27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeविशेषनातेसंबंधांवर भाष्य करणारी कथा ‘झुंज’

नातेसंबंधांवर भाष्य करणारी कथा ‘झुंज’

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक कलाप्पा जोतिबा पाटील यांचा ‘झुंज’ हा चौथा कथासंग्रह अभिनंदन प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला असून या संग्रहात एकूण १५ कथा आहेत. या सर्वच कथा ग्रामीण व गावपातळीवरील कष्टकरी
माणसांच्या परस्परातील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणा-या असून त्यांमधून लेखकाने आजच्या बदलत्या काळातले प्रखर वास्तव नेमकेपणाने टिपले आहे. शीर्षक कथा ‘झुंज’ ही शेतकरी सर्जेराव आणि त्याचा इमानदार कुत्रा शे-या यांच्यातील नाजूक असे भावबंध उलगडते. एका रात्री तो शेतावर मुक्कामी असताना त्याच्या शेडमध्ये घुसणा-या सापासोबत शे-या कसा मुकाबला करतो आणि स्वत:चं बलिदान देऊन मालकाचे प्राण कसे वाचवतो, याची रोमहर्षक कहाणी म्हणजे ‘झुंज’ कथा आहे, तर ‘केक’ ही कथा भास्कर हा प्राध्यापक असलेला युवक रजनीसारखी सालस नि शिक्षित तरुणी केवळ स्वत:च्या संशयी स्वभावामुळे कशी गमावतो, याचे रंजक चित्रण करून संशयाच्या भुताची परिणती नेमकेपणाने स्पष्ट करते. आकाश आणि वसुंधरा हे दाम्पत्य आणि त्यांची गुणी कन्या आशू यांच्या नात्यातील जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे ‘लाडकी’ ही कथा असून ही कथा पिता-पुत्री या नात्यातील उत्कट भावबंध हळुवारपणे टिपते.

नागो आणि रत्ना हे कष्टकरी जोडपं रोजचं कष्टमय जगणं जगताना त्यांना येणा-या संकटांना धीरोदात्तपणे कसे तोंड देते, याची प्रत्ययकारी करुण कहाणी म्हणजे ‘कष्टाचं सोनं’ ही कथा असून ही कथा शेतीत राबणा-या कष्टकरी वर्गाच्या बारोमास कष्टाला नेमकेपणाने उजागर करते. सासू नि सून यांच्यातील कौटुंबिक संघर्षातून मुलासाठी आयुष्यभर राब राब कष्ट केलेल्या म्हाता-या आईची सुनेकडून होत असणारी आबाळ नि फरफट ‘हिराई’ कथेत असून ही कथा मनाला चटका लावून जाते, तर रक्ताच्या नात्यातील घट्ट वीण हौसा आज्जी नि नातू संतूच्या उत्कट भावबंधातून ‘माया’ कथेत उमटली आहे, तर चोरीसारखा अनाचार माणसाच्या भवितव्यासाठी कसा घातक असतो हे ‘कानपट’ कथेत रेखाटले आहे. माणसात दडून असलेल्या स्वार्थांध नि लोभी प्रवृत्तीवर उजेड ‘आमचं ठरलंय’ कथेत टाकला असून आजच्या चंगळवादी संस्कृतीमध्ये नात्यांतील विस्कटत चाललेली वीण अस्वस्थ करते.

‘कर्तव्य’ ही एका प्रामाणिक नि नि:स्पृह बँक मॅनेजरची कथा प्रेरक असून ती प्रत्ययकारी झाली आहे, तर गुरू-शिष्यातील अतूट संबंधावर प्रकाशझोत टाकणारी ‘उतराई’ ही कथा मन सुखावणारी आहे. तसेच या संग्रहातील ‘लेकरू’, ‘माऊली’, ‘चिपक्या’ व ‘जालीम’ या कथाही लक्षणीय आहेत. थोडक्यात कथाकार कलाप्पा जोतिबा पाटील यांच्या ‘झुंज’ मधील कथा आजच्या बदलत्या काळातील मानवी नातेसंबंधांचा नेमका वेध घेऊन त्यावर उचित असे भाष्यही करतात. आशयाची नाट्यमय गुंफण, चित्रमय शैली, नेटके संवाद, रांगडी कोल्हापुरी बोलीभाषा आणि माफक निवेदनातून ओघवत्या भाषाशैलीत ही कथा कथाविषयाचे अगदी प्रत्ययकारी चित्रण करते, हे विशेष ! प्रस्तावनेत ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब खोत म्हणतात त्याप्रमाणे ही कथा ‘माणसाचं नि मातीचं नातं घट्ट व्हावं,अशी मनी आस बाळगणारी आहे’ हे नक्की! हेच कथाकार कलाप्पा जोतिबा पाटील यांच्या लेखणीचे यश आहे. त्यांच्या पुढील लेखनास मन:पूर्वक शुभेच्छा !

झुंज – ( कथासंग्रह )
लेखक – कलाप्पा जोतिबा पाटील
प्रकाशक – अभिनंदन प्रकाशन,
कोल्हापूर मो.९४२३० ४१९६५
पृष्ठे -१६८
मूल्य – ३०० रु.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या