नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने सोमवारी क्रमवारिका जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय पुरुष संघाची एका स्थानाने घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तर महिला संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघ अव्वल स्थानावर आहेत.
नेदरलँड्सने एफआयएच प्रो लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तिस-या क्रमांकावर असलेल्या भारताला चौथ्या स्थानावर ढकलले. या क्रमवारीत बेल्जियमचा संघ दुस-या स्थानावर आहे. या क्रमवारीत जर्मनी पाचव्या स्थानावर आहे, तर अलीकडेच फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवणारा इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अर्जेंटिनाच्या संघाची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ न्यूझिलंड, स्पेन आणि मलेशिया पहिल्या १० मध्ये आहेत.
महिला हॉकी संघाच्या क्रमवारीत भारताला फायदा
महिलांच्या क्रमवारीत अर्जेंटिना दुस-या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि जर्मनी अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. भारतीय संघाने एका स्थानाने आघाडी घेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, या क्रमवारीत स्पेन सातव्या स्थानावर आहे. यानंतर बेल्जियम, न्यूझिलंड आणि जपानचा संघ टॉप १० मध्ये आहे.