व्यावसायिक, उद्योजकांशी लग्न करणा-या बॉलिवूड अभिनेत्रींची संख्या कमी नाही. अभिनेत्रींनी कोट्यधीशांशी लग्न करणे लोकांसाठीही नवे नाही. परंतु तरीही सुष्मिताने अद्याप ललित मोदी यांच्याशी लग्न केले नसले, तरी तीच ट्रोल का झाली? असा प्रश्न काहीजणांना पडला आहे. परंतु त्याचे उत्तर सोपे आहे. ललित मंोदी श्रीमंत, कोट्यधीश आहेत हे खरे; परंतु ते फरार घोषित केले असून, त्यांच्यावर मनी लाँड्रिंगसारखा गंभीर आर्थिक गुन्हा दाखल आहे.
सुष्मिता सेन आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी जितकी चर्चेत असते तितकीच ती कायम चर्चेत राहते आपल्या आयुष्याबद्दल! सुष्मिता सेनचे आयुष्य हे अनेक घडामोडींनी भरलेले आहे. तिने अगदी कमी वयातच एका मुलीला दत्तक घेतले आणि तिला यशस्वी आई होऊन सांभाळूनसुद्धा दाखवले. दुसरीकडे तिच्या रिलेशनशिपविषयीही अनेकदा चर्चा होत राहिल्या. तसे पाहता तिच्या आयुष्यात आजवर जे काही घडलं ती एक ब्रेकिंग न्यूज बनत गेली. पण सुष्मिताने कधीच त्याचे टेन्शन घेतले नाही. ना तिने कधी लोक काय म्हणतील याचा विचार केला. ती आपल्या तत्त्वांनुसार आपले आयुष्य जगत राहिली. तथापि, सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी सध्या एकमेकांना डेट करत आहेत.
काही दिवसांपूर्वी जेव्हा ललित मोदी यांनी या गोष्टीचा खुलासा केला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यांनी सुष्मिता ही आपली ‘बेटरहाफ’ असल्याचे म्हटले होते. अर्थात काही वेळानंतर केलेल्या दुस-या ट्विटमध्ये आपण उभयतांनी अद्याप लग्न केलेले नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. आपण केवळ डेट करतो आहोत, असे त्यांनी म्हटले होते. या त्यांच्या ट्विटनंतर दोघेही खूप ट्रोल झाले आणि आजही होत आहेत. ट्रोलर्सची सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’म्हणेपर्यंत मजल गेली. ललित मोदी एक मोठे उद्योगपती आहेत तर सुष्मिता ही एक चांगली अभिनेत्री आहे. मात्र, बारा वर्षांपूर्वी ललित मोदी देश सोडून पळाले होते आणि त्यांना फरारी घोषित करण्यात आले होते. ललित मोदी यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ते सध्या चैनीचे जीवन जगत आहेत.
ललित मोदी हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आले होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण त्यांच्या कुटुंबाचे मोठे व्यावसायिक साम्राज्य आहे. दारू, सिगारेट, पान मसाल्याचे प्रसिद्ध ब्रँड्स आणि रिटेल स्टोअर्स, रेस्टॉरंट चेन तसेच ट्रॅव्हल कंपन्यांचाही समावेश आहे. लंडनमधील त्यांचे घर म्हणजे आलिशान महालच आहे. हा बंगला ७००० चौरस फूट जागेत पसरला असून, त्यात ८ बेडरूम आहेत. या बंगल्यासाठी ललित मोदी महिना २० लाख रुपये भाडे भरतात. त्यांच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास व्यवसायांमधून ते अब्जावधींची कमाई करतात. भारताव्यतिरिक्त पश्चिम आफ्रिका, आग्नेय आफ्रिका, युरोप, आग्नेय आशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यांची एकंदर संपत्ती (नेटवर्थ) सुमारे १२ हजार कोटी असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी ४५०० कोटींची संपत्ती ललित मोदी यांची आहे.
