25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeविशेषनियमबदलांनी काय साधणार?

नियमबदलांनी काय साधणार?

एकमत ऑनलाईन

जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जात असला तरी क्रिकेट या खेळाला नियमांचे कोंदण आहे. विशेषत: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या नियमांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. नियमांवर बोट ठेवून प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत करण्याचे कसब खेळाडूंमध्ये असणे गरजेचे असते. दुसरीकडे या नियमांमुळे खेळातील रोमहर्षकताही वाढण्यास मदत होते. त्यामुळेच आता क्रिकेटसाठीच्या नियमांमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी एमसीसीने सुचवलेल्या काही नियमांना सौरव गांगुली यांच्या मध्यस्थीने आयसीसीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह समितीने मंजुरी दिली आहे. हे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू केले जातील. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक ही स्पर्धासुद्धा या नव्या नियमांनुसारच होणार आहे. या नव्या बदललेल्या नियमांमुळे खेळावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असे नाही. कारण यातील काही नियम यापूर्वीच लागू केलेले असून ते एव्हाना रूढ झाले आहेत. उदाहरणार्थ, चेंडूवर खेळाडूने लाळ लावू नये, हा नियम कोरोना काळातच लागू करण्यात आला आहे. आता गोलंदाजांची चेंडूला लाळ लावण्याची सवय पूर्णपणे मोडली आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर दुस-या बाजूचा फलंदाज स्ट्राईकसाठी पोहोचला तरी बाद झालेल्या फलंदाजाच्या जागी नवा फलंदाजच स्ट्राईकला असेल, हा नियमसुद्धा प्रायोगिक पद्धतीने वापरण्यात येत आहे. नव्या नियमात मंकडिंग आऊट नाहीसे केले आहे.

आता या पद्धतीने बाद होणा-या फलंदाजाला धावबाद दिले जाणार आहे. यामुळे अशा पद्धतीने बाद होणा-यांवरील टीका कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, आयपीएल २०१९ मध्ये रविचंद्रन अश्विनने जेव्हा जोस बटलरला मंकडिंगने बाद केले होते, तेव्हा अश्विनवर टीका करण्यात आली होती. गोलंदाजी करत असताना अश्विनने पाहिले की, नॉन स्ट्रायकर बटलर क्रिजच्या बाहेर गेला आहे; तेव्हा अश्विनने त्याचे स्टम्प उडविले. ‘जंटलमन्स गेम’ समजल्या जाणा-या क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. आता अशा पद्धतीने नॉन स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीच्या वेळी क्रिजबाहेर असेल आणि गोलंदाजाने स्टम्प चेंडूने उडविला तर फलंदाजाला धावबाद दिले जाणार आहे. भारतीय गोलंदाज विनू मंकडने बिल ब्राऊनला अशाच पद्धतीने बाद केले होते. त्यामुळे अशा प्रकारे फलंदाजाला बाद करण्याच्या पद्धतीला त्यांचेच नाव दिले गेले. मात्र अशा प्रकारे बाद करण्याच्या पद्धतीला योग्य मानता येत नाही.

नव्या नियमानुसार एक फलंदाज बाद झाल्यानंतर आणि नवा फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत कसोटी सामन्यात आणि एकदिवसीय सामन्यात यासाठी तीन मिनिटांचा वेळ आणि टी-२० मध्ये ९० सेकंदाचा वेळ मिळत होता. आता टी-२० मधील मिळणा-या वेळेत काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही वेळ कमी करून दोन मिनिटांवर आणण्यात आली आहे. खरे तर २००० सालापर्यंत नव्या फलंदाजाला क्रिजपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मिनिटांचाच अवधी मिळत होता. मात्र त्यानंतर ही वेळ वाढवून तीन मिनिटे इतकी करण्यात आली होती. आता नव्या नियमांनी पुन्हा ती पूर्वपदावर आणली आहे इतकेच! खेळादरम्यान १०-१५ मिनिटे वेळ वाया जातो याकडे लक्ष गेल्यामुळे आयसीसीने नव्या नियमात हा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार फलंदाजाने क्रिजवर यायला उशीर केला तर त्याला बाद करण्याचे अपील केले जाऊ शकते आणि पंचांकडून ते स्वीकारलेही जाऊ शकते. अशा प्रकारे बाद होणारा हेरॉल्ड हेगेट हा पहिला फलंदाज होता. १९१९ मध्ये त्याला अशा पद्धतीने बाद केले होेते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कुणीही अशा पद्धतीने बाद दिले गेले नाही, हे विशेष.

नव्या नियमांचा विचार करता असेही लक्षात येते की, मागील दशकांत असे अनेक नवे नियम आले, ज्या नियमांनी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलूून टाकला. या नियमातील सर्वांत महत्त्वाचा म्हणजे डीआरएस वापरण्याचा नियम. डीआरएस नियम येण्याच्या अगोदर पंचाद्वारे एकदा निर्णय दिल्यानंतर कोणताही पर्याय नसे. मात्र डीआरएस नियम लागू झाल्यापासून चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे होणा-या टीकेपासून पंचांचाही बचाव होत आहे. तसेच एखाद्या फलंदाजालाही तो बाद झाला आहे असे वाटत नसेल तर डीआरएस वापरून स्वत:चा फायदा करून घेतो. हा नियम पहिल्यांदाच २००८ च्या कसोटी सामन्यादरम्यान वापरला गेला. जवळपास सात वर्षांनंतर जानेवारी २०११ मध्ये हा नियम क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये लागू करण्यात आला. ऑगस्ट २०१९मध्ये सामन्या दरम्यान जखमी झालेल्या खेळाडूच्या जागी दुस-या खेळाडूला आणण्याचा नियम लागू करण्यात आला. मात्र यासाठी मॅच रेफरीच्या संमतीची गरज असते. या नियमाचा फायदा सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या लबुशेनला झाला. सामन्यादरम्यान जखमी झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या जागी खेळायला आलेल्या लबुशेनने चक्क संघातच आपले स्थान पक्के केले. या नियमाचा अनेक संघांनी फायदा उचलला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यामुळे खेळावर मोठा प्रभाव पडला आहे. नव्या चेंडूमुळे वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. क्रिकेटमधील काही बदल लोकप्रियता वाढवण्यासाठी केलेले आहेत. क्रिकेटच्या संचालकांना जेव्हा जाणवले की कसोटी क्रिकेट कंटाळवाणे होत चालले आहे आणि प्रेक्षकांनी कसोटी सामन्यांकडे पाठ फिरवली आहे, तेव्हा १९७१मध्ये एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली. क्रिकेटच्या संचालकांना पुन्हा जेव्हा असे वाटले की, खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी खेळाच्या स्वरूपात बदल करून केवळ साडेतीन तासांचाच सामना व्हावा तेव्हा टी-२० क्रिकेटचा जन्म झाला. अशा अनेक बदलांमुळे क्रिकेट बोर्डाचे उत्पन्नही भरमसाठ वाढले. त्यामुळे क्रिकेट आणखी रोमहर्षक बनवण्यासाठी सतत नियमांत बदल केले जात आहेत.

– नितीन कुलकर्णी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या