19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeविशेष‘भारत जोडो’ ‘गेम चेंजर’ ठरेल?

‘भारत जोडो’ ‘गेम चेंजर’ ठरेल?

एकमत ऑनलाईन

काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. २०० पेक्षा अधिक सामाजिक संघटनांनी या यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसने भारत यात्रेत नारा दिला आहे की, ‘मिले कदम, जुडे वतन’. सध्याच्या काळात काँग्रेस कठीण परिस्थितीतून जात आहे. या पार्श्वभूमीवर ही यात्रा ही एक संधी असून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मोदींना पर्याय असू शकतो आणि काँग्रेस एक जबाबदार पक्ष आहे, ही बाब त्यांना लोकमानसावर ठसवावी लागेल. आजवरचा इतिहास पाहता अशा जनसंपर्क यात्रांचा फायदा राजकीय नेत्यांना झालेला दिसून येतो.

सद्यस्थितीत जगभरातील नेत्यांना आपली प्रतिमा तयार करण्यासाठी राजकारण हे एक महत्त्वाचे साधन आहे. भारतही यास अपवाद ठरू शकत नाही. जनमानसात आपली विशिष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी भारतीय नेतेही रणनीतीकारांची, प्रतिमावृद्धी करणा-या कंपन्यांची नियुक्ती करतात. हे रणनीतीकार नेत्यांना काय परिधान करावे, कसे बोलावे आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणकोणत्या मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करावयास हवे, याविषयीचे इत्थंभूत मार्गदर्शन करतात. मागील दशकभरात अनेक नेत्यांनी अशा रणनीतीकारांना आपले सामाजिक व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याच्या कामासाठी नियुक्त करून कामाला लावले आहे. अशा प्रकारची पद्धत वापरणा-या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अशी नावे पटकन डोळ्यांसमोर येतात.

राजकीय यात्रांचा विचार करता याची सुरुवात १९३० मध्ये महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडी यात्रेपर्यंत मागे जाता येईल. दांडी यात्रेपासूनच या यात्रा परंपरेची सुरुवात झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची सध्याची ‘भारत जोडो’ यात्रा अशाच प्रकारचे एक महत्त्वाचे जनसंपर्क अभियान किंवा मोहीम आहे. एन. टी. रामाराव आणि लालकृष्ण अडवाणी यांनीसुद्धा ‘रथ’ किंवा बसचा वापर करून अशाच प्रकारची यात्रा काढली होती. विनोबा भावे, जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर (१९८३) आणि आंध्र प्रदेश काँग्रेसचे नेते वाय.एस. राजशेखर रेड्डी (२००४) यांनीसुद्धा अशा प्रकारची यात्रा काढली होती. राहुल गांधी यांनी २००४ मध्ये प्रथमच लोकसभेत सदस्य म्हणून प्रवेश केला होता तेव्हापासून ते आपल्या वेगवेगळ्या प्रतिमा पडताळून पहात आहेत. खरे तर लोकमानसात आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहुल गांधी हे फारसे यशस्वी ठरले नाहीत. मात्र तरीही एक राजकीय चारित्र्य असणारा नेता अशी आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात त्यांनी खंड पडू दिला नाही. ते नेहमीच आपले राजकीय वजन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. ते भारतीय समाजाचे नेते आणि महिला व युवकांचे नेते असल्याची भूमिका निभावताना, पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या धोरणांपासून देशाला वाचवण्याचा आणि मोदींना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांच्या या प्रयत्नांना राजकीय स्वरूपात आणि लोकसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये किती फायदा मिळेल, हे येणारा काळच सांगेल.

नजीकच्या घटनांचे विश्लेषण केले तर सर्वप्रथम काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आपण बरेच काही शिकल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी युवा काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल केले, मात्र तिथेही फारसा प्रभाव पाडण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी व्यवस्था बदलण्यासाठी कठोर युवा नेत्याच्या भूमिकेतही जाण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीसाठी एक नवी विचारधारणा असलेल्या नेत्याच्या रूपातही ते दिसले. मात्र तरीही २०१४ आणि २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याचप्रकारे विविध राज्यांचा विचार केल्यास तब्बल ४५ वेळा त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. पदरी पडलेल्या या अपयशानंतर राहुल गांधी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अर्थात, राजीनामा दिल्यानंतरही ते रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे पद न भूषवताही काँग्रेस पक्ष पहिल्यासारखाच चालवत आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसमधून अन्य पक्षांत गेलेल्या नेत्यांना जोडण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी पिढ्यान्पिढ्या काँग्रेसला मतदान करणा-या काँग्रेसच्या मतदाराचा शोध घेत आहेत.

