27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeविशेषबहुसंख्याक मुलीच का?

बहुसंख्याक मुलीच का?

एकमत ऑनलाईन

श्रद्धाच्या प्रकरणानंतर सध्या देशभरात लव्ह जिहादची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे देशातील अनेक पोलिस स्टेशनमध्ये विवाहानंतर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याच्या अनेक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्तीने होणा-या धर्मांतरावर चिंता व्यक्त केली आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्यापेक्षाही भावनिक दबावाने धर्मांतर करायला लावणे अधिक धोकादायक आहे. सनातन संस्कृतीतील एखादी मुलगी अन्य धर्मातील युवकासोबत विवाह करते तेव्हा तिचे नातेवाईक तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकतात. त्यामुळे एकाकी पडलेल्या मुलीवर तिचा पती आणि सासरच्या इच्छेनुसार त्यांच्या धर्मातील रीतीरिवाजानुसार जीवन जगण्यासाठी दबाव टाकला जातो. पण आंतरधर्मीय विवाहात बहुसंख्याक समाजातील मुलीच का दावणीला बांधल्या जातात?

देशाची राजधानी दिल्लीत मुंबईच्या श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने अंगावर काटा येईल अशा भयानक आणि भेदकपणे हत्या केल्याचे समोर आले आणि अवघा देश हळहळला. या हत्येमुळे अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. या प्रश्नांसोबतच लव्ह जिहादच्या चर्चेनेसुद्धा डोके वर काढले आहे. या प्रकरणावरून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. लोकांच्या आक्रोशावर काहींचे म्हणणे आहे की, याकडे धार्मिक अंगाने पाहता कामा नये; कारण अशा प्रकारची घटना स्वधर्मियांसोबतच्या प्रेमसंबंधातही घडू शकते. निश्चितच या म्हणण्यातही तथ्य आहे. परंतु या आक्रोशामागे काही अशी कारणे आहेत ज्यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील दशकभरात मुस्लिम युवकांशी विवाह करणा-या भिन्नधर्मीय विशेषत: हिंदू धर्मातील मुलींना आपले प्राण गमवावे लागल्याच्या किंवा मतभेद होऊन त्या वैफल्यग्रस्त झाल्याच्या किंवा त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेम, प्रेमसंबंध आणि विवाह ही पूर्णत: प्रत्येकाची वैयक्तिक आणि खासगी बाब आहे. याबाबत इतरांना विरोध करण्याचा काहीही अधिकार नाही. परंतु प्रेम आणि विवाह या पवित्र नात्यांचा वापर धर्मांतरासाठी केला जात असेल तर तेव्हा ही बाब खासगी राहात नाही आणि समाजातून त्याला होणारा विरोध स्वाभाविक ठरतो. आपण नेहमी सहजपणे म्हणतो की, प्रेम हे जाती आणि धर्माचे बंधन मानत नाही. तसेच मुली भावूक, कोमल आणि संवेदनशील असतात आणि प्रेमावर सहज विश्वास ठेवून अन्य जाती-धर्माच्या युवकासोबत विवाह करण्यास तयार होतात.

ही बाब खरी असली तरी हाच भाव आणि समर्पणाची भावना मुस्लिम मुलींमध्ये का दिसून येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विवाहानंतर जोडीदार आपल्या धार्मिक आस्थेचे संरक्षण करेल, या आशेने, अपेक्षेने किंबहुना विश्वास ठेवून मुली आंतरधर्मीय विवाह करतात; परंतु कालांतराने हा विश्वास हवेत उडून जाताना दिसतो. देशातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये विवाहानंतर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याच्या अनेक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. अलीकडेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्तीने होणा-या धर्मांतरावर चिंता व्यक्त केली आहे. बळजबरीने किंवा सक्तीने होणा-या धर्मांतराबाबत टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. तथापि, जबरदस्तीने धर्मांतर करण्यापेक्षाही भावनिक दबावाने धर्मांतर करायला लावणे हे अधिक धोकादायक आहे. सनातन संस्कृतीतील एखादी मुलगी अन्य धर्मातील युवकासोबत विवाह करते तेव्हा तिचे नातेवाईक तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकतात. परिणामी ती एकाकी पडते.

