23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeविशेषमहिलांनो नव्या मार्गाने लक्ष्मीपूजन केव्हा कराल?

महिलांनो नव्या मार्गाने लक्ष्मीपूजन केव्हा कराल?

एकमत ऑनलाईन

मागच्या आठवड्यात गौरी व गणपतीचा सण वेगळ्या आनंदामध्ये आपण साजरा केला. वास्तविक पाहता गणपतीचे आगमन आणि त्यानंतर काही दिवसांत महालक्ष्मीचे पदार्पण हे आनंदाला उधाण आणते. त्याला कारणेही तशीच असतात. या काळात गणपतीसाठी मोदक, महालक्ष्मीसाठी सोळा प्रकारच्या विविध भाज्या, गोड पदार्थांच्या जेवणाची एक पर्वणीच असते. खासकरून मराठवाड्यामध्ये हा सण खूप मोठा असतो. तो ग्रामीण भागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये साजरा करत असतात. याच काळात आपल्याजवळ तुटपुंज्या स्वरूपात असणा-या लक्ष्मीचे पूजन देखील केले जाते. सामान्य व्यक्ती लक्ष्मीचे पूजन करीत असताना कर्मकांड करतो. कर्मकांड सोडल्यास ख-या अर्थाने आपण लक्ष्मीचे पूजन करतो काय? महालक्ष्मीच्या काळात आपण खर्च करीत असताना देखील काही नियम, रूढी व परंपरा पाळतो. खरंच या तत्त्वाचे पालन आपण वर्षभर करतो का? याचे उत्तर नकारात्मक असू शकेल. आपणास मिळालेल्या लक्ष्मीचा सन्मान ख-याअर्थाने करायचा झाल्यास वर्षभर आपल्या गृहलक्ष्मीला सन्मान, स्वाभिमान व आनंदी ठेवायचा प्रयत्न आपण मनापासून करतो काय? आपणास असे वाटेल की, आजच्या लेखाचा विषय वेगळा आहे काय? परंतु तसे नाही.

आजचा विषय म्हणजे आपणास मिळालेल्या लक्ष्मीचे जतन कशाप्रकारे करायला हवे? त्याची देखभाल कशी करायला हवी? हे जर समजले असेल तरच ख-या अर्थाने आपण लक्ष्मीच्या या सणात दो-याच्या गाठी घेण्याची प्रथा पाळतो. आपल्या जवळील असणा-या संपत्तीचे, लक्ष्मीचे जास्त संवर्धन करून वाढ होऊ शकते. अनेक सामान्य गुंतवणूकदार लक्ष्मीचे पूजन करतात. त्यांना त्यांच्या जवळ असणारी संपत्तीची देखभाल करता येत नाही. त्याचा पोर्टफोलिओ योग्य पद्धतीने बांधता येत नाही. लक्ष्मीपूजनाच्या काळात संपत्तीचे पूजन म्हणजेच, त्याचा पोर्टफोलिओ योग्य पद्धतीने बांधणे. त्याची पुनर्रचना करणे होय. त्यामध्ये आवश्यक तो बदल अनेक गुंतवणूकदार करताना दिसतात.

वास्तविक पाहता सामान्य गुंतवणूकदाराकडे आकडे असणारी संपत्ती तीही विषम स्वरूपामध्ये आढळते. त्यातूनच गरीब व श्रीमंत असा वर्ग निर्माण झालेला आहे. आजच्या काळात गरीब व श्रीमंत मानसिकतेचा सुवर्णमध्य साधणारा वर्ग म्हणजे मध्यम वर्ग होय. अशा सर्व वर्गांची संपत्ती याचा पुष्पगुच्छ किंवा संपत्तीचा समूह हा विषम स्वरूपामध्ये असतो. आपण लक्ष्मीसमोर नैवेद्य दाखवीत असताना त्यांना नैवेद्यामध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, भाज्या, चटण्या, गोड पदार्थांची वर्णी लागलेली असते. खास करून महिलावर्ग यामध्ये काही चुकू नये म्हणून, दक्षता घेतात. मी यालाच कर्मकांड म्हणतो. असे कर्मकांड करण्यापेक्षा त्यांच्याकडे असणारी सर्वांगीण संपत्तीची देखभाल सुयोग्य प्रकारे करावी लागते. प्रत्येक महिलांनी बचत गटात सहभागी व्हावे. त्यांच्याजवळ असणा-या संपत्तीची वर्गवारी पद्धतशीरपणे केलेली आहे काय? हे तपासणे गरजेचे आहे. जवळपास सर्वांकडे असणारी संपत्ती सोने-नाणे याचे वर्गीकरण करायचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे आढळते. त्यांच्याकडे घर एवढे मोठे असते परंतु, त्याची रंगरंगोटी करण्यासाठी पुरेसा निधी नसतो.

