22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeविशेषएकट्या मुलांना सांभाळताना

एकट्या मुलांना सांभाळताना

एकमत ऑनलाईन

‘‘आजकाल काव्या, अजिबात ऐकत नाही. तिला सारखा टीव्ही आणि मोबाईल लागतो. जेवणही धड करत नाही हल्ली, कमालीची चिडचिड करते. मला खूप त्रास होतोय या गोष्टींचा. मी काय करू?’’ वृषाली अत्यंत वैतागलेल्या स्वरात बोलत होती. सध्या मुलांचे आई आणि बाबा दोन्ही वर्किंग असल्यामुळे एकच मूल होऊ देण्याची पद्धत रूढ झाली आहे. अशा वेळी काव्यासारख्या मुलांना हाताळायचं कसं? हा प्रश्न बहुसंख्य पालकांना सतावतो.

या मुलांच्या जडणघडणीतील समस्या या बहुतेक त्यांच्या घरातील आई-बाबा आणि इतर सदस्य मुलाशी कसे वागतात यावरती अवलंबून असते. उदाहरणार्थ एकटं मूल आहे तर त्याचा अति लाड होतो. ‘‘लाडं- लाडं झालं वेडं’’ त्यातूनच मग त्या मुलांच्या हट्टीपणाला सुरुवात होते. यामध्ये सर्व मुलांचे पालक असेच वागतात असे म्हणण्याचा हेतू नक्कीच नाही. पण बहुतेकवेळा एकट्या मुलांच्या विकासातील हेच चित्र दिसते. अशा मुलांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा हट्टीपणा येतो. खूपदा मुलांना पालकांवर अवलंबून राहण्याची सवय होते. लहान वयात या मुलांनी केलेल्या अनेक खोड्या छान वाटतात पण त्यांची सवय लागण्याची शक्यता त्या मुलांमध्ये जास्त दिसते. ज्या सवयींचे पुढे नकारात्मक वर्तनात रुपांतर होते. तुमचं एकुलतं एक मूल इतरांमध्ये सहभागी होण्यास नकार देतं, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय नसल्यामुळे एखादेवेळी असा प्रसंग आला तर समायोजन करताना खूप त्रास होतो. भावंड नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय नसते. अशा वेळी एकटं पडण्याचा संभव जास्त असतो किंवा लगेच ताण येण्यास सुरुवात होते.

उदा. वीर एकटाच असल्यामुळे त्याला घराबाहेर पडण्यासाठी सुरुवातीला पालकांनी खूप काळजी घेतली पण आत्ता त्याला सर्वांमध्ये सहभागी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कोणाच्याही घरी जायला त्याला आवडत नाही. कधीकाळी बाहेर जाण्याचा प्रसंग आला तर हा कोणाशीही काहीही बोलत नाही. एकटं गप्प राहणं पसंत करतो. पालकांना हळू आवाजात घरी निघण्याचा आग्रह धरतो. अलीकडे तर खूपच आक्रमक पध्दतीने वागतो.

एके दिवशी मम्मा म्हणाली की, टीव्ही बंद कर आणि शांतपणे जेवणाकडे लक्ष दे तर त्याने जेवणाचं ताट खुर्चीवरती भिरकावलं. मुलांच्या अशा वागण्याला ‘ओन्ली चाईल्ड सिन्ड्रोम’ असे म्हटले जाते. बालविकास क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासक असे म्हणतात की, खूपदा एकट्या मुलांचे पालक मुलाच्या वर्तनाच्या समस्या या १९ व्या शतकात सुरू झाल्या जेव्हा बाल मानसशास्त्रज्ञ जी. स्टॅनली हॉल आणि ई. डब्ल्यू. बोहॅनन यांनी भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या मुलांचा अभ्यास केला आणि त्यांच्या वर्तनातील वैशिष्ट्यांचे वर्गीकरण करण्यासाठी प्रश्नावलीचा वापर केला तेव्हा त्यांना असे दिसून आले की, ज्या मुलांना भावंड नाहीत त्यांच्या वर्तनातील नकारात्मक वैशिष्ट्यांची यादी ही भावंड असलेल्या मुलांच्या तुलनेत अधिक जास्त होती.

याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, ज्यांना एकच मूल वाढवायचं आहे त्यांनी इच्छा नसताना दुस-या मुलांना जन्माला घालावं. मुद्दा हा आहे की एकटं मूल सर्वांच्या समोर सतत लक्षवेधी परिघात राहिल्यामुळे आणि त्याला सर्वच बाबी अधिकच्या दिल्या गेल्यामुळे नकार पचवायला खूप त्रास होतो. अर्थात सर्वांच्या घरी असेच चित्र असते असे मुळीच नाही. तरीही अशा एकट्या असलेल्या मुलांचा सम्यक पध्दतीने सांभाळ करण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी तज्ज्ञ काही उपाय सुचवतात.

जसे की, इतरांशी संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा- सॅनफ्रान्सिस्को येथील बालरोग चिकित्सक जे. लेन टॅनर असे म्हणतात की, एकटी मुलं खेळणी, बाहुल्या किंवा इतर वस्तूंशी संवाद साधतात. खेळण्यातील वस्तूंना जिवंत अस्तित्व असल्याचे ते समजतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. आपल्याला एकटेपणा जाणवू नये म्हणून मुलं स्वत:च अनेकदा काल्पनिक मित्र किंवा बाहुल्या किंवा भरलेल्या प्राण्यांसारख्या निर्जीव वस्तूशी संबंध निर्माण करतात. कधी कधी असा खेळ ठीक असतो परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं घरातील पालकांनी मुलांसोबत गप्पा मारल्या पाहिजेत. हसायला शिकवा- द बर्थ ऑर्डर बुक : व्हाई यू आर द वे यू आर (रेव्हल) या पुस्तकाचे लेखक डॉ. केविन लेमन यांच्या मते, मुळात मुलं इतकी तार्किक, अभ्यासपूर्ण आणि सरळ विचारसरणीची असतात की, ते अतिगंभीर होऊ शकतात आणि गोष्टींमध्ये विनोद पाहण्यात अपयशी ठरू शकतात. पालकांनी लोखंडासारखे कठोर न होता मुलांसोबत हसायला शिकलं पाहिजे गमतीजमती केल्या पाहिजेत. अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या भावविश्वात शिरता येत नाही. पण तरीही काही पालक मात्र मुलांचे खूप चांगले मित्र होतात.

मुलांना जबाबदारी द्या- एकुलत्या एक मुलाला वाढवताना पालक सगळी कामं स्वत:च करण्याचा पायंडा पाडतात. वास्तविकत: मूल एकटं असो की दुकटं त्याची काही कामे त्याला सुरुवातीपासूनच करायला शिकवली जाणं आवश्यक आहे. आपल्या स्वत:सारखे मुलांना होऊ देऊ नका- आपला काळ हा वेगळा होता. आजचा काळ प्रचंड बदललेला आहे. मला जे मिळालं नाही ते मुलांना आपण देतो याचा अर्थ असा नाही की, त्याने आपल्या महत्त्वाकांक्षासारखेच घडले पाहिजे. ती कॉपी करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपलं मूल हे जगातलं एकमेव मूल आहे. मुलांना सारखं एंगेज करू नका- आपलं मूल मशिन नाही किंवा यंत्रही नाही तर तो हाडामांसाचा जीव आहे. मोठं झाल्यानंतर त्याने काय व्हावं यासाठी त्याच्या बाल्यावस्थेतील आनंद हिरावण्याचा कोणत्याही पालकाला अधिकार नाही, तेव्हा मूल एकटं आहे म्हणून त्याला अति एंगेज करू नये.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या