31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeविशेषघसरणीची अवकाळी थांबेल ?

घसरणीची अवकाळी थांबेल ?

एकमत ऑनलाईन

जगभरातील प्रमुख बँकांची दिवाळखोरी आणि त्यामुळे गडद झालेल्या मंदीच्या छाया यामुळे जगभरातील शेअर बाजारात सुरू झालेला घसरणीचा ‘अवकाळी’ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान करून गेला. शुक्रवारी सप्ताहसमाप्तीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली असली तरी याच दिवशी अमेरिकन बाजारात आणखी घसरण झाली आहे. तसेच या आठवड्यात फेडची महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न होत आहे. त्याच वेळी तेलाच्या भावांतील मोठी घसरण, अमेरिकेतील महागाईचे घटलेले आकडे, चीनने सीआरआरमध्ये केलेली पाव टक्क्याची घट, डीएलएफचे विक्रमी विक्रीचे आकडे यामुळे मंदीवाले आणि तेजीवाले यांच्यात घनघोर युद्ध चालू आठवड्यात दिसू शकते.

जागतिक नकारात्मक घडामोडींचे किती तीव्र परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतात याची कित्येक उदाहरणे गेल्या तीन-चार वर्षांत नव्या गुंतवणूकदारांना अनुभवास आली आहेत. सध्या याची पुन:प्रचीती येत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याचा जोरदार तडाखा दिल्यानंतर त्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच भारतीय शेअर बाजाराला अन्य प्रमुख बँकांविषयीच्या चिंताजनक स्थितीने आणखी एक तडाखा दिला. परिणामी, गतसप्ताहातील तीन दिवस भारतीय शेअर बाजारावर विक्रीचा प्रचंड मोठा दबाव दिसून आला. तथापि, या बँकिंग संकटावर मात करण्यासाठी अमेरिकन प्रशासन वेगाने पावले टाकत असल्याचे दिसून आल्यानंतर शेवटच्या दोन सत्रात बाजार पुन्हा सावरताना दिसला. सारांशाने पाहता, गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ११४५.२३ अंकांची म्हणजेच १.९३ टक्क्यांची घसरण झाली आणि हा निर्देशांक ५७,९८९.९० वर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३१२.९ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक १७,१०० अंकांवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपमध्ये सरत्या आठवड्यात अनुक्रमे २.८ टक्के, २ टक्के आणि १.६ टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीमध्ये प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मारा मोठ्या प्रमाणावर हातभार लावून गेला. एफआयआयनी गतसप्ताहात ७९५३.६६ कोटींच्या समभागांची खरेदी केली; तर डीआयआयकडून ९२३३.०५ कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे. मार्च महिन्याचा विचार करता एफआयआय आणि डीआयआयकडून भारतीय शेअर बाजारात अनुक्रमे ६५०८.१९ आणि १६,१६२.४० कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे.