सुष्मिता सेनच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता सेन दरवर्षी सुमारे ९ कोटी रुपये आणि दरमहा ६० लाख रुपये कमावते. तिच्याजवळ सुमारे १०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या मुलींसोबत ती वर्सोवा येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तिच्या या फ्लॅटमध्ये हरप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिताकडे बीएमडब्ल्यू ७ सिरीज ७३० एलडी असून, या मोटारीची किंमत सुमारे १.४२ कोटी रुपये इतकी आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स ६ सुद्धा आहे आणि तिची किंमत १ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त सुमारे ८९.९० लाख रुपये किमतीची ऑडी क्यू-७ सुद्धा आहे. चित्रपट हाच सुष्मिताच्या कमाईचा स्रोत आहे. एका चित्रपटात भूमिका करण्यासाठी ती सुमारे ३ ते ४ कोटी रुपये घेते. सुष्मिता ही देशाची पहिली मिस युनिव्हर्स असून, ललित मोदी हे क्रिकेटचा उत्सव मानल्या जाणा-या आयपीएलचे जनक आहेत. या दोघांच्या एकत्रित छायाचित्रांनी अनेकांना हैराण केले होते. ललित मोदी यांनी आपण सुष्मिताबरोबर डेट करीत असल्याचे खुलेपणाने सांगितले असले तरी सुष्मिताकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
सुष्मिताने काहीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी ती केवळ पैशांवर प्रेम करते, अशी वक्तव्ये आता सर्वत्र सर्रास ऐकू येत आहेत. ट्रोलर्सनाच नव्हे तर सुष्मिताच्या चाहत्यांनासुद्धा ही गोष्ट पसंत पडलेली नाही. तसे पाहायला गेल्यास अभिनेत्री आणि उद्योजक यांनी एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी श्रीमंत उद्योगपतींवर प्रेम केले आणि त्यांच्याशी लग्नही केले. अशा बहुचर्चित अभिनेत्रींपैकी जुही चावला हिने मेहता ग्रुपचे मालक जय मेहता यांच्याशी डिसेंबर १९९५ मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना डेट केले आणि समजून घेतले. जय मेहतांचे हे दुसरे लग्न असून, ते सुमारे २५४ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमधून भूमिका करणारी अभिनेत्री असिन सध्या रुपेरी पडद्यापासून दूर जाऊन सुखाचा संसार करीत आहे. आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टार मंडळींबरोबर काम करणा-या असिनने मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर राहुल शर्मा यांच्याशी १९ जानेवारी २०१६ रोजी लग्न केले. लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना डेट केले होते. राहुल यांच्याकडे १४६० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे माध्यमांकडून सांगितले जाते. राणी मुखर्जीचे प्रेमसंबंध यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांच्याशी जुळून आले आणि दोघांनी २१ एप्रिल २०१४ रोजी इटलीमध्ये जाऊन गुपचूप लग्नही केले. त्यांनीही लग्नापूर्वी एकमेकांना डेट केले होते. आदित्य यांच्याकडे ६५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
मलाइका अरोराची बहीण अभिनेत्री अमृता अरोरानेही उद्योजक शकील लडक यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही भिन्नधर्मीय असल्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चाही झाली होती. चर्चेचे दुसरे कारण होते दोघांच्या वयांमधील अंतर. शकील यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्याकडे सुमारे ८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अक्षयने ट्विंकल खन्नाची निवड जीवनसाथी म्हणून केली. त्यानंतर शिल्पाला राज कुंद्रा या उद्योगपतीची साथ मिळाली. त्याने शिल्पाच्या ब्रँड प्रमोशनसाठी खूप मदत केली. याच दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २२ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांनी लग्न केले. राज कुंद्रा यांच्याकडे ४००० कोटींची मालमत्ता आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र आणि हॉटेल व्यावसायिक फरहान आझमी यांच्याशी आयशा टाकियाचे लग्न मार्च २००९ मध्ये झाले. मुंबई आणि गोव्यात अनेक रेस्टॉरंट चालविणा-या फरहान यांच्याकडे ७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. व्यावसायिक, उद्योजकांशी लग्न करणा-या बॉलिवूड अभिनेत्रींची संख्या कमी नाही. अभिनेत्रींनी कोट्यधीशांशी लग्न करणे लोकांसाठीही नवे नाही. परंतु तरीही सुष्मिताने अद्याप ललित मोदी यांच्याशी लग्न केले नसले, तरी तीच ट्रोल का झाली? असा प्रश्न काहीजणांना पडला आहे.
-सोनम परब