27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाभारताचा ऐतिहासिक पराभव

भारताचा ऐतिहासिक पराभव

एकमत ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकन कर्णधार डीन एल्गरने (१८८ चेंडूंत नाबाद ९६ धावा) केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गवरील पाहुण्या भारताच्या वर्चस्वाला शह दिला. आफ्रिकेने दुस-या कसोटीत भारतावर सात गडी राखून मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताचा हा जोहान्सबर्गवरील सहा कसोटी सामने आणि ३० वर्षांतील पहिला पराभव ठरला. गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौ-यात कर्णधारांमध्ये बदल झाला त्यावेळी अजिंक्य रहाणेने कांगारूविरुद्धची कसोटी मालिका जिंकून दिली होती. यावेळी मात्र कर्णधार बदलला आणि संघाचे नशीबही बदलले. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागले.

यापूर्वी गेल्या तीस वर्षांत आणि सहा कसोटींत भारताला एकदाही जोहान्सबर्गच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला नव्हता. पण लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला या मैदानात पहिला पराभव पत्करावा लागला. भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २४० धावांचे आव्हान ठेवले . पण कर्णधार डीन एल्गरने झुंजार खेळी साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी केली त्यामुळे आता तिसरा सामना जो संघ जिंकेल त्यांना मालिका विजयाची संधी असेल. हा सामना दक्षिण आफ्रिकेने एल्गरच्या १८८ चेंडूत नाबाद ९६ धावांच्या जोरावर सात विकेट्स राखून जिंकला. कर्णधार हा कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ यावेळी डीन एल्गरने घालून दिला.

भारताच्या आव्हानाचा सामना करताना एल्गर हा खेळपट्टीवर उभा राहिला आणि संघाच्या विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला. चौथ्या दिवशी पाऊस पडल्यावर खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक ठरली होती. पण या खेळपट्टीवरही एल्गर ठाम उभा राहिला आणि त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी चौथ्या दिवशी आठ विकेट्सची गरज होती. पण दिवसाच्या सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेने भारताच्या गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि विजयाचा पाया रचला. त्याचबरोबर या मैदानात भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्याचा विक्रमही त्यांनी केला त्यामुळे आता पुढच्या सामन्यात काय होते, याची उत्सुकता सर्वांना असेल. कोहली हा पुढच्या सामन्यात परतणार आहे. त्याचबरोबर पुढच्या सामन्यासाठी संघात मोठे बदलही पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तिस-या सामन्यात भारतीय संघात कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

तिस-या दिवशी भारताला जेव्हा गरज होती, तेव्हा अजिंक्य आणि पुजारा या जोडीने अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर या दोघांनी तिस-या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुस-या डावात २६६ धावांचा पल्ला गाठता आला.
विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेपुढे २४० धावांचे आव्हान ठेवले पण हे आव्हान पुरेसे नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. याचा पाठलाग करताना तिस-या दिवसअखेर आफ्रिकेची २ बाद ११८ अशी धावसंख्या होती. चौथ्या दिवशी पावसामुळे पहिली दोन्ही सत्रे वाया गेली आणि तिस-या सत्रात खेळाला सुरुवात झाल्यावर आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. लढवय्या एल्गरला रॅसी व्हॅन डर दुसेनने (४०) उत्तम साथ दिली. या दोघांनी तिस-या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी रचली. रॅसीला मोहम्मद शमीने माघारी धाडल्यावर एल्गरने टैम्बा बाऊमाच्या (नाबाद २३) साथीने चौथ्या गड्यासाठी ६८ धावांची अभेद्य भागीदारी करत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या गोलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. जसप्रीत बुमराला दोन डावांत मिळून केवळ एक गडी बाद करता आला, तर मोहम्मद सिराजची बळींची पाटी कोरीच राहिली. शार्दुल ठाकूरने भेदक मारा करताना दोन डावांत मिळून आठ मोहरे टिपले. आता ११ जानेवारीपासून केपटाऊन येथे तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना रंगेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या