22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषबॉयकॉटचे वारे

बॉयकॉटचे वारे

एकमत ऑनलाईन

देशात सद्यस्थितीत बॉलिवूडच्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याचे वारे वाहू लागले आहेत. याचा मोठा परिणाम नुकताच प्रदर्शित झालेला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि खिलाडी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या दोन चित्रपटांवरून चांगलाच दिसून आला. बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करणे, चित्रपट बंद पाडणे किंबहुना त्याचा सर्व स्तरांतून विरोध करणे हे काही बॉलिवूडकरांना नवीन नव्हते; मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना विशिष्ट समुदायाच्या प्रेक्षकांनी नाकारल्याचे स्पष्ट दिसून आल्याने बॉयकॉटचा मोठा परिणाम बॉलिवूडकरांना पाहावयास मिळाला. १४ जून २०२० रोजी बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली आणि त्यानंतर जणू काही बॉलिवूडमध्ये बॉयकॉट महायुध्दाची ठिणगीच पडली. प्रसिध्द चित्रपटनिर्माता करण जोहर, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान आदी बड्या कलाकारांवर अनेक आरोप केले गेले. करण जोहर हा निवळ बड्या कलाकारांच्या मुलांनाच चित्रपटांमध्ये संधी देतो, असा आरोपही लावण्यात आला आणि त्याने तो कबूलही केला. मात्र त्याचा परिणाम इतका मोठा होईल असे त्यालाही वाटले नसावे. ‘लाल सिंह चड्ढा’ अपयशी होण्यामागे दोन महत्त्वाची कारणे पुढे येत आहेत. २०१४ मध्ये आमिर खानचा ‘पीके’ चित्रपट प्रदर्शित झाला.

यावेळी यात हिंदू समुदायांच्या भावना दुखावल्याचे म्हटले गेले. मात्र आणखी हवा मिळाली ती आमिरने केलेल्या वक्तव्याने.. ते म्हणजे या देशात असहिष्णुता वाढली असून येथे राहणे योग्य होणार नाही, असे आमिर खान म्हणाला होता. तर दुसरे म्हणजे ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची नायिका करिना कपूर हिने म्हटले होते की, आम्ही कोणालाही चित्रपट पाहायला या म्हणून आमंत्रण देत नाही. ज्याला पाहायचा त्यांनी पाहावा. यावरून प्रेक्षकांनी त्यांचे विचार शिरोधार्ह मानत चित्रपटाकडे पाठ फिरविली. गत काही वर्षांपूर्वी चित्रपटांना विरोध झाला की त्याचा फायदा हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी होत होता. किंबहुना तो चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी निर्मातेच पुढाकार घेत असल्याचे काही तोंडी पुरावे आहेत. मात्र आता चित्रपट अयशस्वी होण्यासाठी समाज माध्यमांतून मोहिमा काढून चित्रपट अक्षरश: पाडले जात आहेत. बॉलिवूडमधील बड्या कलाकारांचे यापूर्वी कंपू तयार झाले होते. आताही आहेतच. त्या कंपूमधील एखाद्या अभिनेत्याने त्याच्या मित्र परिवारातील अभिनेत्याच्या चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला किंवा त्याला साद दिली तर त्याच्या आगामी चित्रपटालाही बाहेरचा रस्ता दाखविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याचे मोठे उदाहरण आता येणारा बिग बजेटचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला ‘विक्रम वेधा’ हे होत. ‘ब्रह्मास्त्र’चा निर्माता करण जोहर असून कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहेत.

रणबीर कपूरला या सर्व प्रकाराची पूर्वकल्पना आल्याने त्याने नुकतेच माध्यमांना बोलताना सांगितले की, बॉलिवूड चित्रपटाचे मायबाप प्रेक्षक आहेत. तसेच प्रेक्षक राजा आहे आणि राजाला प्रजा प्रश्न करू शकत नाही. तर ऋतिक रोशनने आमिर खानचा चित्रपट पाहावा यासाठी प्रेक्षकांना विनवणी केली; मात्र ती त्याच्या पथ्यावर पडते की काय असे दिसून येत आहे. दुसरीकडे सनी देओल याच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘गदर’ या भारत-पाक संघर्षातील प्रेम दाखविणा-या चित्रपटाचा रिमेक ‘गदर २’ येतोय. याला आतापासूनच देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. यावरून देशात सांस्कृतिक आणि कला प्रकारातही दोन समुदाय निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. समाज माध्यमांवर प्रत्येकाला हे बोलणे, लिहिणे खूप सोपे झाले आहे. प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे, जी आपल्याला कळणारही नाही. एक कुणी तरी स्टार प्रसिद्धीसाठी, वाद निर्माण करण्यासाठी काही तरी बोलतो, लिहितो, काहीतरी दाखवतो, म्हणून आम्ही असे सरसकट त्यांनी भाग घेतलेल्या कलाकृती फोडणार का? त्यात किमान ५०० ते १ हजार काम करणारे इतर कलाकार आणि कामगारांचे भवितव्य धोक्यात येत आहे. कारण ही निर्मिती संस्था बंद झाली तर हजारो बेकार होणार. दुसरे काम मिळेपर्यंत त्यांना असेच मरू द्यावे का? त्यापेक्षा आम्ही जर सारासार विचार करून प्रत्येक गोष्टीचे मर्म शोधून त्यावर प्रतिक्रिया दिली तर ते जास्त सोयिस्कर नाही का? नाण्याच्या दोन्ही बाजू तपासताना प्रेक्षकांच्या जोरावर मोठ्या झालेल्या कलाकारांनीही बोलण्यापूर्वी किमान १०० वेळा विचार करून बोलावे जेणेकरून त्यामागे काम करीत असलेल्या ९९९ कलाकारांच्या पोटावर लाथ बसणार नाही.

या कलाकारांनी खरेच देशविघातक काम केले असेल तर त्यांना कायद्याने शिक्षा होईल. यासाठी आपल्या देशात न्यायव्यवस्था सक्षम आहे. ती जणूकाही आपल्याला कमकुवत झाल्याचा भास होत असेल तर हा निवळ आत्मविश्वास गमावल्याचा प्रकार आहे. विचारसरणी माहीत नसताना हुकूमशाही करण्याची जी वृत्ती समाजात दिसत आहे ती घातक आहे. त्याहीपेक्षा घातक आहे, ते म्हणजे सरसकट वर्गीकरण करण्याची आणि आपल्या विचारांच्या विरुद्ध कुणी एकदा
जरी मत व्यक्त केले तर बॉयकॉटचे अस्त्र उगारण्याची ही खोड वाईट आहे. त्यात समाज माध्यमांवर सर्रास व्यक्त होणे गंभीर आहे. ही विकृती आहे. या विकृतीचा खरेतर बॉयकॉट व्हायला हवा. कारण हे असले शिव्या देणे हा आपल्या संस्कृतीचा, पर्यायाने देशाचा अपमान आहे. चित्रपट समाजाचा आरसा आहे. यातून आपण स्वत:ला पाहणे गरजेचे आहे. मुळात चित्रपट पाहणे किंवा नाकारणे हा व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार आहे मात्र तो इतरांनीही नाकारावा किंवा स्वीकारावा याचा अट्टाहास करणे हुकूमशाहीचेच ट्रेलर असून आगामी काळाचा विचार न केलेलाच बरा.

-सुशीलकुमार मानवतकर
मोबा. : ९४२३६ ४३९०७

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या