24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeविशेषफंडातील गुंतवणूक केव्हा मोकळी कराल?

फंडातील गुंतवणूक केव्हा मोकळी कराल?

एकमत ऑनलाईन

सध्या शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसते. सेन्सेक्स साठ हजारावर गेल्याने बाजारात अनेक गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक मोकळी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणा-या वर्गाला त्यांची गुंतवणूक कधी मोकळी करायची? ही माहिती असायला हवी. अनेक गुंतवणूकदारांची समस्या अशी असते की, आपण केलेली गुंतवणूक केव्हा मोकळी करावी हे त्यांना समजत नाही. अशी केलेली गुंतवणूक केव्हा मोकळी करावी याचे एक शास्त्रही आहे आणि कला देखील. अशा प्रकारचे कौशल्य सर्वांनाच जमते असे नाही. अशा गुंतवणुकीमधून फायदा मिळवायचा असेल तर केलेली गुंतवणूक योग्य वेळी मोकळी करणे गरजेचे ठरते.

जसे क्रिकेटमधील नावाजलेला फलंदाज कोणत्या बॉलवर सहा धावा घ्यायच्या? व कोणता चेंडू खेळून काढायचा? हे जसे त्याला समजते त्याचप्रमाणे परिपक्व गुंतवणूकदार त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी केलेली गुंतवणूक केव्हा मोकळी करायची? हे त्यांना समजलेले असते. वास्तविक पाहता गुंतवणूकदार हा स्वत:च्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुयोग्य वाटणा-या फंडामध्ये गुंतवणूक करीत असतो. बहुसंख्य गुंतवणूकदार हे जेव्हा आर्थिक गरज निर्माण होईल, तेव्हा अशी गुंतवणूक मोडत असतात. मग बाजारांमधील तेजी आणि मंदीचा ते विचार करत नाहीत. बाजारातील घटनांकडे दुर्लक्ष करीत असतो. बाजारामध्ये तेजी किंवा मंदी यामुळे ख-या अर्थाने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर प्रत्यक्ष परिणाम झालेला असतो. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये वाढ किंवा घट झालेली असते. सामान्य गुंतवणूकदाराला हे समजत नाही.

सध्याच्या काळाचा विचार करता बाजारातील अनेक गुंतवणूक योजना शेअर बाजाराशी निगडित असतात. शेअर बाजारातील तेजी आणि मंदीचा परिणाम म्युच्युअल फंडावर म्हणजेच फंडाच्या नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूवर झालेला असतो. कोणत्याही गुंतवणूकदाराचा गुंतवणूक करण्याचा मूळ उद्देश त्यांच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होणे हा असतो. जगाच्या पाठीवरील कोणताही गुंतवणूकदार हा तोटा होण्यासाठी गुंतवणूक करीत नाही. शेअर बाजाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्यांचा संबंध नाही, असा गुंतवणूकदार त्याच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांनी केलेली गुंतवणूक करतो. बँकेच्या एफएफडीप्रमाणे परतावा मिळेल, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

वास्तविक पाहता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फंडामधून मोकळे करीत असताना ढोबळ मानाने दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे आपले आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि दुसरे कारण म्हणजे बाजारातील तेजी व मंदीचा अभ्यास करून आर्थिक ध्येय साध्य करण्यापूर्वीचा कालावधी हा सहा महिन्यांचा असावा. अशा पद्धतीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोकळी केली तरच गुंतवणूकदारांचा सर्वांगीण विकास ख-या अर्थाने साधता येतो. असे प्रकार फार कमी स्वरूपामध्ये आढळतात. वास्तविक पाहता एखादा कर्मचारी रिटायर होण्यापूर्वीच्या सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी केलेल्या गुंतवणूक काढण्यासाठीचा कालावधी हा योग्य ठरू शकतो. या कालावधीमध्ये शेअर बाजारामधील असणा-या तेजी व मंदीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. तेजीच्या कालावधीमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गुंतवणूक मोडल्यास गुंतवणुकीमध्ये फायदा होतो. असा गुंतवणूकदार हा आनंदी व समाधानी राहतो.

त्यांनी ठरविलेले आर्थिक ध्येय साध्य झालेले असते. एखादा सामान्य गुंतवणूकदाराने वयाच्या ४० व्या वर्षी पेन्शन फंडामध्ये गुंतवणूक केल्यास सर्वसाधारणत: वयाच्या ६० व्या वर्षी रक्कम मिळणे गरजेचे असते. यासाठी त्यांनी वयाच्या ५९ वर्षापासूनच शेअर बाजारातील हालचाली, घडामोडी यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त फायदा होतो. असा वर्ग गुंतवणूक मोकळी केल्यानंतर तो पैसा लिक्विड फंडामध्ये टाकला तर बचत खात्यावरील व्याजापेक्षा जास्त परतावा मिळत असतो. त्याचप्रमाणे गुंतवणुकीवरील जोखीम देखील कमी होत असते. वेळ प्रसंगी अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे गरजेचे असते. अनेक वेळा एका योजनेमधून दुस-या योजनेमध्ये गुंतवणूक हस्तांतरित करीत असताना प्राप्तिकराच्या तरतुदीचा अभ्यास करावा लागतो. दुसरा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे हायब्रीड फंड किंवा बॅलन्स फंडामध्ये गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीवरील परतावा अधिक मिळविता येतो. असे क्वचितच गुंतवणूकदाराचे वर्तन असते.

