23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषराज्यसभेत बाजी कोणाची?

राज्यसभेत बाजी कोणाची?

एकमत ऑनलाईन

‘वरिष्ठांचे सभागृह’ मानल्या जाणा-या राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. यातील ३१ जागा रालोआकडे असून त्यातील २५ जागा सध्या भाजपाकडे आहेत. तथापि यंदा या सर्व जागा राखून आपला गड शाबूत ठेवणे ही एनडीएसाठी कसोटी असणार आहे. दुसरीकडे यूपीएकडे १३ जागा असून यंदा यामध्ये २ ते ४ जागांची वाढ होईल, असा निरीक्षकांचा होरा आहे. या निवडणुकीतील राजकीय समीकरणांचा घेतलेला वेध…

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. यासोबतच खासदारांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणमधील एका जागेवर ३० मे रोजी आणि ओडिशातील राज्यसभेच्या एका जागेसाठी १३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. अशा प्रकारे एकंदरीत येत्या काही दिवसांत १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. या ५९ जागांपैकी २५ जागा सध्या भाजपकडे आहेत. दुसरीकडे, त्यांच्या मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वेळी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) खात्यात ३ जागा होत्या. त्याचप्रमाणे एक अपक्ष खासदार सोडला तर सध्या ५९ पैकी ३१ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे आहेत. या निवडणुकीत ३१ जागा वाचविणे एनडीएसाठी मोठे आव्हान असेल.

कारण विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांचे गणित असे सांगते की, यावेळी एनडीएला ७ ते ९ जागांचे नुकसान सहन करावे लागू शकते. दुसरीकडे, संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची एकूण संख्या १३ वर पोहोचली आहे. यात काँग्रेसचे ८, द्रमुकचे ३, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ खासदार आहेत. यावेळच्या राज्यसभा निवडणुकीत यूपीएला २ ते ४ जागांचा फायदा होताना दिसत आहे. इतर पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास या ५९ जागांपैकी सध्या समाजवादी पक्षाकडे ३, बिजू जनता दलाकडे ४, बहुजन समाज पक्षाकडे २ आणि तेलंगण राष्ट्रसमितीकडे ३ खासदार आहेत. वायएसआर काँग्रेस, अकाली दल आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक खासदार आहे. अशा प्रकारे सध्याचा इतर पक्षांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. यावेळी होणा-या राज्यसभा निवडणुकीत इतर पक्षांना ३ जागांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यनिहाय निवडणुकीतील विजयाच्या शक्यतांवर नजर टाकल्यास यावेळी उत्तर प्रदेशात ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला राज्यसभा निवडणुकीत सहन करावा लागणार आहे. बसपकडे सध्या २ आणि काँग्रेसकडे १ जागा आहे. मात्र या तीनपैकी दोन जागा भाजपकडे जाऊ शकतात. अशा प्रकारे २ जागांच्या फायद्यासह भाजप यावेळी आपले ७ उमेदवार उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवू शकतो. त्याचबरोबर सपाच्या खात्यात पूर्वीप्रमाणे केवळ ३ जागा येण्याची शक्यता आहे. उर्वरित ११ व्या जागेसाठी भाजप आणि सपा यांच्यात चुरस आहे; परंतु भाजपची आक्रमक शैली आणि चांगली रणनीती पाहता ही आठवी जागाही भाजपच्या खात्यात जाऊ शकते, असे म्हणता येईल.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे ६ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यापैकी ३ जागा भाजपकडे आहेत तर महाराष्ट्रात एकत्र सरकार चालविणा-या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १ जागा आहे. आकड्यांच्या आधारावर यावेळी भाजपला महाराष्ट्रात एक जागा गमवावी लागू शकते. भाजपचे २ उमेदवार जिंकू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी परस्पर समन्वयाने निवडणुका लढविल्या तर काही अपक्ष आमदार घेऊन ४ जागा जिंकून एका जागेचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो. तामिळनाडूत राज्यसभेच्या ६ जागांपैकी ज्यांच्यासाठी निवडणुका होणार आहेत, त्यातील ३-३ जागांवर सध्या द्रमुक आणि अण्णा द्रमुकचा कब्जा आहे. मात्र यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्ष द्रमुकला एक अधिकची जागा मिळू शकते. विधानसभेतील सदस्यसंख्येच्या आधारे द्रमुकचे ४ खासदार राज्यसभेत जाऊ शकतात तर अण्णा द्रमुकला दोनच जागा जिंकता येऊ शकतील.