काही व्यक्तीच्या घरात सोने घरामध्ये ठेवतात. जे लॉकरमध्ये ठेवण्याची गरज भासते. काही महिला अशा सोन्याचे रूपांतर दागिन्यांमध्ये करीत असतात. ते परिधान करून नातेवाईक मित्र-मैत्रिणींसमोर मिरवीत असतात. अनेक सामान्य व्यक्तीला जुने दागिने मोडून नवीन दागिने करण्याची हौस किंवा व्यसन जडलेले असते. आजच्या काळात नवीन दागिने तयार करण्यासाठी होणारा मेकिंग चार्जेसही खूप वाढत आहे. ज्याला आपल्या भाषेमध्ये ‘घडाईपेक्षा मढाई जास्त’ असे आपण म्हणतो. तो एक प्रकारचा खर्च असतो. असा खर्च करीत असताना कष्टाने पैसा कमवलेला असतो. असा पैसा एक प्रकारे आपण वायाच घालवत असतो. त्याऐवजी याच काळात आपल्या मुलांच्या नावाने एखाद्या चांगल्या योजनेच्या म्युच्युअल फंडाची निवड करून त्याचा एसआयपी केल्यास ते योग्य ठरते.
आजच्या काळात आपली मुले ही ख-या अर्थाने आपल्या कुटुंबाची संपत्ती असते. दुर्दैवाने काही कुटुंब त्यातील सदस्य हे फक्त पैशाच्या मागे लागल्याने पैसारूपी संपत्ती गोळा करीत असतात.

त्यांच्या मुलाकडे दुर्लक्ष करीत असतात. अशी मुले सांभाळण्यासाठी पाळणाघर, अंगणवाडी, शिशुगृहे इ. अशा वर्गाकडे सुपुर्द करीत असतात. त्यांना पगार म्हणून ठराविक रक्कम देतात. लहान वयांच्या मुलावरती संस्कार हे त्यांच्या आईने, आजी-आजोबा, वडिलांनी करणे गरजेचे असते परंतु असा वर्ग हा मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमात राहतो. नोकरदार असणा-या महिला त्यांची अपत्ये पाळणाघरात ठेवल्याने, त्यांच्यावर होणारे संस्कार हे इतर तिस-या व्यक्तीकडून होत असतात. कदाचित भविष्यात अशी मुले ही आपल्या कुटुंबाची आपली संपत्ती न होता देयता किंवा लायबिलिटी ठरत असतात. हे कटू सत्य पचवावे लागेल. वास्तविक पाहता आपली मुले ही आपली संपत्ती असते. अशा मुलांमध्ये भावनिक गुंतवणूक ज्या स्वरूपामध्ये केलेली असेल, तरच तशाच प्रकारचा परतावा भविष्यामध्ये कदाचित मिळतो.. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवणे गरजेचे असते. यासाठी बदलत्या काळामध्ये आपली मुले ही आपली संपत्ती व्हावी, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारची गुंतवणूक करणे म्हणजे कला व शास्त्र आहे. अनेकवेळा पाळणाघरांमध्ये होणारा नकारात्मक संस्कार, घटना आपण वारंवार वर्तमानपत्रांमध्ये वाचतो, टीव्हीमध्ये पाहतो. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आपल्या कोवळ्या मुलांच्या मनावर ती सकारात्मक संस्कार, नैतिक मूल्यांची पेरणी, आर्थिक संस्कार, खेळाच्या माध्यमातून सहज शिकवता येऊ शकते. आजच्या काळात मुलांचे पालक होणे सोपे असते. सुजाण पालक होण्यासाठी पालकात सकारात्मक संस्कार असणे गरजेचे असते. मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी, चांगले राहणीमान मिळवण्यासाठी आपण जो पैसा कमवितो तो योग्य मार्गाने खरंच आपण मिळवितो काय? मिळणारी लक्ष्मी योग्य प्रकारे येते काय? याचा विचार करण्यास अनेकास वेळ देखील नसतो. त्यामुळेच अविचारी स्वरूपातून येणारी लक्ष्मी ही खरंच लक्ष्मी असते काय? याचा विचार करण्याची ही वेळ चांगली आहे. आपण आयुष्यात कमवत असलेली लक्ष्मी अयोग्य मार्गाने मिळाल्यास त्याचे रूपांतर संपत्तीमध्ये होत नाही. असा पैसा हा दवाखान्यासाठीच खर्च होतो. औषधपाणी, शस्त्रक्रिया यावर मोठ्या स्वरूपात खर्च होतो.

