27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषघसरणीला ब्रेक लागेल?

घसरणीला ब्रेक लागेल?

एकमत ऑनलाईन

अपेक्षेप्रमाणे गतसप्ताहात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरील नकारात्मक संकेतांबरोबरच सप्ताहसमाप्तीला आलेल्या देशातील महागाईच्या कडाडलेल्या आकड्यांमुळे बाजाराने अक्षरश: गटांगळ्या खाल्ल्या. मंदीवाल्यांच्या दबावामुळे बाजाराच्या वरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नांनंतर सातत्याने विक्रीचा मारा होत गेला. प्रचंड वाढलेली महागाई, केंद्रीय बँकांचा व्याजदरवाढीचा सपाटा, एफआयआयचा विक्रीचा मारा यामुळे चालू आठवड्यातही बाजारावर नकारात्मकतेचे ढग कायम आहेत; परंतु समभागांच्या किमती ब-याच अंशी घसरल्यामुळे खरेदीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे बाजार छोटीशी उसळीही घेऊ शकतो. यादृष्टीने हा आठवडा निर्णायक असेल.

गगनाला भिडलेल्या महागाईमुळे आणि रशिया-युक्रेन संकटाबरोबरच चीनमधील कोविडच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगभरातील शेअर बाजारात मंदीबाईंनी ठाण मांडल्याचे दिसत आहे. गतसप्ताहात १६,४१३ पर्यंत पोहोचलेला राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५७३८ पर्यंत घसरून १५७८२ वर बंद झाला; तर ३४,७८८ पर्यंत गेलेला बँक निफ्टी सप्ताहाखेरीस ३३१२१ पर्यंत खाली घसरला. दुसरीकडे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ६१,७६५ वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८९२३ अंकांनी घसरून आज ५२,७९३ अंकांवर आला आहे. विशेषत: रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाला असून त्याचेच पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटत आहेत. त्यामुळे अमेरिका, चीनसह सर्वच शेअर बाजारांमध्ये प्रचंड पडझड दिसत आहे. आज भारतीय शेअर बाजार नऊ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. गतसप्ताहाचा विचार करता सेन्सेक्समध्ये ३.७२ टक्क्यांची, तर निफ्टीमध्ये ३.८३ टक्क्यांची घसरण झालेली पहायला मिळाली. महागाईवर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या रेपोदरातील वाढीनंतर शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांत जवळपास १० टक्क्यांची घसरण झाली आहे.

अमेरिकेत एप्रिलमधील ग्राहक किमतींवर आधारित चलनवाढीचा दर ८.३ टक्के नोंदविला गेला असून मार्च महिन्यापेक्षा तो काहीसा कमी असला तरी फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षित उद्दिष्टाहून तो दोन टक्के अधिक असल्यामुळे पुढील महिन्यात फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे भारतातही नुकताच जाहीर झालेला महागाईचा दर हा आठ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक येत्या काळात रेपो दरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. महागाईमुळे भारताच्या विकास दराचे अनुमानही घटवण्यात आले आहे. शेअर बाजारातील घसरणीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची तुफान विक्री प्राधान्याने कारणीभूत ठरली आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत एफपीआयने १.४८ लाख कोटींची विक्री केली असून यातील २०,८०० कोटींची विक्री मे महिन्यातील दोन आठवड्यांत झाली आहे. मे महिना हा सलग आठवा महिना आहे ज्यामध्ये विदेशी गुंतवणूकदार विक्रीचा मारा करत आहेत. अमेरिकेतील बाँड यिल्ड वाढल्यामुळे तेथून चांगल्या परताव्याच्या शक्यता दिसू लागल्याने विदेशी गुंतवणुकीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे बाजारात इतकी प्रचंड घसरण होऊनही बाजार आजही महागडा वाटत आहे. वास्तविक,

गेल्या तीन महिन्यांत अनेक दिग्गज कंपन्यांच्या समभागात खूप मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुल्स हाऊसिंग, हिंडाल्को, वेदांता, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एल अँड टी, विप्रो यांसारख्या समभागात ११ फेब्रुवारी ते १३ मे यादरम्यान १७ ते ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कंपन्यांचा कारभार आणि आर्थिक पाया उत्तम आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. या घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर झाला आहे. अशा स्थितीत काय करावे या संभ्रमाने गुंतवणूकदारांना ग्रासले आहे. ही भीती गडद होण्याचे कारण म्हणजे अनेक अर्थतज्ज्ञांकडून अमेरिकेसह जगभरात पुन्हा एकदा मंदीचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सध्या बाजार वरच्या पातळीवर टिकताना दिसत नाहीत. चालू आठवड्याचा विचार करता निफ्टी ५० इंडेक्स १५,८००च्या खाली आला आहे. तथापि, असे असूनही विदेशी गुंतवणूकदारांकडून अद्यापही सकारात्मक ट्रेंड दिसत नाही. त्यामुळे चालू आठवड्यातही डीआयआयकडून आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून खरेदीचा सपाटा पाहायला मिळाला तरच बाजारात चढती भाजणी दिसून येऊ शकते. शुक्रवारी अमेरिकन बाजारात काही अंशी तेजी दिसून आली होती.

त्यामुळे सोमवारी भारतीय बाजारांची सुरुवात तेजीच्या संकेतांनी होऊ शकते; मात्र ती टिकते का हे पाहणे औचित्याचे ठरेल. यादृष्टीने १५,५०० ते १५,६५० या पातळीवर लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. याच्या खाली जर निफ्टी गेला तर बाजारात आणखी मोठी घसरण पाहायला मिळू शकते. बँकिंग समभागातही मोठी घसरण झाल्यामुळे बँक निफ्टीही ३३४०० च्या खाली गेल्यास आणखी जोरदार घसरू शकतो. सद्यस्थितीत समभागांत गुंतवणूक करताना फार मोठी जोखीम घेणे टाळा. तसेच शक्य तितक्या लवकर नफा वसुली करून मोकळे व्हा. कारण बाजारात काही अंशी तेजी दिसून आली तरी ती कायम राहील की नाही याची शाश्वती नाही. यादृष्टीने दिग्गज कंपन्यांचे समभाग प्राधान्याने निवडावेत. याखेरीज पेट्रोनेट एलएनजी हा समभाग २५५ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करावा. इंडियन बँकेचा समभाग १६६ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करावा. टाटा मोटर्सच्या समभागात शुक्रवारी ४० रुपयांची वाढ दिसून आली होती.

हा समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ३७७ ते ३९० या स्तरावर निश्चितपणाने खरेदी करता येईल. याखेरीज एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक या बँकिंग क्षेत्रातील समभागातही थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल. रिलायन्सच्या समभागातही गुंतवणुकीच्या संधी आहेत. एसबीआय कार्डचा समभाग ७१५ रुपयांवर म्हणजेच ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळीसमीप आला आहे. त्यात आणखी घसरण दिसल्यास तो नक्की खरेदी करावा. अ‍ॅक्सिस बँकेचा समभागही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पोर्टफोलिओमध्ये ठेवता येईल. या आठवड्यात धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी दिसू शकते. त्यादृष्टीने सेल हा समभाग अवघ्या ७९ रुपयांवर आला असून त्याची खरेदी करता येईल. बाजाराचा मूड अद्यापही नकारात्मक आहे, हे लक्षात ठेवून आपापल्या जोखमीनुसार खरेदीची रणनीती अवलंबावी. आजची स्थिती ही अनिश्चिततेची आहे. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार स्टॉपलॉसही ठरवून त्याचे पालन करणे हिताचे ठरेल.

-संदीप पाटील,
शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या