बाकीच्या गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीवरील अधिक परतावा मिळवण्यासाठी जास्त व्यवहारी नसतात हेच खरे आहे. हायब्रीड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना ६० ते ७० टक्के रोखे व ३० ते ४० टक्के इक्विटीमध्ये गुंतवणुकीची विभागणी करावी. ज्यामुळे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूला धक्का कमीत-कमी बसू शकतो. अशा काळामध्ये शेअर बाजाराची घसरण झाल्यास त्याचा परिणाम जास्त असलेली नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू ही कमी होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक मोकळी करण्यासाठी घाई करतात. त्यांना भीती वाटत असते की माझी गुंतवणूक कमी होईल. भावनेच्या लाटेवर स्वार होणारा गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीची आत्महत्या करीत असतो.

गुंतवणूकदाराने एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, भाकरी का करपते? घोडा का अडतो? घरात कचरा का होतो? याला उत्तर म्हणजे काळजी न घेणे होय. याच सूत्राचा वापर करून प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीची काळजी घेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास आर्थिक फटका होणार नाही. गुंतवणूकदाराने एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की एखाद्या म्युच्युअल फंडाचा एनएव्ही हा कमी जरी असेल, तरी त्यांचा गैरसमज असा होतो की, अशा म्युच्युअल फंडाची कामगिरी ही वाईट आहे. कदाचित याचा दुसरा असा अर्थ असू शकतो की, अशा म्युच्युअल फंडाचा लाभांश हा जास्त दिला जातो. आणि गुंतवणुकीमध्ये वाढ देखील जास्त झालेली असते ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. अनेक फंड तुमच्या गुंतवलेल्या (भांडवलात) गुंतवणुकीवर वाढीसह लाभांश देतात परंतु, त्याचे प्रतिबिंब नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूमध्ये दिसत नाही. यासाठी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदाराने याचा अभ्यास करून आपल्या गुंतवणुकीचा निर्णय हा लाभदायी व फलदायी करावा.

ज्यामुळे गुंतवणूकदाराचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी गुंतवणुकीची मदत होते. गुंतवणुकीचा मूळ उद्देश हाच असतो हे लक्षात ठेवावे.अनेक वेळा एखाद्या म्युच्युअल फंडाची कामगिरी खालावली जरी असेल अशावेळी त्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडाची कामगिरी कशी आहे यासाठी तुलनात्मक अभ्यास करावा. मगच जुन्या योजनेमधून नवीन योजनेमध्ये प्रवेश करावा. अशावेळी काही म्युच्युअल फंड एखाद्या योजनेमधून दुस-या योजनेमध्ये गुंतवणूक हस्तांतरित करीत असताना काही खर्च लोडिंग एक्सपेन्सेस गुंतवणूकदारांकडून घेतात. या संदर्भामध्ये देखील माहिती मिळवणे गरजेचे असते. अशा पद्धतीच्या सेवा या काही मोफत असतात. काही सुविधा या मोफत नसतात त्यावरती सेवा शुल्क गुंतवणूकदारांकडून घेतले जाते.

एकंदरीत म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ज्या कारणासाठी आपण करीत असतो किंवा ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करीत असतो ती गुंतवणूक केव्हा मोकळी करायची? त्यापूर्वीच्या काही कालावधीपासून आपण सतर्क राहणे गरजेचे असते. जसे एखादा वाघ शिकार करण्यापूर्वी स्वत:ची पोझिशन घेतो व शिकार करीत असतो. गुंतवणूक करणे म्हणजे शिकार करणे होय. त्यापेक्षा वेगळे काही नसते हे गुंतवणूकदाराने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अनेक वेळा म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरची सुमार झाली असेल तर, गुंतवणूक मोकळी करून ज्या फंड मॅनेजरची कामगिरी चांगली आहे अशा म्युच्युअल फंडाचा शोध घेणे आवश्यक ठरते. गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीची मशागत शेतकरी जसे पिकाची मशागत योग्य पद्धतीने करतो, रोगराई होऊ नये म्हणून औषधांची फवारणी करतो व पीक काढत असतो. तशाच प्रकारचे वर्तन सामान्य गुंतवणूकदाराने करणे गरजेचे असते. फंडात गुंतवणूक करणे जेवढे सोपे त्यापेक्षा जास्त आवघड म्हणजेच त्यातून सुयोग्य कालावधीतच बाहेर पडून झालेला फायदा पदरात पाडून घेणे.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या