34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home विशेष लस का घ्यायची?

लस का घ्यायची?

ज्या रुग्णांना यापूर्वी कोरोना झाला होता आणि ते त्यातून बरे झाले आहेत, त्यांची कोरोनापासून बचाव करण्यासाठीची प्रतिकारशक्ती सहा महिन्यांत संपुष्टात येते. जरी शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज् असतील तरीही लस बूस्टर डोससारखे काम करते. त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनीही लस घेणे हितकारक आहे.

एकमत ऑनलाईन

अमेरिका आणि लंडनमध्ये कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ आढळून आल्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. दरम्यान, भारतात कोरोनाच्या लसीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी असलेल्या या लसींविषयी वेगवेगळ्या धारणा समोर आल्या आहेत. लोकांच्या मनात वेगवेगळे सवाल आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न असा की, ज्या लोकांना यापूर्वी कोरोना झाला होता आणि ते आता खडखडीत बरे झाले आहेत, त्यांनीही लस घेणे आवश्यक आहे का? अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या मते, ज्या लोकांमध्ये कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे, त्यांनीही लस टोचून घेतली पाहिजे. प्राथमिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कोरोनाची लस कोविड-१९ पासून सुरक्षितता प्रदान करण्यास सक्षम आहे.

ज्या रुग्णांना यापूर्वी कोरोना झाला होता आणि ते त्यातून बरे झाले आहेत, त्यांची कोरोनापासून बचाव करण्यासाठीची प्रतिकारशक्ती सहा महिन्यांत संपुष्टात येते. म्हणजेच, ज्या व्यक्तीला जूनमध्ये कोरोना झाला होता, तिच्या शरीरातील अँटीबॉडीज् डिसेंबरमध्ये संपुष्टात आल्या. याचा स्पष्ट अर्थ असा की, या व्यक्तीला आता पुन्हा कोरोना होऊ शकतो. लसीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी त्या व्यक्तीला मदत होईल. एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला असेल, तर शरीरात अँटीबॉडीज् तयार झाल्याने लस त्याची रोगप्रतिकार क्षमता म्हणजे अँटीबॉडी टाइटर वाढविण्यासाठी बूस्टर डोसप्रमाणे काम करू शकेल. कोरोना संसर्गाच्या कारणामुळे तयार होत असलेल्या अँटीबॉडीज् कमी संख्येने तयार होत आहेत आणि त्यामुळे सहा महिन्यांत त्या संपुष्टात येऊ शकतात. परंतु लसीमुळे या व्यक्तींना आजारापासून किमान वर्षभर संरक्षण मिळू शकते.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचविण्याची योजना तयार केली आहे. संसर्गाच्या नंतर अनेक रुग्णांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज् तयार होऊ शकत नाहीत. ज्या रुग्णांमध्ये त्या तयार झाल्या आहेत, त्याही सहा महिन्यांत संपुष्टात येऊ शकतील. जरी शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज् असतील तरीही लस बूस्टर डोससारखे काम करते. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांच्या शरीरात पुरेशा अँटीबॉडीज् असतील तर लस घेण्याची फारशी गरज भासणार नाही; पण त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. कोविड-१९ च्या प्रसाराची साखळी तोडणे हा लसीचा हेतू आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराचा अर्थ असा की, सामान्यत: लसींच्या चाचण्या दोन वर्षे चालतात. परंतु आता दोन महिन्यांच्या चाचण्या झाल्यावरच लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहे. पुढील काही दिवस लस घेणा-या व्यक्तींवर होणा-या परिणामांवर नजर ठेवली जाईल.

मनपाचे 92 कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत; कर्मचा-यांत आनंदोत्सव

लसीची गरज प्रत्येक नागरिकाला भासणार आहे. शरीरात नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेल्या अँटीबॉडीज् वाढविण्यासाठी लस मदत करेल. त्यामुळे संसर्गापासून लढण्यासाठी शरीर अधिक सक्षम होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लस घेणे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. परंतु केंद्र सरकारने नागरिकांना असा विश्वास दिला आहे की, भारतात उपलब्ध असलेली लस अन्य देशांमध्ये विकसित झालेल्या लसीइतकीच प्रभावी आहे. विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींनासुद्धा पूर्ण डोस घेण्याचा सल्ला दिला जात असून, या आजाराच्या विरोधात मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अँटीबॉडीज्चे सुरक्षा कवच तयार होईल. जेव्हा व्यक्ती एकदा संसर्गातून बाहेर पडते, तेव्हा हा संसर्ग पुन्हा आपल्याला झाला तर त्याच्याशी कसे लढायचे, ही गोष्ट त्यांच्या शरीराला समजलेली असते. विषाणूशी लढण्यासाठी ही प्रतिकारशक्ती कायम राहत नाही किंवा पूर्णपणे प्रभावी राहत नाही. नंतर ती क्षमता कमीही होऊ शकते.

जर रुग्णाला एकदा कोरोना होऊन गेला असेल, तर त्याची इम्युनिटी वाढलेली असेल. परंतु ही इम्युनिटी किती काळ कार्यान्वित राहील, या बाबतीत सहा महिन्यांपर्यंतच्या कालावधीची आकडेवारी सध्या उपलब्ध आहे. औषध नियामकांना औषधांच्या उत्पादक कंपन्या क्लिनिकल ट्रायलची म्हणजे वैद्यकीय चाचण्यांची माहिती उपलब्ध करून देतात. त्यानंतर औषध कंपन्या त्या आकडेवारीवरून लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागते. जर लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असेल तरच अशी परवानगी मागितली जाते. कोणत्याही वैद्यकीय उत्पादनाच्या बाबतीत ते पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे पुरेसे पुरावे समोर आल्यानंतरच कोणत्याही औषधाच्या किंवा लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी दिली जाऊ शकते. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आणि प्राप्त माहितीचे पूर्ण विश्लेषण केल्यानंतर लसीला अंतिम मंजुरी दिली जाते.

मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी तयार केलेल्या लसी ९५ टक्के प्रभावी आहेत. स्वदेशी लसींचा प्रभाव ७० टक्के आहे. जर एखाद्या लसीचा प्रभाव ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ती आजाराशी लढण्यासाठी सक्षम मानली जाते. आगामी काळात देशात पाच प्रकारच्या लसी मिळणार आहेत. ज्याच्याकडे जितका पैसा आहे, तो त्या हिशेबाने लसीची निवड करू शकेल. लस आल्यामुळे सध्याच्या काळात दिलासा निश्चित मिळेल. परंतु अजूनही लोकांना सहा महिने तरी काळजी घ्यावी लागणार आहे. यात मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि वारंवार हात धुणे आदींचा समावेश आहे. भारतात कोरोनाच्या सहा लसींची चाचणी सुरू आहे. यात आयसीएमआर-भारत बायोटेक कंपनीची लस, जायडस कॅडिला, जेनोव्हा आणि ऑक्सफर्ड या लसींचा समावेश आहे. डॉ. रेड्डी लॅबच्या सहकार्याने तयार होत असलेली रशियाची स्पुतनिक व्ही आणि एमआयटी, अमेरिकेची बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीद्वारा विकसित लसींचाही समावेश यात आहे.

डॉ. राहुल भार्गव
वैद्यकीय तज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या