33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home विशेष पक्षीजीवन का आले धोक्यात?

पक्षीजीवन का आले धोक्यात?

पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासात झालेला अतिरेकी मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि अन्नटंचाई या कारणांमुळे ते संकटात आले आहेत. आपल्याकडे येणा-या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वर्षानुवर्षे घटत चालली आहे, हेही सर्वांना आता दिसू लागले आहे. निसर्गाचे संतुलन आणि जीवनचक्र यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पक्ष्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे अनिष्ट आहे.

एकमत ऑनलाईन

जगभरात अनेक ठिकाणी जे घडले ते पक्ष्यांचे मृत्युतांडव भारतातही घडू लागले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची सुरुवात कावळ्यांपासून झाली. खरे तर कावळा हा असा पक्षी आहे, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती पक्ष्यांमध्ये सर्वांत चांगली मानली जाते. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतात मंदसौर-नीमच आणि त्यालगतच्या राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यांत कावळे मृत्युमुखी पडले. त्याचप्रमाणे मुंबईतही कावळे मरून पडल्याचे दिसल्यामुळे खळबळ उडाली. ठाणे आणि अन्य जिल्ह्यांमध्ये बगळे मृत्युमुखी पडल्याचे दिसले. हिमाचल प्रदेशातील पोंग सरोवरात स्थलांतरित पक्षी मृत्युमुखी पडले. नंतर केरळमधील पाळीव कोंबड्या आणि बदके मरू लागली. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या ऋतूत आपल्याकडे नेहमीच बर्ड फ्लू आल्याच्या बातम्या येतात आणि गाजतात. लोकांमध्ये घबराट पसरते; परंतु आजतागायत बर्ड फ्लूमुळे एकही माणूस दगावल्याचे उदाहरण आपल्याकडे नाही. कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मात्र यामुळे अतोनात नुकसान होते.

पक्ष्यांचा मृत्यू याच ऋतूत होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे याच ऋतूत हजारो किलोमीटरवरून येणारे स्थलांतरित पक्षी. जीवनाची आशा घेऊन येणारे हे पक्षी येथील पक्ष्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. या पक्ष्यांच्या मागील अनेक पिढ्या दरवर्षी याच हंगामात येथे स्थलांतर करीत आहेत. शेकडो वर्षांपासून हे हंगामी स्थलांतर सुरू आहे. मात्र, पक्ष्यांचा या हंगामात होणारा मृत्यू ही मात्र गेल्या काही दशकांपासूनची समस्या आहे. म्हणजेच पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासात होत असलेले हस्तक्षेप आणि जलवायू परिवर्तन हीच त्यांच्या मृत्यूची खरी कारणे आहेत. आर्क्टिक क्षेत्र आणि उत्तर ध्रुवावर जेव्हा तापमान शून्याच्या खाली चाळीस अंशांपर्यंत उतरण्यास प्रारंभ होतो, तेव्हा तेथील पक्षी भारताकडे स्थलांतर करतात. हजारो वर्षांपासून सुरू असलेले हे स्थलांतर सर्वांनाच ठाऊक आहे. हे पक्षी रस्ता कसा शोधतात, हजारो किलोमीटर प्रवासाचा हा रस्ता त्यांच्या लक्षात कसा राहतो, ज्या ठिकाणी त्यांचे आजोबा-पणजोबा आले त्याच नेमक्या ठिकाणी तेही कसे येतात, या प्रश्नांची उकल अजून विज्ञानालाही झालेली नाही.