अशा वेळी पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांच्या धर्मातील रीतीरिवाजानुसार जीवन जगण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. येथे प्रश्न असा पडतो की, आंतरधर्मीय विवाहात बहुसंख्याक समाजातील मुलीच का दावणीला बांधल्या जातात? यामागे दिसणारे एक स्पष्ट कारण म्हणजे समाज आणि संस्कृती, परंपरा याबाबतचा विश्वास कमी होत जाणे. आजच्या काळात आधुनिकतेच्या नावावर आपण सनातन संस्कृतीची आस्था, विश्वास आणि मूल्ये या सर्वांना मागासपणाची प्रतीके समजू लागलो आहोत. किंबहुना आजच्या आधुनिक समाजाची हीच ओळख झाली आहे. मध्यमवर्गीयांकडून याच विचारसरणीचे अनुकरण केले जात असल्याचे दिसत आहे. यातून एक गोंधळलेली पिढी उदयाला आली आहे. त्यांच्यासाठी प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षणापुरतेच मर्यादित राहिले आहे. वस्तुत: जाती-धर्माची परंपरा हा केवळ आस्थेचा विषय नाही, तर सुखी जीवन जगण्याचा एक मार्गसुद्धा आहे. या जीवन मार्गावरून चालताना काय उचित आहे, काय अनुचित आहे याबाबत भेद करून विवेकाने आयुष्य जगता येते. जन्मल्यापासून एखाद्या संस्कृती आणि परंपरेनुसार पालनपोषण झाल्यानंतर दुस-या धर्मातील व्यक्तीशी विवाह झाला तर त्या धर्मातील परंपरेचे पालन करणे कसे सहजशक्य होईल, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

माहिती-तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात डेटिंग अ‍ॅपमुळे, सोशल नेटवर्किंग साईटस्मुळे प्रेमाविषयीच्या धारणांना नवे आयाम प्राप्त झाले आहेत. परंतु छद्म आधारावर झालेले प्रेम इतके शक्तिशाली असते का की, समोरच्याने जादूची छडी फिरवल्यानंतर आपली परंपरा आणि आस्था विसरता येते? याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे आहे. मग ही जादूची छडी कोणती असते? शारीरिक आकर्षणाच्या सापळ्यात अडकलेले प्रेम हे मन आणि बुद्धी भ्रष्ट करून टाकते. चांगले आणि वाईट याबाबत विवेकबुद्धीने विचार करण्याची शक्ती दडपून टाकते. अशी स्थिती श्रद्धासारख्या अनेक मुलींना मृत्यूच्या जबड्यापाशी आणून ठेवते.
आजच्या परिस्थितीत २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेल्या एका टिप्पणीवर चिंतन करणे गरजेचे वाटते. न्यायालयाने नूरजहाँ खटल्याचा निकाल देताना असे म्हटले होते, की ज्या विचारसरणीची माहितीच नाही, ती स्वीकार कशी केली जाईल? न्यायालयाने असेही म्हटले होते की, धर्मांतराचा उद्देश धर्मातील परंपरा आणि सिद्धांतांचा स्वीकार करणे, हा आहे. प्रेमाचा स्वीकार करण्यास विरोध असता कामा नये; मात्र प्रेमाच्या आडून धर्मांतर करण्याचा डाव असेल तर त्यास विरोध होणे स्वाभाविक आहे.

विशेष म्हणजे २००० मध्येही अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले होते, की बिगरमुस्लिम व्यक्तीचा इस्लामवर विश्वास नसताना विवाहाच्या हेतूने धर्मांतर करणे निरर्थक आहे. कुराणात असे लिहिलेले आहे, की आस्था नसणा-या महिलेशी तोपर्यंत विवाह करू नये जोपर्यंत ती महिला इस्लामवर आस्था ठेवत नाही. एखाद्या धर्मावर आस्था ठेवणे ही यांत्रिक प्रक्रिया नाही. एखाद्याच्या संपर्कात आल्यामुळे लागलीच मतपरिवर्तन होऊन ती निर्माण होऊ शकत नाही. पण ही गोष्ट समजून घेतली जात नाही. अशी पार्श्वभूमी असतानाही श्रद्धासारखी प्रकरणे सातत्याने घडत असतील तर त्याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अशा घटनांबाबत समाजात जागृती केली गेली पाहिजे, अन्यथा कितीतरी मुली श्रद्धा वालकरप्रमाणे आपला जीव गमावून बसतील.

-डॉ. ऋतू सारस्वत
समाजशास्त्राच्या अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या