मागील दहा वर्षांपासून काँग्रेस केंद्रातील सत्तेच्या बाहेर आहे. आगामी लोकसभा निवडणुकांना केवळ दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. जर २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आणखी हतबल होतील. भारत जोडो यात्रा ही त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे जनसंपर्क अभियान एखाद्या शो सारखे होते. पण आता पक्षाच्या खासदारांसहित काँग्रेस सदस्यांच्या एका मोठ्या गटाने यात सहभाग घेतला असून ते १५० दिवसांत बारा राज्यांमध्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचे अंतर पार करतील. २०० पेक्षा अधिक सामाजिक संघटनांनी या यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.
काँग्रेसने भारत यात्रेत नारा दिला आहे की, ‘मिले कदम, जुडे वतन’ असे म्हटले जाते की, भारत जोडो यात्रेच्या १५० दिवसांच्या काळात राहुल गांधी एक महान श्रोता म्हणून संवाद साधत आहेत.

ते जनतेच्या भावना आणि समस्या ऐकून घेताहेत. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबाबत म्हटले आहे की, ही यात्रा म्हणजे एक सार्वजिक, खुले, पारदर्शी व्यासपीठ आहे. मात्र राहुल गांधी यांनी आजपर्यंत काय केले हे लोकांना दाखवून देण्यासाठी त्यांच्याकडे खूपच कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. राहुल गांधी यांना आपले व्यक्तिमत्त्व जनतेसमोर आकर्षक रूपात आणावे लागणार आहे. दुसरीकडे, भाजपा राहुल गांधी हे बौद्धिक पातळीवर अपरिपक्व, भावनात्मकदृष्ट्या अस्थिर, संघटनात्मक स्तरावर अकार्यक्षम आणि ब्लॅक मनीला व्हाईट मनीत रूपांतर करणारे आहेत, अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘भारत जोडो यात्रा’ हे राहुल गांधी यांच्या जवळपास दोन दशकांच्या राजकीय करिअरमधील सर्वाधिक काळ चालणारे अभियान आहे. मागील काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा विरोध करण्यासाठी ते सायकलवरून संसद भवनात गेले होते. राहुल यांच्या रणनीतीकारांनी त्यांचे फिटनेस जपण्यासाठी करत असलेल्या व्यायामाचे, त्यांच्या स्वयंपाकातील कौशल्याचे आणि मच्छिमारांसोबत पोहतानाचे फोटो व्हायरल केले आहेत. यामागे राहुल यांची प्रतिमा उजळण्याचा रणनीतीकारांचा दृष्टिकोन दिसून येतो.

अर्थात, भारत जोडो यात्रेसंदर्भात सर्वांत मोठा प्रश्न आहे तो या यात्रेचे यशापयश कसे असेल? या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी यात्रेतील गर्दीचे रूपांतर मतात परिवर्तित करण्यात राहुल यशस्वी होतील का? राहुल गांधी यांचा दावा आहे की, ते भय, कट्टरतावाद आणि पूर्वग्रहदूषित राजकारण आणि उपजीविकेवर घाला, वाढती बेरोजगारी आणि आर्थिक असमानता यांस पर्याय ठरतील. ही यात्रा आपल्यासाठी एखाद्या तपश्चर्येसारखी आहे, असे राहुल यांचे म्हणणे आहे. देशाला संघटित करण्यासाठी एका मोठ्या लढाईस आपण स्वत:ला तयार करीत आहोत. मात्र त्यांच्या या दाव्यात जर-तर हा विषय जाणवतो. याबाबत पहिला मुद्दा असा की, कोणतीही सुटी न घेता राहुल गांधी हे अभियान पूर्ण करू शकतील का? दुसरा मुद्दा म्हणजे, पाच महिन्यांच्या मोठ्या कालावधीत जनतेचे या यात्रेविषयीचे आकर्षण कायम ठेवणे हे खूप मोठे आव्हान असून ते महाकठीण दिसते.

यासाठी राहुल गांधी यांनी स्वत:ला आणि काँग्रेसला नेहमी बातम्यांमधून चर्चेत ठेवले पाहिजे. त्यासाठी त्यांना सातत्याने नवे काहीतरी मुद्दे शोधावे लागतील. तसेच नव्या काहीतरी उपाययोजना अमलात आणाव्या लागतील. काही जण राहुल गांधी अर्धा रस्ता तरी पार करतील का, असा प्रश्न विचारत आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काँगे्रसच्या या यात्रेच्या माध्यमातून निर्माण झालेले वातावरण २०२४ च्या निवडणुकीपर्यंत टिकून राहिले पाहिजे. खरे तर राहुल गांधी यांच्यासमोर हे एक आव्हानच आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे, ही यात्रा तेव्हाच यशस्वी झाली असे म्हणता येईल, जेव्हा पुढे जाऊन राहुल गांधींच्या हाती नेतृत्व येईल. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या यात्रेला ‘ऐतिहासिक बदल’ असे म्हटले आहे. ही यात्रा भारतीय राजकारणातील एक परिवर्तनकारी क्षण आणि पक्षाचा कायापालट करण्यासाठीच्या प्रयत्नातील निर्णायक क्षण होऊ शकते, असे त्यांना वाटते. खरे पाहता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी ही यात्रा म्हणजे एक मोठी संधी आहे.

-कल्याणी शंकर
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या