प्रणाली (उदाहरणार्थ, एक्सपर्ट सिस्टीम). या प्रणालींच्या विविध शाखा माणसासारख्या विचार करू शकणा-या असून, त्या सक्षम करण्यासाठी डीप लर्निंग आणि मशिन लर्निंग अल्गोरिदम या तंत्राचा वापर केला जातो. वस्तुत: डीप लर्निंग हा मशिन लर्निंगचाच एक भाग आहे, असे म्हणता येईल.

‘फेक न्यूज’ ही गोष्ट किती घातक आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याहीपेक्षा घातक असलेला ‘डीप फेक’ हा व्हीडीओचा असा एक प्रकार आहे, ज्यात एआय तंत्रज्ञान वापरून बेमालूम बदल केलेले असतात. हे व्हीडीओ अगदी ख-यासारखे दिसतात. ‘डीप फेक अ‍ॅप’ हे आणखी एक उदाहरण असून, संगणकाला एखाद्या व्हीडीओत हुबेहूब फेरफार करण्याची क्षमता देणारे हे अ‍ॅप आहे. ‘रिव्हेंज पॉर्न’ नावाने लोकप्रिय असलेल्या व्हीडीओजसाठी हे अ‍ॅप खास तयार केले आहे. खासगी व्हीडीओ अनधिकृतरीत्या प्रदर्शित करणे असा या संज्ञेचा अर्थ होतो. २०१८ मध्ये बराक ओबामा हे डोनाल्ड ट्रम्प यांना मूर्ख म्हणत असल्याचा व्हीडीओ जगभर गाजला होता. ते एक फेक रेकॉर्डिंग होते आणि त्यातच अभिनेता जॉर्डन पीले आणि बझफीडचे सीईओ जोनाप पीरेटी प्रबोधन करताना दिसतात. फेक व्हीडीओ, चुकीची माहिती डीप फेकच्या माध्यमातून पसरणे किती धोकादायक आहे, याची माहिती देताना ते दिसतात. त्यामुळेच फेक व्हीडीओ किंवा फोटो ओळखायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एखादा व्हीडीओ किंवा फोटो खरा की खोटा, हे ओळखण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग म्हणजे तो ज्या स्रोतांमधून आला आहे, त्याची तपासणी करणे. संबंधित फोटो किंवा व्हीडीओ कुणी पाठविला आहे? पाठविण्यामागचा हेतू काय आहे? तो विश्वासार्ह आहे का? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी आणि एखादी पोस्ट डीप फेक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी ती पोस्ट सर्वप्रथम कुठे शेअर झाली आणि ती कुणी शेअर केली हे अगदी सामान्य मार्ग असून, त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज लागत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेला पहिला गुन्हा, अशी संज्ञा देण्यात आलेली घटना इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये उघडकीस आली होती आणि या प्रकरणी शिक्षाही झाली होती. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या छोट्याशा वृत्तांतात सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीचे कारनामे उघड करण्यात आले होते. एका वीज कंपनीच्या कार्यकारी संचालकाच्या आवाजाची नक्कल करून २ लाख ४३ हजार युरो तातडीने ट्रान्सफर केले जावेत, असे सांगण्यात आले होते. पुढे हीच या टोळीची कार्यपद्धती बनली. एका कंपनीच्या महिला सीईओला अखेरपर्यंत असे वाटत राहिले की आपण आपल्या समूहाच्या प्रमुख कंपनीच्या सीईओशी फोनवरून बोलत आहोत आणि तो आपल्याला हंगेरीतील एका कंपनीसाठी पैसे पाठवायला सांगत आहे. सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम अगदीच तातडीने हवी असल्याचे सांगितले होते आणि ही ट्रान्सफर एका तासाच्या आत व्हायला हवी, अशी मागणी केली होती. आपल्या बॉसच्या इंग्रजीवर असलेला जर्मन भाषेचा संस्कार आणि बॉसच्या आवाजातील चढ-उतार आपल्याला जसेच्या तसे ऐकू आले, असे फसलेल्या महिला सीईओने सांगितले.

ग्रामीण भागातही बांधकाम परवान्याची सवलत

अशा प्रकारे आवाजाची नक्कल करणे आणि त्याचा अल्गोरिदमसाठी वापर करणे फारसे अवघड नाही. एखाद्या हाय-प्रोफाईल व्यक्तीच्या आवाजाचा नमुना गुन्हेगारांना कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. एखाद्या टीव्ही इंटरव् ूमध्ये, रेडिओवर, सोशल नेटवर्कवर, व्हॉट्स अ‍ॅप ऑडिओमध्ये आवाजातील बारकावे स्पष्टपणे येतात. त्यामुळे त्याचा टोन तयार करण्यासाठी एखाद्या मिनिटभराचे रेकॉर्डिंगही पुरते. एखाद्याचा ध्वनिमुद्रित कबुलीजबाब समोर ठेवला गेला तर संबंधित व्यक्ती तो आपला नसल्याचे कसे सांगू शकेल? जो आवाज सगळेजण ऐकत आहेत तो आपला नाही, असा दावा तो कशाच्या आधारे करेल? एखाद्या व्हीडीओमध्ये या तंत्रज्ञानाच्या साह्याने एखादी व्यक्ती विशिष्ट ठिकाणी उपस्थित असल्याचे दाखविले गेले तर आपण त्या ठिकाणी नव्हतोच, हे संबंधित व्यक्ती कसे सिद्ध करेल?

