23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाआंघोळ करा पण, पाणी कमी वापरा

आंघोळ करा पण, पाणी कमी वापरा

एकमत ऑनलाईन

बीसीसीआयच्या झिम्बाब्वे दौ-यावरील खेळाडूंना सूचना
नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यावर आहे. येत्या १८ ऑगस्टपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिका सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे या झिम्बाब्वे दौ-यापूर्वी भारतीय संघासमोर अनेक समस्या येत असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघ सध्या हरारेमध्ये असून त्याठिकाणी जलसंकट सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे बीसीसीआयने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यावर असून, राजधानी हरारेमध्ये मुक्कामास आहे. या ठिकाणी गेल्या ३ दिवसांपासून पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे गंभीर संकट असल्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाचा कर्णधार के. एल. राहुल आणि इतर खेळाडूंना पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्यास आणि आंघोळीसाठी कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे.

हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खेळाडूंना याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना पाण्याचा अपव्यय टाळावा आणि कमीत कमी पाण्यात आंघोळ करण्यास सांगितले आहे. शिवाय, पाणी बचतीसाठी संघाच्या पूल सेशनमध्येही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिका-याने एका वृत्त वाहिनीला दिली.

यापूर्वी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौ-यात भारतीय संघाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी केपटाऊनच्या अनेक भागात पाण्याचे संकट निर्माण झाले. तेव्हाही बीसीसीआयने खेळाडूंना कमीत कमी पाणी वापरण्यास सांगितले होते. हॉटेलमध्येही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी फलक लावावे लागले होते.

झिम्बाब्वेची राजधानी असलेल्या हरारेला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहरालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी स्वच्छ करण्यासाठी लागणारे केमिकल उपलब्ध नाहीत. त्या रसायनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हरारेतील मोठ्या भागात जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हरारेतील सुमारे २० लाख लोकांना या प्लांटमधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ज्या ठिकाणी पाणी येत असून, ते घाण असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. गेल्या महिन्यात तर परिस्थिती आणखी बिकट होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या