24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषपाकिस्तान का ‘बुडतोय’?

पाकिस्तान का ‘बुडतोय’?

एकमत ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून दिसून येणारी पाकिस्तानातील पुराची दृष्ये थरकाप उडवणारी आहेत. पाकिस्तानात मान्सूनमुळे सर्वसाधारणपणे पूर येतो, पण यावर्षीचा पूर म्हणजे महाप्रलय म्हणावा इतका भयंकर आहे. या पुरात मोठमोठ्या इमारती वाहून गेल्या आहेत, शहरे बुडाली आहेत आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या पुराचे वर्णन पाऊस ‘स्टेरॉईड्स’वर असल्यासारखे वाटते आहे, असे केले आहे. हवामानबदल हे या पुराचे मुख्य कारण सांगितले जात आहे. देशाच्या उत्तरेकडील हिमनद्या वितळत असल्यामुळे पुराने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. या पुरात आतापर्यंत एक हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत. तर पाकिस्तानचा एक तृतीयांश भूभाग पाण्याखाली गेला आहे. दहा लाख घरे नष्ट झाली आहेत किंवा त्यांची पडझड झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांनी १६ कोटी डॉलरची तातडीची मदत पाकिस्तानला पाठवली आहे पण पुरामुळे उद्ध्वस्त झालेली गावे, शहरे पुन्हा उभी करण्यासाठी १० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक खर्च येईल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनीच व्यक्त केला आहे. पाकिस्तान हवालदिल झाला आहे. या पुरात संकटनिवारणाचे आणि मदतीचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्तेही या पुराची भीषणता पाहून हबकले आहेत. हा त्या देशाच्या इतिहासातील सर्वांत भयंकर पूर असल्याचे मत हवामानतज्ज्ञही व्यक्त करत आहेत. पाकिस्तानात गेले आठ आठवडे सतत पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम या पुरात झाला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नेहमीपेक्षा नऊ पटींनी जास्त पाऊस पडत आहे. तर संपूर्ण पाकिस्तानात हे प्रमाण पाचपटींनी जास्त आहे. केवळ पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगातच पावसाने थैमान घातले आहे. जगात अगदी अमेरिकेपासून अनेक देशांत प्रचंड पूर आले आहेत. तर चीनसारखे देश दुष्काळाचा सामना करत आहेत.

हवामान बदलाचा परिणाम
शास्त्रज्ञ जागतिक तापमान वाढण्याचा कितपत परिणाम पाऊस पडण्यावर होतो हे निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी पाकिस्तानात २०१० मध्ये मोठा पूर आला होता. यावेळी त्याहीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे. २०१० मध्ये आलेल्या पुरामागे जागतिक तापमानवाढ हे प्रमुख कारण होते. त्यावेळी आर्किटिक्ट म्हणजे उत्तर ध्रुवावर तापमान वाढले होते आणि जगातील समुद्रांमध्ये बाष्पीभवन जास्त प्रमाणात झाले होते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले होते. त्यावेळी जेट स्ट्रीम म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारे उच्च स्तरीय वारे, यावर वाढत्या तापमानाचा परिणाम झाला आणि हे वारे जास्त प्रमाणात वाहत राहिल्याने २०१० मध्ये पाकिस्तानात अधिक प्रमाणात पाऊस झाला तर रशियात त्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट होती. २०२१ मध्ये झालेल्या संशोधनानुसार जागतिक तापमान वाढीमुळे भारतीय उपखंडातील मान्सून अधिक तीव्र आणि लहरी झाला आहे. जागतिक तापमानात १ सेल्सियसने वाढ झाली तर पाऊस ५ टक्के अधिक पडतो. २०१० नंतर पाकिस्तानात नियमितपणे पूर येत आहे. आत्ता आलेला हा पूरही त्या नियमिततेचाच एक भाग आहे. दरवर्षी पावसाचा अतिरेक पाकिस्तानच्या पाचवीलाच पूजला आहे. या वर्षीचा पूर २०१० पेक्षाही भयंकर आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे उंचावरून उताराकडे खूप वेगाने पाणी येते आणि त्या पाण्यात अनेक गावेच्या गावे वाहून जातात. अशा वेळी आधी सावधगिरीचा इशारा देऊनही काही उपयोग नसतो. पुरामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या अशा उंचावरून उताराकडे वेगाने वाहत येणा-या पाण्यामुळे होते.

पावसाचे पाणी न थांबण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड. प्रचंड वृक्षतोडीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही, असे पर्यावरण तज्ज्ञ म्हणतात. तर पाकिस्तानी पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काबूल नदीवरील धरणे नष्ट करण्यात आली, हेही या पुराचे एक कारण आहे. खरे पाहता पाकिस्तानला कायमच हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसत आला आहे. हवामानतज्ज्ञ स्कॉट डंकन यांच्या मते पॅसिफिक महासागरातील वा-यामधील चढ-उताराचा परिणाम पाकिस्तानात पूरसमस्या निर्माण होण्यात झाला आहे. जागतिक हवामान धोका जास्त प्रमाणात असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आठवा लागतो. या वर्षी मार्च ते मे या कालावधीत पाकिस्तानात उष्णतेची लाट आली होती आणि त्या पाठोपाठ पावसाचा हा धुमाकूळ. याचा या देशातील लोकांवर आणि आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. अर्थात पाकिस्तानात आलेला पूर आणि भारतातही विविध ठिकाणी आलेले पूर यात बरेच साधर्म्य आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम भारतापलिकडेही आता दिसू लागले आहेत. प्रत्येक हंगाम आता तीव्र होऊ लागला आहे. उन्हाळ्यात उष्णतेची लाट, पावसाळ्यात पूर आणि हिवाळ्यात थंडीची लाट हे आता अंगवळणी पडू लागले आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत आहे. हवामानबदलाच्या समस्येकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

भारत-पाकिस्तान संबंध
या नैसर्गिक आपत्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भिंत पडायला सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील पुराबद्दल आणि पूरग्रस्त लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे ट्विट केले, त्यावर पाकिस्तानातून सकारात्मक प्रतिसाद आला. यापूर्वी आलेल्या पुरावेळी भारताने देऊ केलेली मदत पाकिस्तानने नाकारली होती. यावेळी काश्मीरसंबंधी ३७० कलम रद्द केल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानने भारतातून होणा-या आयातीवर बंदी घातली होती. आता ती बंदी उठवण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. भारतातून भाजीपाला आणि अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू पाकिस्तानात जलद गतीने पोचतील याची जाणीव त्या देशाला झाली आहे. आत्ता तरी पाकिस्तानला या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत द्यायची तयारीही दर्शवली आहे.

-रंगनाथ कोकणे,
पर्यावरणं अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या