या पक्ष्यांचा येथे येण्यामागील उद्देश मुख्यत्वे थंडी किंवा अति उष्णतेपासून बचाव करणे आणि अन्नाचा शोध घेणे हाच असतो. एवढ्या मोठ्या अंतराचा प्रवास ते करतात, तेव्हा त्यांच्या पंखांमधून काही जिवाणूही येत असण्याची शक्यता आहे. परंतु मानवी वस्ती आणि जंगलांमधील अंतर कमी होत असल्यामुळे प्राण्यांच्या शरीरात आढळणारे विषाणू माणसाच्या शरीरात राहण्यासाठी स्वत:ला कसे तयार करू शकतात, हे कोरोनाच्या संकटाने आपल्याला दाखवून दिले आहे. आता तर एका प्रकारच्या पक्ष्यांच्या शरीरातील विषाणू दुस-या पक्ष्यांच्या डीएनएवर हल्ला करण्याइतके शक्तिशाली बनले आहेत आणि माणसांनाही हानी पोहोचविण्याइतकी त्यांची ताकद आगामी काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रसंग गांभीर्याने घेतले पाहिजेत. मृत्युमुखी पडणा-या पक्ष्यांची मान सर्वप्रथम लटकली. त्यानंतर पंखांमधील ताकद नष्ट झाली. त्यांना चालताही येत नाही आणि उडताही येत नाही, अशी परिस्थिती झाली. शरीर अगदी शिथिल झाल्यानंतर त्यांचा प्राण गेला, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या तरी त्याला ‘बर्ड फ्लू’ म्हटले जात आहे. परंतु ज्या ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत अशा ठिकाणच्या मातीची आणि पाण्याची तपासणी केल्यावर काही वेगळेच वास्तव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण अशाच प्रकारची लक्षणे ‘एव्हियन बटुलिजम’ नावाच्या आजारातही दिसून येतात. ‘क्लोस्ट्रिडियम बटुलिजम’ नावाच्या जिवाणूंमुळे हा आजार पसरतो.

अखेर महापोर्टल रद्द

हा आजार प्रामुख्याने मांसाहारी पक्ष्यांमध्ये होतो. आजाराचे जिवाणू असलेले मासे खाल्ल्यामुळे हे पक्षी या आजाराला बळी पडतात. या पक्ष्यांचे मांस खाल्ले गेल्यास हा आजार आणखी बळावण्याचा धोका संभवतो. पाणी आणि हवेमधील क्षारता वाढल्यामुळे तंत्रिकांवर परिणाम करणारा ‘हायपर न्यूट्रिनिया’ नावाचा आजार होऊन काही पक्षी, विशेषत: स्थलांतर करणारे पक्षी मृत्युमुखी पडत असावेत, असाही एक अंदाज आहे. या आजाराने ग्रस्त असणा-या पक्ष्यांना भूक लागत नाही आणि त्यामुळे येणा-या अशक्तपणाने अखेर त्यांचा मृत्यू होतो. हा आजार जडलेल्या पक्ष्यांची रोगप्रतिकार शक्ती जवळजवळ शून्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पंख आणि अन्य ठिकाणी लपून बसलेले अनेक प्रकारचे विषाणू सक्रिय होतात आणि आसपासचे अन्य पक्षीही त्यामुळे मृत्युमुखी पडतात.

यासंदर्भात आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे ती अशी की, दूर देशातून, हजारो किलोमीटरचा प्रवास करून, थकून-भागून आलेल्या पक्ष्यांनी येथील जलाशयांमधील मासे खाल्ले असावेत आणि त्या जलाशयाचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यातील मासे रोगग्रस्त झालेले असावेत. तेच या पक्ष्यांच्या पोटात गेल्यामुळे त्यांना एव्हियन बटुलिजम हा आजार जडला असावा. अनेक परिस्थितकीय कारणे एकाच वेळी अस्तित्वात असतील तर एव्हियन बटुलिजम हा आजार होतो, हे जाणकारांना ठाऊक आहे. यात सामान्यत: पाण्याचे तापमान, अ‍ॅनोक्सिक स्थिती (ऑक्सिजनपासून वंचित होणे) तसेच झुडुपे आणि शेवाळ तसेच अन्य जलचरांची प्रतिकूल परिस्थितीचा समावेश होतो. पृथ्वीची तापमानवाढ आणि जलवायूतील परिवर्तनाच्या समस्येला जग सध्या सामोरे जात आहे, तर सर्वांना ठाऊक आहे. पर्यावरणाप्रति अत्यंत संवेदनशील असणारे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात झालेला अतिरेकी मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि अन्नटंचाई या कारणांमुळे संकटात आले आहेत. आपल्याकडे येणा-या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वर्षानुवर्षे घटत चालली आहे, हेही सर्वांना आता दिसू लागले आहे. निसर्गाचे संतुलन आणि जीवनचक्र यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पक्ष्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे अनिष्ट आहे. धोका दिसत असला तरी आपण पक्ष्यांना थांबवू किंवा अडवू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या आसपासचे पक्ष्यांचे अधिवास, आपले पर्यावरण आणि आपली नैसर्गिक संसाधने सुरक्षित राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यास आपण पक्ष्यांच्या मृत्यूचे हे संकट टाळू शकू. अन्यथा हे संकट कधीही पक्ष्यांकडून आपल्याकडे येऊ शकेल.

प्रा. रंगनाथ कोकणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या