30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeविशेषभाजपासाठी बंगाल का महत्त्वाचे?

भाजपासाठी बंगाल का महत्त्वाचे?

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ज्या प्रकारे ताकद लावली आहे, ती पाहता ही निवडणूक केवळ बंगालसाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची असल्याचा अंदाज येतो. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना लिहिलेल्या पत्रातही याचे संकेत दिले आहेत. म्हणूनच विविध राज्यांत प्रभुत्व असणा-या नेत्यांचा पाठिंबा ममतांना मिळाला आहे. यात अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नेत्यांचा समावेश आहे.

एकमत ऑनलाईन

तसे पाहायला गेल्यास देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डूचेरी या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. परंतु लोकांशी चर्चा केली किंवा वर्तमानपत्रांची पाने चाळली तर असे दिसून येते, जणू केवळ पश्चिम बंगालमध्येच निवडणूक आहे. या निवडणुकीमुळे तापलेल्या वातावरणाची धग पश्चिम बंगालच्या सीमा ओलांडून बाहेर पडल्याचे दिसत आहे. असे काय आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत? असे म्हणतात, की पंतप्रधानांची खुर्ची मिळवायची असेल तर उत्तर प्रदेशकडे लक्ष द्यावे लागते. पश्चिम बंगाल राजकीय दृष्टीनेही एवढे महत्त्वाचे राज्य मानले जात नाही. या निवडणुकीच्या निकालांमुळे केंद्र सरकारच्या स्थितीवरही फारसा परिणाम होणार नाही. पश्चिम बंगाल हे राज्य भाजपच्या शक्तिस्थळांमध्येही गणले जात नाही. ज्या काँग्रेसपासून भाजप नेते देशाला मुक्त करू इच्छितात, त्याच काँग्रेसचा पराभव करणे हे ममता बॅनर्जींचे उद्दिष्ट आहे. या राज्यात भाजपचे सरकारही कधीच नव्हते. या राज्यात भाजपकडे केवळ तीन आमदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात रिंगणात उतरविण्याजोगे चेहरेही भाजपकडे नाहीत. ममता बॅनर्जींच्या आणि अन्य पक्षांमधून भाजपला चेहरे उधार घ्यावे लागले आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठीही भाजपकडे राज्यात कोणताही चेहरा नाही. सौरव गांगुलीचा चेहरा वापरण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. मग ‘रिटायर्मेन्ट’च्या वाटेवर असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा चेहरा घासून-पुसून लोकांसमोर आणला गेला. तरीही या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप नेत्यांचा चाललेला आटापिटा दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसते. भाजपचे मूळ असलेल्या जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी या राज्यातील होते हे खरे; परंतु आज या राज्यात तोमार नाम, आमार नाम, नंदीग्राम, खेला होबे, चंडी पाठ, हिंदू, ब्राह्मण, चोट, चोट की साजिश, जय श्रीराम विरुद्ध जय श्रीकृष्ण, दुर्गा काली विरुद्ध जय श्रीराम, कलमा फिर गोत्र, ममता यांचे भावनिक आवाहन… आदी सर्व प्रकार का चालले आहेत? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ज्या प्रकारे ताकद लावली आहे, ती पाहता ही निवडणूक केवळ बंगालसाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची असल्याचा अंदाज येतो. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना लिहिलेल्या पत्रातही याचे संकेत दिले आहेत. म्हणूनच विविध राज्यांत प्रभुत्व असणा-या नेत्यांचा पाठिंबा ममतांना मिळाला आहे. यात अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नेत्यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा जिंकणा-या भाजपला यावेळी ममतांना सत्तेवरून खेचून सरकार स्थापन करण्याची तीव्र इच्छा आहे. भाजपने ममतांना सर्वत्र कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही चालविला आहे. बंगालमध्ये राजकीय फेरबदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध राज्यांमधील आपल्या नेत्यांची फौज निवडणूक प्रचारात उतरविली आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जी हा चक्रव्यूह तोडण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागणार आहे.

राज्यांत अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव; केंद्राचे मुख्य आरोग्य सचिवांना पत्र

मुख्य प्रश्न असा की, पश्चिम बंगालमधील सध्याचे राजकीय वारे कोणकोणत्या दिशेला जाऊ शकतात. एक तर तिथे ममता बॅनर्जींचे सरकार बनू शकते. दुसरी शक्यता ममतांचे सरकार जाऊ शकते. तिसरी शक्यता भाजपचे सरकार बनू शकते आणि चौथी शक्यता एकत्रित सरकार स्थापन होऊ शकते. चौथ्या पर्यायाचा विचार करता, त्याचा स्पष्ट अर्थ असा होईल की, जर आघाडीचे सरकार आले तर ते भाजपच्या नेतृत्वाखाली नसेल. अशा कोणत्याही संभाव्य आघाडीचे नेतृत्व ममताच करतील. जर भाजपचे सरकार बनणार नसेल तर दुस-या आणि तिस-या पर्यायाविषयी विचारच करता कामा नये.

