22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषविवाह नकोसा का वाटतोय?

विवाह नकोसा का वाटतोय?

एकमत ऑनलाईन

राष्ट्रीय सांख्यिकीच्या एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत अविवाहित राहण्याची इच्छा बाळगून असलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. ही बाब समाजासाठी चिंतेची आहे. पाश्चिमात्त्य संस्कृतीचा प्रभाव, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य, शरीरसुखाबाबतचा मोकळेपणा, जबाबदारीचे ओझे नको असणे अशी अनेक कारणे यामागे आहेत. तथापि, अविवाहितपणा हा भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्न म्हणून निर्माण होऊ शकतो. जसजसे वय वाढत जाते, तसतसा एकाकीपणा वाढत जातो. मन जेव्हा थकते, शरीर साथ देत नाही, कोणाचाही आधार नसतो, मेंदू काम करत नसतो तेव्हा अविवाहितपणाचे परिणाम सहन करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय हाती राहत नाही.

काही तरुण किंवा तरुणींना विवाह करण्याची इच्छा नसते. पण कालांतराने त्याचे परिणाम जाणवू लागतात. साधारणत: जसजसे वय होऊ लागते तसतसा एकाकीपणा अधिक जाणवू लागतो. शरीर, मन थकते, मेंदू जेव्हा सक्रिय राहत नाही, तेव्हा अशा मंडळींजवळ आपले म्हणणारे कोणीही नसते. राष्ट्रीय सांख्यिकीच्या एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत अविवाहित राहण्याची इच्छा बाळगून असलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार १५ ते २९ वयोगटातील अविवाहित युवकांचे प्रमाण २०१९ मध्ये वाढत २३ टक्के झाले. २०११ मध्ये हेच प्रमाण १७.२ टक्के होते. अविवाहित युवकांची संख्या आणखी वेगाने वाढणार असून ही बाब समाजासाठी खेदाची आहे. समाज हा एखाद्या निर्जिव घटकाचे नाव नाही.

समाज हा लोकांच्या समुदायांपासून तयार होतो. व्यक्तिगत निर्णयाचे प्रतिबिंब समाजात उमटते तेव्हा ते निर्णय केवळ समाजावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत नाहीत तर समाजाची दिशा देखील बदलण्याचे काम करतात. अविवाहित मुलांचे प्रमाण का वाढत आहे, असे का घडत आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे पहिले कारण म्हणजे तरुण पिढीने तब्बल दोन दशकांपासून पाश्चिमात्त्य संस्कृतीलाच आपलेसे केले आहे. ‘प्यू रिसर्च’च्या एका अभ्यासानुसार अमेरिकेत पाच वर्षांत घटस्फोटांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. निम्याहून अधिक अमेरिकी नागरिक हे विवाह संस्काराला महत्त्वाचे मानतात, परंतु संपूर्ण जीवन एकाच व्यक्तीबरोबर व्यतित करणे गरजेचे वाटत नाही. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने भारतात होत आहे. कारण भारतातही घटस्फोट वाढले आहेत. अशा स्थितीत तरुणांत अनामिक भीती निर्माण झाली आहे. लग्नाचा शेवट हा घटस्फोटातच होणार असेल तर लग्न कशाला करायचे, असा विचार ते करत आहेत. दुसरे म्हणजे आजच्या युवकांवरील संस्कारात होणारे बदल. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीत कळत- नकळतपणे बदल होत आहेत. यात तरुण पिढीचा कोणताही दोष नाही. पूर्वी कौटुंबिक व्यवस्था ही संयुक्त होती. कालांतराने ही व्यवस्था पालक केंद्रित झाली आणि आता तर पाल्य केंद्रित झाली आहे. त्याचा उद्देश हा प्रत्येकवेळी मुलांना महत्त्व देणे आणि त्याच्या आशा व आकांक्षा पूर्ण करणे हा राहिला. पाल्यांची इच्छा पूर्ण करताना ‘नाही’ हा शब्दच त्यांच्या शब्दकोषात राहिला नाही. साहजिकच सामंजस्य, सेवाभाव, त्याग या शब्दांना तिलांजली दिली गेली आणि त्याचे जीवन हे केवळ पालककेंद्रितच राहिले.

जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्त्वात तीन शब्दांचा समावेश नसेल तर तो कोणत्याही स्थितीत कुटुंबाची निर्मिती करू शकत नाही. यानुसार कुटुंब पुढे नेण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात- समजूतदारपणा, सेवाभाव आणि त्याग. तरुण पिढीत घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यामागे या तीन गोष्टींचा अभाव हे प्रमुख कारण आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे दोन-तीन दशकांपूर्वी मुलींचे ध्येय हे विशिष्ट वयात विवाह करणे हे असायचे. कारण विवाहामुळे जीवनात स्थिरता आणि आर्थिक सुबत्ता येते, असे म्हटले जात होते. पण आता कुटुंब, समाजाचा विचार बदलला आणि मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले, ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे. परंतु परिणामस्वरूप मुली विवाहाकडे एक पर्याय म्हणून पाहत आहेत. जीवनाचे ध्येय म्हणून त्याकडे पाहत नाहीत. मुली आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. अमेरिकेच्या ‘फर्टिलिटी अँड फॅमिली ब्रँच’च्या २०१८ च्या एका अहवालात म्हटले आहे की, ही मानसिक स्थिती जगात सर्वत्रच पहावयास मिळत आहे. हे केवळ भारतातच दिसते असे नाही. आता आर्थिक सक्षमतेला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. युवकांसाठी विवाह हा दुसरा पर्याय आहे. अनेकदा तर भौतिक साधनांची जमवाजमव करता करता वय निघून जाते आणि नंतर युवकांच्या नजरेतून विवाहाची इच्छा ही नाहिशी होते. आजची पिढी अविवाहित राहण्यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सोशल मीडिया. पूर्वी कुटुंबात सुख-दु:खाची देवाणघेवाण व्हायची. कुटुंबात एकमेकांना वेळ दिला जायचा. कुटुंबावरच त्याचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असायचे. परंतु आज सोशल मीडियाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती हा एकटा असूनही त्याला त्याची जाणीव या सोशल मीडियामुळे होत नाही. आर्थिक सुरक्षा आणि महागाई, हे एक कारण सांगितले जाते.

२०२० मध्ये अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार, असंख्य तरुणांना वाटते की, लग्न आवश्यक आहे, परंतु त्यापेक्षा अधिक महत्त्व आहे ते आर्थिक सुरक्षेला. काळाच्या ओघात तडजोडीची भूमिका कालबा झाली. त्यामुळे तरुण पिढी कोणताही शब्द देताना विचार करत आहे. ते कोणत्याही प्रकारे भावनिक जबाबदारी पार पाडण्यास तयार नाहीत किंवा त्यापासून चार हात लांब राहत आहेत. त्यांच्या मते विवाहसंस्था म्हणजे एक प्रकारचा गोंधळच आहे. पूर्वी विवाह करण्यामागे शारीरिक सुख मिळवणे हाही एक निसर्गत: स्वाभाविक असणारा विचार होता. परंतु आता शारीरिक संबंधावरून तरुणपिढी मुक्तपणे विचार करू लागली आहे. विवाह न करताही या सर्व गोष्टी मिळू लागल्याने लग्नगाठ बांधायची कशाला, हा विचार होऊ लागला. आणखी एक गोष्ट म्हणजे विवाह न करण्यामागे विवाह संस्थेकडून होणारा अपेक्षाभंग. बहुतांश कुटुबांत सामंजस्याच्या अभावामुळे विवाह संस्था मोडकळीस येत आहे. या विचाराचा परिणाम समाजावर नकारात्मक होत आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ दुर्खीम यांनी आपले पुस्तक ‘सुसाईड’ मध्ये म्हटले आहे की, विवाहित पुरुषांच्या तुलनेत अविवाहित तरुण अधिक आत्महत्या करतात. कारण विवाह हा भावनात्मक सुरक्षा देतो, एकटेपणा दूर करतो. विवाह न केल्याचा परिणाम तात्काळ जाणवत नाही. पण तीन दशकांनंतर त्याचे परिणाम दिसू लागतात. अविवाहितपणा हा भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्न म्हणून निर्माण होऊ शकतो. जसजसे वय वाढत जाते, तसतसा एकाकीपणा वाढत जातो. मन जेव्हा थकते, शरीर साथ देत नाही, कोणाचाही आधार नसतो, मेंदू काम करत नसतो तेव्हा अविवाहितपणाचे परिणाम सहन करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय हाती रहात नाही.

-डॉ. ऋतू सारस्वत,
समाजशास्त्राच्या अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या