32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषही शबाना कोण आहे?

ही शबाना कोण आहे?

एकमत ऑनलाईन

दहा महिन्यांपूर्वीची घटना असेल. साधारण मे २०२० मधील. मार्च महिन्यापासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची साथ जोरदार सुरू झाली. लॉकडाऊन झाले, सर्व व्यवहार ठप्प झाले. प्रशासकीय कार्यालये, आस्थापना, अनेक उद्योग, चित्रपटगृहे, उपाहारगृहे सर्व काही ठप्प झाले. कडक उन्हातले मुंबईतले रस्ते एरवी घामाने निथळायचे. कोरोनाने सगळेच विषय बदलून टाकले. मग आपले गाव गाठण्यासाठी मुंबईतल्या सर्वसामान्यांची धडपड सुरू झाली. काही रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. या रेल्वेगाड्यांनी जाणा-यांची संख्या लाखात होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून सुटणा-या गाड्यांना आरक्षणाची व्यवस्था नव्हती.

‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ या म्हणीनुसार घुसखोर कंपनीलाच जागा मिळत होती. पण या सगळ्या व्यवस्थेचा ताण पोलिस व्यवस्थेवर कमालीचा पडलेला होता. माझ्या कार्यालयात येताना मला भगतसिंग रोडवरूनच यावे लागते. रेल्वे स्थानकाच्या याच रस्त्याकडील प्रवेशद्वारातून या सर्व प्रवाशांना नियंत्रित करून गाडीकडे पोहोचविण्याचे काम पोलिस व्यवस्थेकडे होते. कार्यालयात येत असताना दोन-तीन दिवस ही प्रचंड गर्दी पाहात होतो. एक दिवस गाडीतून खाली उतरलो. त्या गर्दीत शिरलो, चौकशी केली, बिहारकडे निघालेली गाडी होती आणि या सर्व गर्दी केलेल्या प्रवाशांना अत्यंत संयमित शब्दांत, मार्गी लावण्याचे काम काही पोलिसांसह एक महिला करत होती. तिला भेटण्याचा प्रयत्न केला. नाव विचारले पण ती कामात एवढी दंग होती की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला तिला वेळ नव्हता. तिने स्पष्ट सांगून टाकले, आमच्या सीनिअरच्या सूचनेप्रमाणे काम चालू आहे, नाव सांगायलाही वेळ नाही. तिच्या खाकी पोषाखावर काळी पट्टी होती, त्यावर नाव होते…. शबाना शेख.

ते काम पाहिले. एक महिला पोलिस अधिकारी तळपत्या उन्हात अतिशय शिस्तबध्दपणे गावाकडे निघालेल्या श्रमिक नागरिकांना मार्गस्थ करत होती. प्रसिध्दीसाठी तिला बोलायलाही वेळ नव्हता. तो विषय काही दिवस डोक्यात होता. नंतर कोरोनाचे विषय सुरू झाले. त्या विशेष गाड्यांची माहिती मिळत होती, तो विषय मागे पडला… चार दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रमुख दैनिकांमध्ये एक फोटो पाहिला त्यामध्ये दहा महिन्यांपूर्वीचे ते नाव एकदम ठळकपणे दिसले. १०-१२ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडलेली ही पोलिस अधिकारी महिला तिच्या सहका-यांसह आणि पकडलेल्या मुद्देमालासह फोटोत दिसली. पत्रकारितेच्या ६० वर्षांच्या आयुष्यात श्रीमती मीरा बोरवणकर, किरण बेदी अशा भगिनींनी पोलिस प्रमुख पदावर काम करून त्यांच्या कामाची छाप उमटवली होती. ब-याच वर्षांनंतर एक ज्येष्ठ पोलिस निरीक्षक डोंगरीसारख्या एका अर्थाने बदनाम पोलिस स्टेशनवर ज्येष्ठ निरीक्षक म्हणून दाखल झाली.

