मुंबई : क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा येत्या २४ एप्रिल रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणार आहे. त्यानिमित्ताने वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.
सचिन तेंडुलकर याला २०१४ मध्ये भारत सरकारकडून देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. सचिनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत दमदार खेळी करून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले. त्याने मैदानात रचलेले बरेच रेकॉर्ड अजूनही कोणी तोडू शकलेले नाही.
सचिनने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहका-यांपर्यंत सर्वांचे आभार मानले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे ठरवायचे आहे.
सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो ५० वर्षांचा झाल्यावर ही एमसीएकडून कौतुकाची भेट असेल. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली. सचिनच्या ५० व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.