26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home विशेष तुमची मुलं तुमचे शब्द निवडताहेत ...

तुमची मुलं तुमचे शब्द निवडताहेत …

एकमत ऑनलाईन

आपल्याकडे एक म्हण आहे ‘पेराल ते उगवते’! या म्हणीतील काही ना काही अप्रिय अनुभव आपल्याला नक्की आले असतील. कधी आपण पेरलेलं आपल्याच अंगाशी येतं; तर कधी इतरांनी पेरून ठेवलेलं. हे अनुभव विशेष करून मुलांच्या चुकीच्या किंवा असे म्हणूयात त्यांच्या अप्रशस्त बोलण्यातून येत असतील तर या क्षणी आपल्याला काय बोलावं आणि कसं रिअ‍ॅक्ट व्हावं हेच समजत नाही. नवल पाच वर्षांचा झालाय म्हणजे त्याने ४ वर्षे पूर्ण केली. त्याच्या पाचव्या वाढदिवसाला त्याची आत्या दूरवरून आली होती. सर्व पाहुणे जमले होते. वाढदिवसाची तयारी झाल्यानंतर सर्व जण केक कापण्याच्या बेतात होते तेव्हा त्याची लीला आत्या नवलचं कौतुक करत होती, ‘‘आमचा नवल आज फार छान दिसतोय…. हो की नाही नवल..!’’

नवल : ‘‘तू मला बोलू नकोस! कशाला आलीस आमच्या घरी.. जा तुझ्या घरी!’’
कियारा ७ वर्षांची आहे. तिला घराबाहेर पडण्याची फारशी सवय नाही. तिला कोणी घरात आलं तर त्यांच्याशी बोललं पाहिजे हे पालकांनी सांगूनही बोलायचं नसतं. एके दिवशी तिच्याकडे उमेश तात्या आला तर त्याने विचारलं.. कियारा तू काय खेळतेस?
कियारा : तात्याकडे पाहत त्याच्याकडे बोट दाखवत, ‘‘ये तू गप्प बस…’’
उमेश तात्या : जेवलीस का?… ‘‘ये तू गप्प बस म्हटलं ना!’’

कियाराच्या आई-बाबाला क्षणभर कसं रिअ‍ॅक्ट व्हावं हे कळत नाही. ते एकमेकांकडे पाहतात. बाबा म्हणाला ‘‘कियारा असं बोलू नये बेटा, तात्या विचारतोय ना! तू नीट उत्तर द्यायला हवं. सांग काय करतेस ते…’’ कियाराचं तेच उत्तर ठरलेलं. असे लहानग्यांच्या बाबतीतले कधी ना कधी अनुभव आपल्याला नक्की आलेले असतील. कदाचित यापेक्षा वाईट अनुभव आपण घेतलेले असतील, अत्यंत वाईट कानठळी बसवणा-या शिव्या मुलांद्वारे बोलल्या जातात, विशेषत: ज्या ठिकाणी आई-वडील सारखे भांडण करत असतात, भांडणात शिव्यांचा भडिमार करतात आणि मुलं ती ऐकतात पुढे मुलं तशाच प्रकारे त्याचा बोलताना वापरही करतात. मेघराजचे बाबा त्याच्यासमोर त्याच्या आईला सारखं म्हणतात, ‘‘तू लय दीड शहाणी!’’ ‘‘भंगार माल नुसता!’’ मेघराज देखील आईला म्हणतो…. ‘‘भंगार माल नुसता!’’