उमरी नगरपालिकेतील प्रभारी राजमुळे घरकुल लाभार्थ्यांचे झाले बेहाल

पहिल्या दीड महिन्यानच तिने आपल्या कामाच्या तडाख्यातून एक मोठं रॅकेट मुद्देमालासह पकडलं. मुंबईच्या दक्षिण विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सत्यनारायण, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ शशिकुमार मीना, सहायक पोलिस आयुक्त अविनाश शिंगटे या सर्व अधिका-यांचे अचूक मार्गदर्शन होतेच, सापळा लावलाच होता. पण एक महिला पोलिस अधिकारी हिमतीने या पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर तिच्या कर्तबगारीचा ठसा उमटवते. याची चर्चा मुंबईत होत होती. दहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ ज्या महिला पोलिस अधिका-याने आपली ओळख सांगितली नव्हती त्याच महिलेच्या कर्तबगारीची ओळख तिच्या कामातून समोर आली, तीच ती शबाना शेख होती. एवढेच नव्हे तर अमली पदार्थ पुरविणारा अब्दुल वसिम अब्दुल अजुब शेख, दीपक संजीवा बघेरा या आरोपींना कलिनाच्या राहत्या घरातून पकडून याच भगिनीने आज त्यांना जेलची हवा दाखवली आहे.

उत्सुकतेने मग तिची माहिती घेतली, ओळख करून घेतली आणि ही शबाना मराठीची प्राध्यापक असावी एवढ्या शुध्द मराठीत बोलणारी पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुकन्या निघाली. तिचे सासर कर्नाटकातले. तिचे पती इरशाद शेख हे डच बँकेत मोठ्या अधिकारावर आहेत. संपूर्ण कुटुंबाची ओळख झाली. तिच्या दोन मुली उच्च विद्याविभूषित आहेत. संपूर्ण कुटुंब घरात मराठी बोलतात, बाहेर मराठी बोलतात, मग या कुटुंबाला ठाण्याला मुद्दाम घरी आणलं, त्यावेळी माझी पत्नी मंंगला होती आणि तिने अतिशय प्रेमाने शबाना आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. एवढेच नव्हे तर माझी दिवंगत मोठी कन्या मनीषा आपल्या घरात पुन्हा आली अशी भावना मंगलाने व्यक्त केली आणि माझ्या धाकट्या कन्येला- डॉ. मृदुलाला जणू ताई मिळाली.

पोलिस खात्यात अनेक अधिकारी प्रभावीपणे काम करतात पण शबानाचं वैशिष्ट्य असं की, ती पोलिस अधिकारी असतानाही महाराष्ट्राच्या मराठी जीवनात अशी काही समरस होऊन मिसळून गेली आहे की तिच्या वागण्या-बोलण्यातला सहज साधेपणा आणि आपलेपणा विलक्षण भावणारा. माझ्या कन्येनं (डॉ. मृदुला) माझ्या वाढदिवसाच्या तारखेचा पत्ता तिला दिला आणि अनपेक्षितपणे इरशाद शेख आणि श्रीमती शबाना माझ्या घरी पोहोचले. त्यांनी काय भेट आणावी? एक भलं मोठं पार्सल तिनं हातात दिलं. ‘ताबडतोब फोडा बाबा’ असा हट्ट धरला. तिच्या आग्रहाखातर पार्सल फोडलं. काय असावं पार्सलमध्ये?…

विश्वास पाटील यांची प्रख्यात कादंबरी ‘पानिपत’, भाऊसाहेब खांडेकर यांची ‘ययाति’, शिवाजी सावंत यांचा ‘छावा’ आणि ‘मृत्युंजय’.. चार कादंब-या समोर ठेवल्या. बघतच राहिलो. पोलिस खात्यातल्या अधिका-याने आणि त्यातही शबानासारख्या भगिनीने मराठीतल्या कोणाच्याही हातात अभिमानाने असाव्या अशा चार कादंब-या नेमक्या मला भेट दिल्या.. शबाना पोलिस अधिकारी आहे. त्या जागेवर कर्तबगारीने काम करीत आहे. डोंगरीसारखे नाठाळ पोलिस स्टेशन सांभाळणे सोपे काम नाही. पण तिथेही यशस्वीपणे, खंबीरपणे वरिष्ठ अधिका-यांच्या पाठिंब्यावर काम करत असताना मराठीवर, मराठी साहित्यावर आणि त्यातही पराक्रमी ऐतिहासिक कांदब-यांवर तिचे एवढे प्रेम असेल याची प्रचीती त्यादिवशी आली. त्या दिवसापासून शबाना आमच्या घरातलीच झाली.

मधुकर भावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या