28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषदसरा मेळाव्यात आवाज कोणाचा?

दसरा मेळाव्यात आवाज कोणाचा?

एकमत ऑनलाईन

राजकीय उलथापालथीनंतर सत्तारूढ झालेले शिंदे-फडणवीस सरकार स्थिरावले असले तरी सत्तासंघर्ष अजून संपलेला नाही. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगातील लढाई अजूनही संपलेली नाही. राज्यातही वेगवेगळ्या विषयांवरून संघर्ष धुमसतो आहे. सध्या दसरा मेळाव्यावरून वादंग सुरू झाले आहे. दोन तृतीयांश आमदार-खासदारांचे पाठबळ मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. आपला गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा करत पक्षाच्या चिन्हावरही दावा सांगितला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय प्रलंबित असताना दस-याला होणा-या परंपरागत मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. काल-परवापर्यंत महापालिकेवर शिवसेनेचा एकछत्री अंमल होता. पण लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने आता प्रशासकाच्या हातात महापालिकेचा कारभार असून त्यावर राज्यशासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कोणाला शिवाजी पार्क मैदान उपलब्ध होणार, दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज घुमणार याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे.

पक्ष फुटल्याने हतबल झालेल्या उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याला मैदान नाकारण्याचे धाडस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवणार का ? तसे केल्यास उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती मिळेल का ? शिंदे यांच्या मेळाव्याला राज ठाकरे यांना निमंत्रित केले जाईल का ? आगामी महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेच्या युतीत मनसे सहभागी असेल का ? १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्षे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधत होते. बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर हजारो शिवसैनिकांची गर्दी होत असे. सभेआधी शस्त्रपूजन करून नेत्यांची व सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण होत असे. काही तुरळक अपवाद वगळता गेल्या ५५ वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. एक नेता, तेच मैदान व तोच दिवस अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची रेकॉर्ड बुकातही नोंद नोंद झाली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा पुढे नेली. पण कोविडच्या संकटामुळे गेली दोन वर्षे शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. यंदाचा मेळावा उद्धव ठाकरे होणार की नाही याबद्दल संभ्रम आहे. परवानगी मिळो अथवा नाही, शिवसेनेचा दसरा मेळावा होणार व शिवतीर्थावरच होणार, असा ठाम पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून संघर्ष होणार अशी चिन्हं दिसत आहेत. शिवसेनेतील ही यादवी पाहून अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील हे नक्की.

कोंडीचे अस्त्र बुमरंँग होण्याची भीती !
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कालपर्यंत भक्कम वाटणारा शिवसेनेचा किल्ला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आहे. दोन तृतीयांश आमदारांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्रीपद व राज्यातील सत्ता तर गेलीच, पण पक्षाची धुराही हातातून जाण्याची भीती उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबाबत सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख पडते आहे. निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या लढाईत पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागणार की काय? अशी स्थिती आहे. त्यातच दसरा मेळाव्याला खोडा घालून शिंदे गटाने आणखी एक कुरघोडी केली आहे. शिवसेनेच्या आजच्या या अवस्थेला उद्धव ठाकरे हेच मुख्यत: कारणीभूत असले तरी त्यांची आणखी कोंडी करण्याचे प्रयत्न त्यांना सहानुभूती मिळवून देतील, असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करतायत. शिवसेनेचे आमदार-खासदार फुटले असले तरी परंपरागत मतदार व तळागाळातील शिवसैनिक त्या तुलनेत अजून विखुरलेला नाही. शिंदे व अन्य आमदारांच्या बंडानंतर सुन्न झालेला पक्षाच्या कार्यकर्ता आता सावरला आहे. शिंदे यांच्या बंडाबद्दल सामान्य शिवसैनिकांमध्ये रोष नसला तरी ‘मातोश्री’पासून शिवसेना वेगळी करण्याला मात्र विरोध होताना दिसतोय. शिवसेना व ठाकरे हे समीकरण तोडणे सोपे नाही. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह काढून घेण्याचा, दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न अंगाशी येतील, बुमरँग होतील, अशी भीती त्याच्याच गटातील लोक व्यक्त करत आहेत.

राज ठाकरे यांना निमंत्रित करणार ?
शिवसेना, ठाकरे व दसरा मेळावा हे अभेद्य असे समीकरण आहे व उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी हे समीकरण बदलले तर ते मुंबईतील मराठी माणसाला आवडणार नाही, त्याची उलटी प्रतिक्रिया येईल, याची जाणीव शिंदे गटालाही आहे. त्यामुळे दसरा मेळावा हायजॅक करतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या मेळाव्याला निमंत्रित करण्याची शिंदे गटाची योजना असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा नेत्यांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परवा राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. पाठोपाठ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून शिवाजीपार्क येथेच दसरा मेळावा घेण्याचे आवाहन केले.

‘वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना या चार प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त बाळगणारा प्रत्येक मराठी माणूस सध्या गोंधळलेला आहे. त्यांच्या मनातला हा गोंधळ करण्याची क्षमता फक्त आपल्यात असल्याने आपण दस-याला शिवतीर्थावर मार्गदर्शन करावे,असे आवाहन संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात केले आहे. तर स्व. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा ंिहदुत्वाचा पुरस्कार करणा-या नेत्यांना दसरा मेळाव्यात निमंत्रित केल्याचे सांगताना यावेळच्या मेळाव्यात राज ठाकरे यांना निमंत्रित केले जाऊ शकते असे सूचक वक्तव्य शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी केले. यामुळे दसरा मेळावा हायजॅक करायचा, पण राज ठाकरे यांना निमंत्रित करून ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरणही अबाधित ठेवण्याची चतुर खेळी शिंदे गटाकडून केली जाणार का ? की शिवसेनेतील बंडाळीमुळे अस्वस्थ असलेल्या शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी राज ठाकरे अधिक सक्रिय होणार ? त्यासाठी वेगळा दसरा मेळावा घेणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अभय देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या