नवी दिल्ली : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक फिफा रँकिंगमध्ये दोन स्थानांची झेप घेत १०६ व्या स्थानावरुन १०४ वे स्थान मिळवले आहे. आशियाई कपमध्ये एन्ट्री मिळवल्यामुळे हा फायदा टीम इंडियाला झाला आहे. दुसरीकडे भारतीय महिला फुटबॉल टीमने देखील ५९ व्या स्थानावरून ५६ वे स्थान मिळवत तीन स्थानांची झेप घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाने एएफसी आशियाई कप क्वॉलीफायर अभियानात शानदार प्रदर्शन करत अफगानिस्तान, कंबोडिया आणि हॉंगकॉंग यांना तीन सामन्यात मात देत ग्रुप डीमध्ये अव्वल स्थान मिळवले. ज्यामुळे फिफा रँकिंगमध्ये संघाला हा फायदा झाला. दुसरीकडे महिला संघाने यंदाच्या वर्षाची सुरुवातच दमदार केली. दोन आंतरराष्ट्रीय संघाना मात देत महिला संघाने फिफा रँकिंगमध्ये झेप घेतली आहे.
फिफा नेशन्स कपच्या यंदाच्या सीजनमध्ये भारत आशिया/ओशिनिया क्षेत्रात होता. भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिले गेले होते. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती. प्ले-इनच्या दरम्यान भारताने ३२ सामने खेळले, ज्यातील १२ सामने जिंकत ११ सामन्यात पराभव पत्कराला लागला, तर ९ सामने अनिर्णीत ठरले. संपूर्ण ४ सामने जिंकत भारताने डिविजन १ मध्ये स्थान कायम ठेवले. ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रँकिंगमध्ये १९ व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशियासारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.