25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषठाकरे ब्रँडचे काय होणार?

ठाकरे ब्रँडचे काय होणार?

एकमत ऑनलाईन

बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव यांची शिवसेना असे दोन वर्ग करण्यात येऊ लागले तेव्हापासूनच उद्धव यांनी ठाकरे ब्रँड अधिक सशक्त करण्याची पावले उचलायला हवी होती. दुर्दैवाने ठाकरे ब्रँडची किंमत त्यांच्या जवळच्या मंडळींना समजली नाही आणि त्यांनी या ब्रँडला घराणेशाहीच्या रांगेत आणून बसवले. अर्थात, आताच्या सर्व परिस्थितीनंतर ठाकरे ब्रँडला साजेसा अजेंडा आणि व्यूहरचना आखणे सोपे नाही. सत्तांतर एक छोटेसे नाटक आहे. शिवसेना नावाच्या महानाट्याचे काय होणार हा खरा प्रश्न आहे. जनता चोखंदळ आणि चाणाक्ष असते. ती आजच्या राजकीय नाट्यातील सर्व कलाकारांच्या कामाचे बारीक निरीक्षण करणार आहे. तुलनेचा धोका उभयतांसमोर असणार आहे. त्यावर जो मात करेल, तोच तुल्यबळ ठरेल!

काही काही व्यक्तींचा करिष्मा इतका मोठा असतो की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्या कर्तृत्वाला साजेसे काम करणे कठीण होऊन बसते. नाही म्हणायला ही पिढी प्रयत्न जरूर करीत असते, परंतु त्यांची तुलना नेहमी त्यांच्या आधीच्या पिढीशी होत राहते. कर्तृत्ववान बापाच्या पोरांना त्यांचा त्रास होत असतो. अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे समकालीन उदाहरण डोळ्यासमोर येते. शो मॅन म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या राज कपूरच्या मुलांना हाच त्रास झाला. बाप-बेटा एकाच क्षेत्रात असणारी असंख्य उदाहरणे आपल्या समोर येतील. त्यात मोठे उद्योजक असतील, टाटा, बिर्ला आणि अगदी अंबानी. सामाजिक कार्यकर्ते असतील, आमटे परिवार किंवा राजकारणी. शेवटच्या वर्गातले मोठे उदाहरण नेहरू-इंदिरा-राजीव आणि आता राहुल-प्रियांका यांचे देता येईल. तूर्तास हा विषय महाराष्ट्रापुरता सीमित ठेवला तरी बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे-आदित्य यांची नावे डोळ्यांसमोर येतात. त्याचे कारण स्वत: उद्धव ठाकरे यांनी केलेली काही विधाने आहेत. शिवसेनाश्रेष्ठींना अनपेक्षित घडामोडी घडल्यामुळे नेते आणि प्रवक्ते यांचाही गोंधळ उडाला आहे. अशा धक्क्याची सेनेला सवय नाही, असे म्हणता येणार नाही. एखादा नेता पक्ष सोडून जाणे आणि एकगठ्ठा ४५-५० आमदारांनी सोडचिठ्ठी देणे यात मोठे अंतर आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टरवर मोजली जाते. सध्या सेनेला बसलेला भूकंपाचा धक्का किमान दहापेक्षा अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेतून व्यक्त होणा-या प्रतिक्रिया भावनिक असण्यापेक्षा उद्वेग व्यक्त करणा-या आहेत. उद्धव ठाकरे यांचा सात्विक संताप लपून राहिलेला नाही आणि अशा परिस्थितीत ‘ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा’ असे थेट आव्हान त्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे म्हणतात त्यात तथ्य आहे.

एकदा का हा सध्या सुरू असलेला गदारोळ संपला की सेनेप्रमाणेच फुटीर गटाला जमीनदोस्त झालेल्या घराची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे. अशा वेळी ठाकरे नावामागे असलेल्या पुण्याईचे मोठे आव्हान फुटीर गटासमोर असणार आहे. या नावाभोवतीचे वलय आणि वजन त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून उपयोगात आणता येईल काय? धीरूभाई अंबानींची दोन मुले, मुकेश आणि अनिल. दोघांनाही अंबानी या नावाचे वलय पण मुकेश यांच्या तुलनेत अनिल यशस्वी ठरले नाहीत. केवळ आडनावामुळे मुकेशने बाजी मारली नाही. त्याला साजेसे कर्तृत्व त्याने दाखवले. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल क्रमांक सातत्याने पटकावणे त्यांना शक्य झाले. कर्तृत्वाला पूरक अनेक गुणांचा संचय आणि त्यांचे प्रकटीकरण यामुळेच ते शक्य झाले. राजकारणात मुळात नेत्यांची पिढी पुढे आली की तिच्यावर घराणेशाहीचा आरोप करून खच्चीकरण करायला सुरुवात होते. उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला हा त्रास सुरुवातीपासूनच आला. बाळासाहेबांच्या निधनानंतर ६३ आमदार निवडून आणल्याचे सांगून ते अप्रत्यक्षपणे कर्तृत्वाचा हवाला देत आहेत, परंतु तरी त्यांना टीकाकारांची तोंडे पूर्णत: बंद करता आली नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव यांची शिवसेना असे दोन वर्ग करण्यात येऊ लागले तेव्हाच उद्धव यांनी ठाकरे ब्रँड अधिक सशक्त करण्याची पावले उचलायला हवी होती.

टाटांच्या बाबतीत असे झाले काय? जे. आर.डी. टाटांनंतर रतन टाटा यांनी या अतिशय विश्वासार्ह औद्योगिक समूहाची कमान उत्तम सांभाळली. याचे कारण अनेक टाटा कुटुंबाबाहेरील मंडळींना यात सामावून घेतले गेले. आपण जर राजकीय पक्षांमध्ये कॉर्पोरेट कल्चर आले आहे असे म्हणत असू तर त्यांचे गुण राजकारणाने अंगीकारायला काय हरकत आहे? घराणेशाही वाईट नसते हे अंबानी, बिर्ला, गोदरेज, टाटा, महिंद्रा वगैरे उदाहरणांवरून स्पष्ट होते. आपल्या पूर्वजांनी कमवलेल्या गुडविल आणि कर्तृत्वात भर टाकत जाणे हे उत्तराधिका-यांचे काम असते. उद्धव यांचे दुर्दैव असे की त्यांना म्हणावे असे चांगले शिलेदार मिळाले नाहीत. जर एका ठाकरेला असा त्रास झाला असेल तर फुटीर गटाला शिवसेनेसारखे एक रोप पुन्हा लावून त्याचा डेरेदार वृक्ष करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल! ठाकरे ब्रँडला साजेसा अजेंडा आणि व्यूहरचना आखणे सोपे नाही. सत्तांतर वगैरे तसे पाहता एक छोटेसे नाटक आहे. शिवसेना नावाच्या महानाट्याचे काय होणार हा खरा प्रश्न आहे. तुलनेचा धोका उभयतांसमोर असणार आहे. त्यावर जो मात करेल, तोच तुल्यबळ ठरेल!

– मिलिंद बल्लाळ
ज्येष्ठ पत्रकार, ठाणे

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या