शुक्रवारी भारतीय बाजारात तेजी दिसून आली असली तरी या दिवशी अमेरिकन बाजारांनी पुन्हा घसरणीचा कौल दर्शवला आहे. परिणामी, डाऊ फ्युचर्समध्ये ४१५.४ अंकांची घसरण झाली आहे; तर नॅसडॅक फ्युचर्समध्ये ६१.९० अंकांची घसरण झाली आहे. एसजीएक्स निफ्टी फ्युचर्र्स ११७ अंकांची घसरण दर्शवत बंद झाला आहे. त्यामुळे सोमवारच्या बाजारांची सुरुवात ही घसरणीने होण्याचे संकेत मिळत आहेत. चालू आठवड्याचा विचार करता अमेरिकेतील पीपीआय महागाईच्या दरात झालेली घसरण आणि किरकोळ विक्रेत्यांच्या विक्रीच्या मा-यामध्ये झालेली घट पाहता अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून चालू आठवड्यात होणा-या बैठकीमध्ये पाव टक्क्याचीच वाढ केली जाईल असे संकेत मिळताहेत. तसे झाल्यास भारतासह जगभरातील बाजारांमध्ये ‘पुलबॅक रॅली’ किंवा चढती भाजणी दिसून येऊ शकते. तथापि, वरच्या स्तरावर पोहोचल्यानंतर बाजाराचे निर्देशांक टिकतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बाजारासाठी आणखी एक सकारात्मक घटना म्हणजे चीनमधील केंद्रीय बँकेने तेथील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सीआरआरमध्ये पाव टक्का कपातीचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून येऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून या समभागांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे समभाग उपलब्ध असल्याने त्यात खरेदीला मोठी संधी आहे. दुसरीकडे, डीएलएफ या कंपनीने जाहीर केलेले आकडे पाहिल्यास ते विक्रमी म्हणता येतील असे आहेत. याचाच अर्थ भारतीय रिअल इस्टेटच्या बाजारात मंदीची छाया कुठेही दिसत नाही. हा संकेत रियल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजीची शक्यता दर्शवणारा आहे. भारतीय शेअर बाजारासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत मोठा सकारात्मक संकेत मानता येईल अशी घटना म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण. जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किमती जवळपास गेल्या सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. त्यामुळे सिमेंट कंपन्या, पेंट कंपन्या आणि तेलक्षेत्रातील विपणन कंपन्या यांसह अन्य काही कंपन्यांच्या समभागावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

टेक्निकल चार्टचा विचार केल्यास निफ्टीसाठी वरच्या बाजूला १७३०० आणि १७३५० च्या पातळीवर अडथळा पातळी आहे. ती पार केल्यास १७४५० पर्यंत हा निर्देशांक झेपावू शकतो. दुसरीकडे खालच्या बाजूला १६९५०-१६८५० या पातळीवर चांगला आधार आहे. तो तोडला गेल्यास १७६५० पर्यंत निफ्टी घसरू शकतो. अर्थात सलग दोन दिवस डेली चार्टवर डोजी कँडल तयार झाल्या असून त्यांची रचना पाहता बाजार वरच्या दिशेने झेपावण्याच्या प्रयत्नात दिसतो. विशेषत: बँक निफ्टीचा विचार करता ३९६२८ ही पातळी पार करून हा निर्देशांक वर स्थिरावल्यास तो ४०३०० पर्यंत झेपावू शकतो. याउलट खालील बाजूस ३९४०० ची पातळी तोडली गेल्यास ३९२०० आणि ३८८८८ च्या पातळीवर भक्कम आधार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील विवेचन जर नकारात्मक राहिले तर बाजारात आणखी घसरण दिसून येऊ शकते. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत जरी तेजी दिसली तरी त्याला हुरळून जाऊन फार मोठी जोखीम घेणे टाळणेच योग्य राहील. समभागांचा विचार करता सेल, जेएसडब्ल्यू स्टील, एनएमडीसी या धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवून राहावे. याखेरीज ग्रीव्हज कॉटनचा समभाग १२५ रुपयांना खरेदी करून १८० रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. याखेरीज डीएलएफचा समभाग ३९८ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल.

कंझ्युमर प्रॉडक्टस्च्या क्षेत्रातील समभागातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस्चा समभाग ९८० रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज टाटा मोटर्स, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक यांसह साखर कंपन्यांच्या समभागांवरही लक्ष ठेवून राहा. कोरोना आणि एच३एन२ चा वाढता प्रसार पाहता फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्येही तेजी दिसून येऊ शकते. त्यादृष्टीने सिप्ला, सन फार्मा या कंपन्यांच्या समभागात घसरणीच्या काळात संधी साधता येईल. सद्यस्थितीत गुंतवणूक करताना बाजारातील आगामी काळाचा विचार महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने बुधवारच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपर्यंत थांबणे उचित ठरणार आहे. त्यानंतर मिळालेली दिशा बाजारासाठी अल्पकाळासाठी कायम राहील असे दिसते.

संदीप पाटील, शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या