पश्चिम बंगालमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांचा कल भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या दिशेने पाहावयास मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला होता. भाजपला एकंदर ४०.६४ टक्के मते मिळाली होती आणि १८ उमेदवार निवडून आले होते. यातील १६ जागा अशा आहेत, जिथे भाजपचा उमेदवार पहिल्यांदाच निवडून आला होता. भाजपच्या मतपेढीतसुद्धा २२.८५ टक्क्यांची वाढ झाली होती. अर्थात मोदींच्या लोकप्रियतेची लाट असतानासुद्धा ममता बॅनर्जींच्या पक्षाचा जनाधार ३.४८ टक्क्यांनी वाढला होता, हा भाग वेगळा! एकंदर ४३.६९ टक्के मतदारांनी तृणमूल काँग्रेसला पसंती दिली होती आणि या पक्षाला २२ जागा मिळाल्या होत्या.

भाजपचा विस्तार आणि काँग्रेस तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनाधारात झालेली घट यामुळे अर्थात २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत तृणमूलचे १२ जागांचे नुकसान झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ४.०९ टक्के आणि माकपचे १६.७२ टक्के मतांचे नुकसान झाले. यामुळे दोन्ही पक्षांनी आपापल्या ताब्यातील दोन-दोन जागा गमावल्या. २०१८ मध्ये बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे पारडे भलतेच जड होते. भाजपला ५७७९ ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन करता आला होता, तर तृणमूल काँग्रेसने ३८११८ ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. जिल्हा परिषदेत तृणमूल काँग्रेसला ७९३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला २२, डाव्या आघाडीला १ तर काँग्रेसला केवळ ६ जागा जिंकता आल्या होत्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २ कोटी ४५ लाख ६४ हजार ५२३ मतदारांनी पसंती दिली होती. हा जनाधार एकूण मतदारसंख्येच्या ४४.९१ टक्के आहे.

२९३ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणा-या तृणमूल काँग्रेसला २११ जागांवर यश मिळाले होते आणि मतांच्या टक्केवारीत ६ टक्क्यांची वाढ झाली होती. परिणामी तृणमूलला मागील निवडणुकांच्या तुलनेत २७ जागा अधिक मिळाल्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान माकपचे झाले. या पक्षाच्या १०.३५ टक्के मतदारांनी पक्षाची साथ सोडली. १४८ जागांवर निवडणूक लढवूनसुद्धा माकपला केवळ २६ जागा मिळाल्या आणि १४ जागांचे नुकसान झाले. काँग्रेसला ६७ लाख म्हणजे १२..२५ टक्के मते मिळाली. ३.१५ टक्के नवे मतदार काँग्रेसला मिळाले. केवळ ९२ जागांवर निवडणूक लढविणा-या काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत २ जागांचा फायदा काँग्रेसला झाला. भाजपला २०१६ च्या निवडणुकीत ५५ लाख ५५ हजार मतदारांची पसंती मिळाली. एकूण मतांची टक्केवारी १०.१६ राहिली. गेल्या निवडणुकीतही पक्षाला जवळजवळ दुप्पट मतांचा फायदा झाला. नवीन मतदारांचे प्रमाण ५.५८ टक्के राहिले. २९१ जागांवर निवडणूक लढवूनसुद्धा भाजपला २०१६ च्या निवडणुकीत केवळ ३ जागांवर विजय संपादन करता आला. अर्थात, याही जागा भाजपने पहिल्यांदाच जिंकल्या.

आता भाजपला विधानसभेतील संख्या ३ वरून १७० वर न्यायची आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व अस्त्रे पक्षाने उपसली आहेत. सौरव गांगुलीला मैदानात उतरविण्याचा प्रयत्न, ममता बॅनर्जींच्या विश्वासू लोकांना फोडणे, रथयात्रा काढणे, हिंदुत्व, तुष्टीकरण, फोडा आणि राज्य करा, पंतप्रधानांची दाढी, नेताजी सुभाषचंद्रांच्या आठवणींना उजाळा, जातींचे राजकारण, मिथुनदाची एन्ट्री अशी अनेक अस्त्रे भाजपने वापरली. ममतांचा ‘जय श्रीराम’ला विरोध असून, त्या हिंदूविरोधी आहेत अशी प्रतिमा बनविण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे ममतांवर चंडीपाठ करण्याची तसेच मंदिरांची परिक्रमा करण्याची वेळ आली. अर्थात वाजपेयी-अडवाणींच्या काळातील भाजप आणि मोदी-शहांचा भाजप यातील फरक अनेक निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. मोदी-शहांचा भाजप नेहमी निवडणुकीच्याच मूडमध्ये असतो. सरकार बनविण्यासाठी सर्व हातखंडे वापरले जातात. प्रतिष्ठा पणाला लावली जाते. हे सर्व पश्चिम बंगालमध्ये दिसून येते.

भाजपला बंगालच्या निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये नोकरशाहीत मोठे फेरबदल करायचे आहेत. तसेच मध्य प्रदेशातही मोठे राजकीय बदल करायचे आहेत. तेथील काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजप तेथे ज्योतिरादित्यांना बळ देण्याची शक्यता आहे. डाव्यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा अंत करणा-या झुंजार नेत्या अशी प्रतिमा असणा-या ममतांची त्यामुळे कसोटी आहे. सध्याच्या स्थितीत ममतांच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी भाजप तीन आकडी संख्येपर्यंत पोहोचला तरी ते मोठे यश असणार आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नसल्याचे सांगितले जात असले तरी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नातेवाईक अनिरबन गांगुली यांचे नाव चर्चेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंगालची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची बनली असून, भाजपसाठी ती अधिक प्रतिष्ठेची ठरली आहे.

योेगेश मिश्र
ज्येष्ठ संपादक, विश्लेषक-स्तंभकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या