संख्याबळाच्या आधारे बिहारमध्येही एनडीएला एक जागा गमवावी लागणार आहे. भाजप आपले दोन उमेदवार पूर्वीप्रमाणेच आरामात राज्यसभेवर पाठवू शकतो. परंतु भाजपचा मित्रपक्ष असणारा जेडीयू यावेळी एकच जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एका जागेचा फायदा आरजेडीला मिळून त्यांचा आकडा दोनवर जाऊ शकतो. भाजपला यावेळी सर्वाधिक नुकसान आंध्र प्रदेशात होणार आहे. या राज्यात ४ जागांवर निवडणुका होणार असून, त्यातील ३ सध्या भाजपच्या खात्यात असून, विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर यावेळी वायएसआर काँग्रेसचे उमेदवार या चारही जागांवर विजय मिळवू शकतात. तेलंगणमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होत असून, या दोन्ही जागा सध्या राज्यातील सत्ताधारी टीआरएसच्या ताब्यात आहेत आणि संख्याबळाच्या आधारेही दोन्ही जागांवर टीआरएसचा विजय निश्चित आहे. या दोन जागांशिवाय तेलंगणमधून राज्यसभेच्या तिस-या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार डॉ. बंडा प्रकाश यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ३० मे रोजी पोटनिवडणूक होईल. विधान परिषदेवर नामनिर्देशित झाल्यानंतर डॉ. बंडा प्रकाश यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ही जागा यापूर्वीही टीआरएसच्या खात्यात होती आणि यावेळीही टीआरएसचा विजय निश्चित आहे.

कर्नाटक विधानसभेतील सदस्यसंख्येच्या आधारे भाजप मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही आपले दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतो तर काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडणूक जिंकू शकतो. चौथ्या जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यापैकी कुणाकडेच पुरेसे आमदार नाहीत. त्यामुळे ही जागा कुणाकडे जाणार यासाठी शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. राजस्थानमध्ये ४ जागांसाठी लढत आहे. सध्या या चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत; मात्र गेहलोत यांची तयारी पाहता भाजपला ३ जागांचे नुकसान सहन करावे लागू शकते. आमदारांच्या संख्येच्या आधारे भाजपचे १ आणि काँग्रेसचे २ खासदार राज्यसभेत जाऊ शकतात; मात्र अपक्ष आमदारांच्या बळावर काँग्रेस राजस्थानातील तिसरी जागाही जिंकू शकते. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस दोघेही ना नफा ना तोटा या स्थितीत आहेत. म्हणजेच मागील वेळेप्रमाणे भाजप २ आणि काँग्रेस १ जागा जिंकू शकते. ओडिशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान होत असून, त्या सध्या बिजू जनता दलाकडे आहेत आणि संख्याबळ पाहता या तीनही जागा बीजेडीला मिळणार आहेत. बीजेडी खासदार सुभाषचंद्र सिंह यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरही बीजेडीचा विजय निश्चित आहे. छत्तीसगडमधून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या १-१ खासदाराचा कार्यकाळ समाप्त होत आहे. मात्र संख्याबळाच्या आधारावर दोन्ही जागा काँग्रेसच्या खात्यात जाणार हे निश्चित आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या १-१ खासदाराचा कार्यकाळ संपणार आहे. परंतु या दोन्ही जागा प्रचंड बहुमताच्या जोरावर आम आदमी पक्षाच्या वाट्याला जाणार आहेत.

– विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या