समितीतील सर्वच सदस्य बदला; शेतकरी संघटनांची मागणी

थोडक्यात मुलं, ज्या वातावरणामध्ये वाढतात तिथली भाषा आपोआप वेचत असतात, आत्मसात करतात पण असंही आहे ज्या ठिकाणी आई-बाबा सजगपणे पालकत्वाचा सराव करताना आपलं मूल चुकीचे बोलू नये यासाठी अत्यंत काळजीने शब्दांची निवड करत असतात. त्या कुटुंबात देखील त्यांना अशा प्रसंगी लज्जित व्हावं लागतं. अशा प्रसंगी काय करायला हवं? असे म्हणतात की, आजची मुलं उद्याचं भविष्य असतात. विशेष करून भाषिक देवाण-घेवाण करताना याची खास काळजी घ्यायला हवी. कारण भाषा केवळ स्वत:ला शोधण्याचा-समजण्याचा प्रवास नाही तर भवतालाचा अर्थ लावण्यात, ती इतरांपर्यंत योग्य त्या स्वरूपात पोहोचवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

उदा. मुलाने पहिल्यांदा मुंगी हा शब्द ऐकला असेल तर त्याचा अर्थ त्याला नीट कळायला हवा किंवा आपण भाषा वापरताना म्हणालो की, ‘‘तो माणूस मूर्ख आहे! बेअक्कल कुठला’’ तर त्याला ‘मूर्ख’ आणि ‘बेअक्कल’ या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि तो तुम्ही का वापरला? हे नीट मुलांना समजावून सांगायला हवे.
जगातली कुठलीही भाषा शिकण्याची सुप्त क्षमता बाळांकडे असते आणि प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून ऐकून ऐकून मूल काही महिन्यांत भाषा शिकू शकते. मातृभाषेतून मुलांशी संवाद साधताना त्या शब्दांशी संबंधित खेळ, दोन शब्दांमधील फरक, आवाज, अर्थ त्यातील रचना हे सर्व मुलांशी जाणीवपूर्वक साधायला हवं. मुलांनी वापरलेला शब्द किंवा एखादी शिवी, एखादा अपशब्द त्यांना पुन्हा विचारा काय म्हणालास? तो सांगेल तरीही त्याला विचारत रहा. वीस-पंचवीस वेळेस सलग विचारत रहा, जेणेकरून तो पुन्हा पुन्हा विचारल्यामुळे कंटाळून तो शब्द बोलणार नाही. कधी कधी मुलांनी आपण कोणता शब्द वापरावा हे ठरवून घेतलेलं नसतं तर ते एक प्रयोग म्हणून त्या शब्दाचा वापर करतात. अशा वेळी तो चुकीचा शब्द आहे म्हणून तो वापरू नये याची जाण त्यांना नसते.
कधी-कधी अगदी आपल्या मुलाने काही गंभीर शब्द उच्चारले असले तरी त्याला लाईटली घ्यावं, म्हणजे त्याच्याकडे अत्यंत रागाने पाहणे किंवा फार तिखटपणे प्रतिक्रिया देऊ नका.

‘‘अच्छा तर तू एक नवीन शब्द ऐकलास? जो तू आत्ता बोललास? त्याचा अर्थ काय आहे हे तुला ठाऊक आहे का?’’ असे मुद्दाम विचारायला हवे, त्यामुळे मूल थोडं थांबेल, त्या शब्दाबद्दल आपण काय बोललो याचा विचार करेल, शब्दाभोवती रेंगाळेल आणि मग ते थोडं आपल्याशी बोलत राहील. आत्ता एखादी शिवी मूल पुन्हा पुन्हा म्हणत आहे. तुम्ही त्याला थांबवताय.. तो तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जोरात ते शब्द उच्चारतोय, तुम्ही तो दुरुस्त करताय, याचा अर्थ तुम्ही ज्या ट्रॅकवरती आहात त्या ट्रॅकवरून तुमचं लक्ष विचलित करायला त्याला जमतंय, हे मूल तुम्हाला आजमावून पाहत असतं. आता या प्रसंगात मुलाने तुमचं लक्ष वेधून घेण्याचा हेतू जरी नकारात्मक असला तरी थोडं थांबा.. काही श्वास घ्या… पहा की, काय घडत आहे आणि आत्ता नेमकं काय करायचं आहे. या क्षणाला मुलाचं वेडं बोलणं जरी क्लेषकारक असलं तरी त्याला तुम्ही हवे आहात, तुमचं ध्यान त्याला हवं आहे.. कदाचित तुमची प्रेमळ नजर, तुमचा स्पर्श किंवा त्याला तुमच्याशी बोलायचं असेल, त्याला तुमचा ‘कनेक्ट’ हवा असेल. या क्षणाला तुमचा ‘कनेक्ट’ होणं हा महत्त्वाचा घटक आहे. तो होऊ द्या.

