30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्रीडा भारतीय संघ ६ बाद २५७ धावा; पंतचे शतक हुकले

भारतीय संघ ६ बाद २५७ धावा; पंतचे शतक हुकले

एकमत ऑनलाईन

चेन्नई : इंग्लंड संघाने दिलेल्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिस-या दिवसाखेर भारतीय संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर (३३) आणि आर. अश्विन (८) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाने २०० धावांचा पल्ला पार केला आहे.

ऋषभ पंतने झटपट फलंदाजी करत धावसंख्या वाढवली मात्र अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले़ पंत चौथ्यांदा नर्वस ९० चा शिकार झाला आहे. भारतीय संघ अडचणीत सापडला तेव्हा अनुभवी चेतेश्वर पुजाराने एका बाजूने सावध खेळ करत डाव सांभाळला होता. तर एका बाजूने पंतची आक्रमक खेळी सुरू होती. मात्र अखेर ही भागीदारी तोडण्यात फिरकीपटू बेसला यश आले. त्याने ५१ व्या षटकात पुजाराला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

पुजारा रॉरी बर्न्सच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. पुजाराने १४३ चेंडूत ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. पंत आणि पुजाराने ११९ धावांची भागीदारी केली. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पंतला साथ देण्यासाठी मैदानावर आला. त्यानंतर पंतने षटकार खेचत भारताला २०० धावाही पार करून दिल्या. मात्र, त्यानंतर नव्वदीच्या घरात पोहोचल्यानंतर पंत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याला बेसनेच बाद केले. पंतने ८८ चेंडूत ९१ धावा चोपल्या. या खेळीत पंतने ९ चौकार आणि ५ षटकार मारले.

५७८ धावांचा पाठलाग करणा-या भारतीय संघाचे ७४ धावांत चार गडी तंबूत परतले होते. अशा परिस्थितीत पंत-पुजारा जोडीने भारतीय संघाचा डाव सावरला. विराट कोहली (११), अजिंक्य रहाणे (१) आणि रोहित शर्मा (६) यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. युवा शुभमन गिल याने २९ धावांची छोटेखानी खेळी केली. इंग्लंडकडून फिरकीपटू डॉम बेस याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर जोफ्रा आर्चरने दोन बळी मिळवले.

विराट-अजिंक्य अपयशी
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले़ भारताच्या २५व्या षटकात बेसने ऑली पोपकरवी विराटला बाद केले़ विराट बाद झाल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी मैदानावर आला. पण तो फार काही खास करू शकला नाही. रहाणेला ६ चेंडूत १ धावेवर खेळत असताना बेसनेच झेलबाद केले.

इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
इंग्लंड संघाने पहिल्या डावात १९०.१ षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आहे. रुटने ३७७ चेंडूंत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने ८२ आणि डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली. भारताकडून बुमरा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी मिळवले आहेत. तर ईशांत आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले.

छत्रपती उदयनराजेंनी घेतली आदित्यनाथांची भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या