22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्रीडाभारताने मालिका गमावली

भारताने मालिका गमावली

एकमत ऑनलाईन

पार्ल : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला दुस-या वनडे सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आणि त्यांच्यावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २८७ धावा केल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी भारताच्या आव्हानातील हवाच काढून टाकली.

दमदार सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेने हा सामना सहजपणे जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने सहजपणे सात विकेट्सने हा सामना जिंकत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आणले. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डीकॉक आणि जानमन मलान यांनी दक्षिण आफ्रिकेला तब्बल १३१ धावांची सलामी दिली. तिथेच भारताच्या हातून सामना निसटला होता. त्यानंतर भारताने या दोघांनाही बाद केले खरे. पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजयाचा झेंडा हातात घेतला होता. मलानने यावेळी आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९१ धावा केल्या, तर डीकॉकने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने धडाकेबाज ७८ धावा फटकावल्या.

दुस-या वनडेमध्ये भारताची सुरूवात चांगली झाली होती. सलामीवीर राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी भागिदारी केली. पहिल्या वनडे अर्धशतक करणारा शिखर या सामन्यात मात्र लवकर बाद झाला. त्याने ३८ चेंडूत २९ धावा केल्या. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद होऊन माघारी परतला. यामुळे भारताची अवस्था २ बाद ६४ अशी झाली. विराटच्या जागी आलेल्या ऋषभ पंतने राहुल सोबत तिस-या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारी करून संघाला २०० च्या जवळ पोहोचवले. पंतने आक्रमक फलंदाजी केली, तर दुस-या बाजूला राहुल संयमी फलंदाजी करताना दिसला. अर्धशतकानंतर राहुल बाद झाला.

त्याने ७९ चेंडूत ४ चौकारांसह ५५ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर पंतदेखील माघारी परतला. त्याने ७१ चेंडूत ८५ धावा केल्या. यात २ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. राहुल-पंत ही जोडी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांना मोठी धावसंख्या करता आली नाही. श्रेयस १४ चेंडूत ११ धावांकरून तर वेंकटश ३३ चेंडूत २२ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरने अश्विन सोबत फटकेबाजी केली आणि संघाला ०० धावसंख्येपर्यंत पोहोचवले. शार्दूलने नाबाद ४० तर अश्विनने नाबाद २५ धावा केल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या