नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार प्रदर्शन करून दाखवत आहेत. या स्पर्धेतील चौथ्या दिवशीही भारताने तीन पदके जिंकली.
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकतालिकेत भारत एकूण ९ पदकांसह सहाव्या क्रमांकावर आहे. याचदरम्यान भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान भारतीय सायकलपटू मीनाक्षीला अपघात झाला. या अपघातानंतर तिला स्ट्रेचरवर बसवून मैदानाबाहेर काढण्यात आले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या १० किलो मीटरच्या सायकलिंग स्केच रन प्रकारात मीनाक्षीच्या सायकलला अपघात झाला. स्पर्धेदरम्यान मीनाक्षी वळण घेत असताना तिची सायकल अडकली आणि ती खाली पडली. ज्यात ती जखमी झाली. एवढेच नव्हे तर, तिच्या पाठीमागून येणा-या न्यूझिलंडच्या प्रतिस्पर्ध्याची ब्रायोनी बोथाची सायकल तिच्या अंगावरून गेली. यात ब्रायोनी बोथालाही दुखापत झाली आहे.
मैदानातील प्रेक्षकही पडले चिंतेत
या अपघातानंतर लगेचच तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिका-यांनी मीनाक्षीच्या दिशेने धाव घेतली. तसेच मीनाक्षी आणि बोथाला मैदानातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी मीनाक्षीला तेथून स्ट्रेचरवर नेले. हा सगळा प्रकार पाहून मैदानातील प्रेक्षकही चिंतेत पडले.