अवैध स्वरूपामध्ये मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी खर्च होतो. कोर्ट-कचे-या यावर मोठ्या स्वरूपात खर्च करावा लागतो. त्यातून मानसिक स्वास्थ्य व समाधान मिळत नाही. त्याच्याही पुढे जाऊन आपली अपत्ये मुलगा किंवा मुलगी असो ते वाममार्गाला जातात. नवीन पिढी ही आपली संपत्ती घेऊन जातात. चांगली लक्ष्मीही आपणास मिळालेले उत्पन्नाचे रूपांतर बचतीमध्ये करता यायला हवे. यासाठी आर्थिक शिक्षण असण्याची गरज आहे. ज्याप्रकारे लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी काही रूढी व परंपरांचे पालन करायला हवे. त्याच प्रकारे आपले अपत्य ही ख-या अर्थाने जबाबदार नागरिक होऊन समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल जाणीवपूर्वक करणे गरजेचे ठरते. पालकच आपल्या मुलाचे शिक्षक असतात. जरी काम असेल तरीदेखील पालकच हा ख-या अर्थाने शिक्षक असतो हे विसरून चालणार नाही.नवीन पिढीतील तरुण वर्ग हा नक्कीच शिकलेला आहे. त्यामुळे अशा वर्गाला शेअर बाजाराची ओळख पटू शकते. ठराविक समाजातील तरुण वर्ग शेअर बाजारांमध्ये पदार्पण करीत असतात.

चांगला शेअर्स खरेदी करतात. तशा प्रकारचा सराव करीत असतात. त्यातून संपत्ती निर्मिती करण्यात त्यांचा सहभाग मोठ्या स्वरूपामध्ये असतो. त्याच्या पुढचा भाग म्हणजे शेअर ट्रेडिंग करणे होय. अनेक शिकलेल्या मुली किंवा महिला जुजबी नॉलेज घेऊन किंवा प्रशिक्षण करून शेअर ट्रेडिंग करीत असतात. त्यातून फायदा मिळवीत असतात. आपणास आश्चर्य वाटेल काही मुली तर महिन्याला ५० हजार रुपयांची कमाई त्याद्वारे करीत असतात. कदाचित काही महिलांना खोटे वाटेल. परंतु हे खरे आहे. म्हणून संपत्ती मिळवण्यासाठी नवीन मार्गाचा शोध घेणे म्हणजेच लक्ष्मीचे पूजन करणे असे नव्हे काय? बदलत्या काळामध्ये घरकाम करणारी महिला देखील चांगल्या प्रकारे कमाई करू शकते. फक्त गरज आहे सकारात्मक विचारांची. शेजारी-पाजारी अशी चकाट्या न पिटण्याची, भांडणे न करण्याची.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या