गुन्ह्यांच्या तपासाला प्रारंभ करताना आणि तपासाची दिशा ठरविताना यापुढे आपल्याला तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या पोलिसांचा स्वतंत्र विभाग करून त्यांना तपासासाठी पाचारण करावे लागेल. पुरावा म्हणून एखाद्या फोटोवर किंवा व्हीडीओवर विसंबून राहण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. तपासात मिळालेल्या पुराव्यांची शहानिशा करताना फॉरेन्सिक इमेजिंग आणि व्हीडीओ टूल्स प्राप्त करणे आवश्यक आहे. मोबाईलसारख्या डिव्हाईसचे तपासादरम्यान विश्लेषण करताना नव्या प्रकारची आयुधे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे, हे आता बहुतांश तपास संस्थांना मान्य आहे. समजा एखादा गुन्हा यंत्रमानवाने (रोबो) केला असल्याचे उघड झाल्यास तपास संस्था काय करणार, हा प्रश्नच आहे. कारण यंत्रमानव हे एक यंत्र (हार्डवेअर) आहे. त्याच्या आतमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा (सॉफ्टवेअर) आहे आणि वेगवेगळ्या अल्गोरिदमच्या साह्याने रोबो काम करतो. वेगवेगळ्या कामांसाठी ‘रोबोटिक आर्म्स’ वापरायला सुरुवात झाल्यापासून आजअखेर या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. कायद्याच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानासंदर्भात जो सर्वाधिक चिंतेचा विषय ठरला आहे तो सामाजिक उत्तरदायित्वाचा आहे. म्हणजेच, अनिच्छेने जर एखाद्या व्यक्तीचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई करण्याचे कर्तव्य कोणाचे हा प्रश्न उभा ठाकतो. यातील महत्त्वाची अडचण अशी की, सध्याच्या कायद्यांनुसार, एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचे अशा प्रकारच्या तांत्रिक चुकांमुळे नुकसान झाल्यास त्यासाठी यंत्रमानवाला जबाबदार ठरविण्याची तरतूदच नाही. न्यायाधीश माणसांचा निवाडा करतात; यंत्रमानवांचा नाही!

मग एखाद्या वस्तूमुळे झालेले नुकसान सदोष निर्मितीचा (मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट) परिणाम नसेल तर त्याबद्दल कुणाला दोषी ठरवणार? डीप लर्निंग किंवा मशिन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे घेतलेल्या शिक्षणामुळे रोबोकडून नुकसान झाले तर कुणाचा दोष? अनावश्यक कृत्य करण्यासंदर्भातील अल्गोरिदमचे शिक्षण जर रोबोला निर्मात्या कंपनीने दिले आणि त्यातून नुकसान झाले तर काय करायचे? जर रोबोवर सायबर हल्ला झाला आणि त्याच्या चलनवलनाचे नियमच बदलले तर काय? रोबो आणि अल्गोरिदमचा ‘कायदेशीर दर्जा’ कोणता, याविषयी जगभरात विविध मते मांडली गेली आहेत. नैसर्गिक व्यक्तीचा दर्जा देण्यासाठी संबंधिताचा जन्म व्हावा लागतो. त्यामुळे रोबोला हा दर्जा देता येणार नाही. परंतु रोबो भोवतालाशी थेट संपर्क साधू शकतो आणि नुकसानही करू शकतो. त्यामुळे निर्मात्या कंपनीवरच त्याची जबाबदारी असावी, असे काहींचे मत आहे. रोबोमध्ये जनुकीय साखळी नसल्याने ‘प्राणी’ हा दर्जा त्याला देता येत नाही. रोबोला ‘वस्तू’ हा दर्जा द्यावा तर वस्तूच्या कायदेशीर व्याख्येतही रोबो बसत नाही, कारण वस्तू स्वत: कोणतेच काम करू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर दर्जाच्या कोणत्याही संवर्गात रोबो आणि अल्गोरिदम बसू शकत नाहीत. अर्थात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची मालकी ज्याच्याकडे असेल, त्याच्यावर जबाबदारी सोपविणारा कायदा केल्यास नुकसानीबाबत निर्णय घेता येईल.

अ‍ॅड. प्रशांत माळी
सायबर सुरक्षा तज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या