सुनीता मुलींकडून अशा काही गोष्टी झाल्या की, तिच्या मुलीकडे जोरात पळत जाऊन तिला मिठीत घेते. घट्ट मिठीत घेतल्यामुळे ज्या कारणासाठी मम्माचा कनेक्ट हवा होता ते पूर्ण झाल्याने मूल स्थिरावतं. करून पहा नक्की मजा येईल…मुलांचे पंजे हातात पकडून रेसलिंग खेळा. आपण हरलो हे भासवा… पकडा पकडी खेळून पहा जमेल…. लक्षात असू द्या लहान वय आणि मर्यादित शब्दसंग्रह असल्यामुळे मुलं त्यांना जो शब्द माहीत असतो तो ते बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या मर्यादा आपण ओळखून घ्यायला हव्यात.

कधी कधी आपण कोणाला तरी फोनवरून काय मूर्ख माणूस आहे घाणेरडा हे भावनांच्या आवेगात बोलून गेलेलो असतो. तेव्हा आपलं मूल ते ऐकत असतं तेव्हा आपला ताण त्याला समजेलच अशी त्याची क्षमता नसते पण जर आपल्याकडून असं काही वागण्यात आलं तर मुलांच्या समोर लगेच हे म्हणायला हवं की, ‘मला त्या अमुक काकांना किंवा सरांना लगेच सॉरी म्हटलं पाहिजे; मी त्यांना चुकीचे शब्द बोलले. मला फार वाईट वाटतंय. मला खूपच जास्त वाईट वाटतंय. मी करते त्यांना फोन..’ निमा तिच्या मुलासमोर चुकीचा शब्द गेला तर काय करते, तिचा मुलगा तिला आठवण करून देतो ‘‘मम्मा तू गाढव म्हणालीस परत….’’ ओहो अशी कशी मी वेंधळी.. मी विसरले, ‘‘मी ‘गाढव’ शब्द वापरायला नको होता पण मी तो वापरला’’, ती मुलाला समोर घेऊन कान पकडून सॉरी म्हणते. त्याला घट्ट मिठी मारते. तिचा ताण हलका होतो.

एक प्रश्नावली पालकांनी आणि घरातल्या सदस्यांनी मिळून ठरवायला हवी. काही मुलांसाठी शब्द हे क्षणिक असतात. ते येतात आणि जातात पण आपल्या पालक म्हणून असलेल्या प्रतिक्रिया काय आहेत यावरती आपली भावावस्था अवलंबून असते. म्हणून घरातल्या सर्वांनी मिळून चेक करा…. कोणकोणते शब्द आपल्याला नको आहेत आणि का नको आहेत? नेमकी कोणती आठवण, कोणती चीड माझी त्या शब्दाशी जोडली गेली आहे? उदा. तू एकदम ‘मठ्ठ’आहेस…
अशी नेमकी कोणती भीती त्या शब्दामागे किंवा वाक्प्रचारामागे आहे जी मला नको वाटते?

असे काही ठराविक प्रश्न विचारून आपण ते सर्वांनी मिळून थांबवू शकतो आणि कधीकधी आपल्याला काही गोष्टी ट्रिगर होत असतात. म्हणजे त्या उच्चारल्या गेल्या की आपण अस्वस्थ होतो. त्याही शोधाव्यात. त्याऐवजी मुलांकडून काय ऐकायला आपल्याला जास्त आवडेल याचा विचार फक्त तुम्हीच करू शकता.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या